वाडा (प्रतिनिधी) : वाडा शहरातील नागरिक पाणी समस्याने त्रस्त झाले असून त्यांनी एक दिवसाआड अंघोळीचा पर्याय निवडला आहे. तरी देखील याचे लोकप्रतिनिधींना काही सोयरसुतक पडलेले नाही.
वाडा शहराची लोकसंख्या ४० हजाराहून अधिक असून दिवसेंदिवस वाढतच आहे. शहराला प्रामुख्याने वैतरणा नदीतील सिध्देश्वर बंदा-यातून पाणीपुरवठा केला जातो.
या ठिकाणी मुबलक पाणी आहे. त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकितही भरपूर पाण्याची साठवणूक होत आहे.या साठ्यातून शहरातील इतर नगरांना पाणीपुरवठा सुरळीत होतो.
मात्र शिवाजी नगर, शास्त्री नगर, विवेक नगर,सोनार पाडा, शांती नगर, समर्थ नगर,विष्णुनगर या नगरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.येथील नागरिकांना टॅक्टरने पाणी विकत घ्यावे लागत आहे
या संदर्भात येथील सामाजिक कार्यकर्ते बंड्या सूर्वे यांनी सांगितले की , वाडा शहराची वस्ती वाढल्याने नगराची संख्या प्रचंड वाढली आहे.त्यामूळे जुनी पाणी योजना वाढत्या लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यास अपुऱ्या पडत आहेत. त्यासाठी प्रत्येक नगरासाठी टाकी पासून स्वतंत्र पाईपलाईन टाकायला हवी परंतू नगरपंचायत प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्या कारणाने वाडा शहरात पाणीटंचाई जाणवत आहे.
व्यथा आणि कथा
नगर पंचायतीकडे वेळो वेळी अर्ज विनंत्या करूनही नेहमीच तांत्रिक कारण दाखवून दोष दूर करू व लवकरच पाणी पुरवठा सुरळीत होईल, अशी आश्वासने दिली. मात्र त्याची पूर्तता केली नसल्याने ही पाणीटंचाई निर्माण झाल्याचे शिवाजी नगर येथील रहिवासी दामोदर पाटील यांनी सांगितले. पाणीटंचाईमुळे येथील नागरिकांनी आंघोळीला रामराम ठोकला आहे. तर आजूबाजूच्या खेड्यातून नोकरीनिमित्त वाड्यात राहायला आलेल्या रहिवाशांनी वाड्यातील घरे सोडून गावाकडे मुक्काम ठोकायला सुरुवात केली आहे.