मुंबई (प्रतिनिधी) : उमेश यादव, सुनिल नरिन यांची प्रभावी गोलंदाजी आणि नितीश राणा (नाबाद ४८ धावा), रींकू सिंग (नाबाद ४२ धावा) यांची धडाकेबाज फलंदाजी या जोरावर कोलकाताने तगड्या राजस्थानवर सोमवारी ७ विकेट राखून विजय मिळवला. या विजयामुळे कोलकाताने गेल्या ५ सामन्यांतील पराभवांची कोंडी फोडली.
प्रत्युत्तरार्थ कोलकाताची सुरुवात फारशी चांगली झाली नसली तरी त्यांच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी लक्ष्याला धरून फलंदाजी केली.धडाकेबाज आरोन फिंच आणि बाबा इंद्रजीत स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर कर्णधार अय्यरने फलंदाजीची सूत्रे हाती घेत संघाचे धावफलक खेळते ठेवले. अय्यरने ३२ चेंडूंत ३४ धावा केल्या. त्यानंतर नितीश राणा आणि रींकू सिंग यांनी विजयी लक्ष्य गाठले. राणाने नाबाद ४८ धावा केल्या, तर रींकूने नाबाद ४२ धावा करत कोलकाताला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजीला आलेल्या राजस्थानला चांगली सुरुवात करण्यात अपयश आले. तिसऱ्याच षटकात देवदत्त पडिक्कलच्या रुपाने राजस्थानला पहिला धक्का बसला. त्यानंतर यंदाच्या हंगामात चांगलाच फॉर्मात असलेला जोस बटलर आणि कर्णधार संजू सॅमसन या भरवशाच्या जोडीने राजस्थानला संकटातून सावरले, पण या जोडीला मोठी भागीदारी करता आली नाही. साऊथीने शिवम मावीकरवी झेलबाद करत जोस बटलरचा अडथळा दूर करत कोलकाताला मोठा बळी मिळवून दिला.
एरव्ही तडाखेबाज फलंदाजी करणारा बटलर कोलकाताविरुद्ध संयमी खेळला. त्याने २५ चेंडूंत अवघ्या २२ धावांचे योगदान दिले. करुण नायरने संजू सॅमसनला साथ देत संघाची धावसंख्या शतकासमीप नेली. संघाची धावसंख्या ९० असताना करुणचा संयम सुटला. त्यानंतर रीयान परागने संजूच्या मदतीने धावांचा वेग वाढवला. त्याने १२ चेंडूंत १९ धावा करत संघाच्या धावांचा वेग वाढवला.
रीयान पराग बाद झाल्यानंतर कर्णधार संजू सॅमसनचाही संयम सुटला. संजूने ४९ चेंडूंत ५४ धावांची संयमी खेळी खेळत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. शेवटच्या षटकांत शेमरॉन हेटमायरने १३ चेंडूंत नाबाद २७ धावा करत राजस्थानने १५२ धावापर्यंत मजल मारली.