जव्हार (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात पालघर जिल्हा पर्यटकांची मांदियाळी असलेला पालघर जिल्हा असून, या भागात मोठ्या प्रमाणावर पर्यटन विकास होऊ शकतो. जिल्ह्यात पर्यटनाबाबतची प्रचंड गुणवत्ता असताना त्यादृष्टीने नियोजन करणारे कार्यालय नसल्याने पर्यटन क्षेत्राच्या प्रगतीला अडथळा येत आहे.
जिल्ह्यात असलेल्या विविध पर्यटन स्थळांची माहिती मिळत नसल्याने येथे पर्यटक येण्याचे प्रमाण तुलनेने खूपच कमी आहे. एकीकडे पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असताना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) कार्यालय नसल्यामुळे पर्यटन विकासाला अडथळा येत आहे.
त्यामुळे पालघर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे उप प्रादेशिक कार्यालय व्हावे, अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रफुल्ल पवार यांनी पर्यटन विभागाकडे केली आहे. विशेष म्हणजे शहरात हनुमान पॉइंट या परिसरातील जागा महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या (एमटीडीसी) च्या ताब्यात आहे. तसेच एमटीडीसीने सुमारे ४५ वर्षांपूर्वी याठिकाणी हॉटेल व लॉजिंग बांधले होते.
परंतु सदर हॉटेल बंद असल्यामुळे त्याचे खंडर झाले असून, ते तुटलेल्या अवस्थेत आहे. नागरिक त्याचा शौचालय म्हणून वापर करीत असल्यामुळे हे हॉटेल तोडून नवीन हॉटेल व लॉजिंग बांधून पर्यटकांची कमी दराने राहाण्याची सोय करावी, अशी मागणीही प्रफुल्ल पवार यांनी केली आहे.
हनुमान पाँईंट येथील जागा एम टीडीसीच्या ताब्यात आहे. परंतु सदर विभागाचे या ठिकाणी लक्ष नसल्यामुळे या जागेवर अतिक्रमण होत आहे. त्यामुळे ही जागा एमटीडीसीने डेव्हलप करावी अथवा जव्हार-नगर परिषदेकडे हस्तांतरित करावी.
-विजय घोलप , माजी नगरसेवक,जव्हार नगर परिषद