
नवी दिल्ली (पतिनिधी) : केंद्र सरकारच्या "स्वदेशी" मोहिमेचा संपूर्ण देशात विस्तार करण्यासाठी निमलष्करी दलाच्या कॅन्टीनमध्ये हस्तनिर्मित खादी उत्पादनांची विक्री सुरू करण्यात आली आहे. गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या १०७ कॅन्टीनमध्ये खादी उत्पादनांच्या विक्रीचा शुभारंभ झाला. देशातील निमलष्करी दलांची सर्व कॅन्टीन्स लवकरच खादी उत्पादनांची विक्री सुरू करतील, असे त्यांनी यावेळी जाहीर केले.
“गांधीजींसाठी खादी हे स्वदेशीचे प्रतीक होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्याचेही ते एक साधन आहे. खादी शुद्धतेची हमी आहे. १०७ निमलष्करी कॅन्टीनमध्ये खादी उत्पादनांची विक्री सुरू झाल्याचा मला आनंद झाला आहे आणि लवकरच देशभरातील सर्व निमलष्करी कॅन्टीनमध्ये खादी उत्पादने उपलब्ध करून दिली जातील,'' असे गृहमंत्र्यांनी आसाममधील तामुलपूर येथे बीएसएफच्या केंद्रीय कर्मशाळा आणि भांडाराच्या पायाभरणी कार्यक्रमादरम्यान सांगितले.
यावेळी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना, गृह सचिव अजय कुमार भल्ला आणि सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक उपस्थित होते. तत्पूर्वी, स्वदेशीला चालना देण्यासाठी, गृहमंत्र्यांनी खादी आणि ग्रामोद्योग आयोगामार्फत सर्व कॅन्टीनसाठी अधिकाधिक "स्वदेशी" उत्पादने विकणे अनिवार्य केले.