अवैध गौणखनिज उत्खननामुळे पाच गावांना दरडींचा धोका

माळीणसारख्या घटना घडण्याची शक्यता


संतोष रांजणकर


मुरुड : रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे गावावर मोठ्या दरडी कोसळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असताना मांडला ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील रोहिदास वाडी, चाफेवाडी, चाफेवाडी आदिवासीवाडी, महालुंगे खुर्द आणि महालुंगे खुर्द आदिवासीवाडी ही गावे आता दरडीच्या दहशतीखाली आली आहेत. या गावांची भविष्यात तळई, माळीण सारखी अवस्था होणार नाही ना? या विवंचनेत येथील ग्रामस्थ आहेत. मुरुड तालुक्यातील मांडला ग्रामपंचायत ही फणसाड अभयारण्यालगत आहे.


या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माती उत्खनन होत असून याबाबत शासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करून ६ महिन्यापेक्षा अधिक काळ होऊनही शासनाचे अधिकारी यांनी अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. शासन माळीणसारखी अवस्था होण्याची वाट बघत आहे का? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते दिलीप रोहेकर यांच्यासह ग्रामस्थांनी केला आहे. तसेच याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


मांडला येथील डोंगर भागातील माती उत्खननाबाबत कैफियत मांडताना रायगड जिल्हा मुरुड तालुका चर्मकार संघटना अध्यक्ष सुरेश नांदगावकर, प्रभाकर रामचंद्र महाडिक, दत्तात्रेय चिंतू नागावकर, दिलीप रोहेकर, सामाजिक कार्यकर्ते अनंत रोहेकर, माजी पोलीस पाटील भारत नागोठकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


दिलीप रोहेकर यांनी सांगितले की, मुरुड तालुक्यातील मांडला ग्रामपंचायत ही फणसाड अभयारण्याला लागून आहे. तसेच फणसाड धरण सुद्धा जवळ असताना मांडला ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील रोहिदास वाडी, चाफेवाडी, चाफेवाडी आदिवासीवाडी, महालुंगे खुर्द आणि महालुंगे खुर्द आदिवासीवाडी या पाच गावांतील जवळपास एकशे पन्नासच्या आसपास कुटुंबे राहत आहेत. या गावामधील नागरिक सध्या भीतीच्या छायेत वावरत आहेत. या ठिकाणी निसर्गाचे वरदान आहे. मात्र, या गावांमधील डोंगरालगत एक वर्षांपेक्षा अधिक काळ मोठमोठ्या पोकलन, जेसीबीच्या साहाय्याने माती उत्खनन हे सुरू आहे. गत वर्षीसारखी अतिवृष्टी झाली, तर संपुर्ण डोंगर या गावांवर येऊन कोसळेल. हळूहळू येथे भूस्खलन होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. या ठिकाणील ग्रामस्थांनी आरोप केले आहेत की, प्रशासन येते आणि आश्वासन देऊन जाते. मात्र वर्षभर ग्रामस्थांच्या जीवाचा थरकाप उडत आहे.


सदर जागा प्रामुख्याने तैझुन निसार हसोंन्जी या व्यक्तिच्या नावे असून लाखों ब्रास मातीचे उत्खनन होत अाहे व हजारो झाडांची कत्तल झाली आहे. मोठमोठ्या पोकलन, ब्रोगर, डंपर याने माती स्थलांतर व तेथेच भराव असा डोंगर ठिसूळ करून टाकले असून येत्या पावसात आमचे मांडला गावाचे माळीण व तळई होणार यात शंकाच नाही अशी वस्तुस्थिती दिलीप रोहेकर यांनी मांडली.


मांडला या गावालगत हजारो एकर डोंगर जमीन खरेदी करून तेथे बेकायदेशीर मोठमोठ्या पोकलन लावून वर्षभर अनधिकृतपणे खोदाई चालू असून डोंगराच्या खालच्या बाजूस मांडला गावाची वस्ती असून तेथेच गावकरी, मुलाबाळांसह शेतजमिनी, संसार गुरे-ढोरे अशी मोठी नागरी वस्ती असताना समोरच खोदाई सुरू आहे. त्यासंदर्भात संबंधित ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार करून विचारले असता याचे उत्तर आजवर मिळालेले नाही अशी प्रतिक्रिया येथील ग्रामस्थांनी दिली, तर त्यांनी ग्रामपंचायतीच्या लेटरहेडवर तहसील, प्रांताधिकारी, उपजिल्हाधिकारी यांनाही पत्राद्वारे कळवले आहे; परंतु त्याच्यावर अद्याप उपाययोजना झालेली नाही.


ग्रामस्थांनी पुन्हा दिनांक १२/०४/२०२२ रोजी ग्रामपंचायतीला एक पत्र दिले आहे; परंतु पत्रव्यवहार करूनही कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसेल, तर शासनाचे अधिकारी यांना माती उत्खनन करणाऱ्यांबरोबर लागेसंबंध असल्याने त्यांना पाठीशी घालत आहे, असा अर्थ होतो.

Comments
Add Comment

पेण अर्बन बँकेच्या संचालकांकडून प्रत्येकी २४ कोटींची वसुली?

बँक घोटाळ्यात सहकार आयुक्तांनी निश्चित केली सामूहिक जबाबदारी सुभाष म्हात्रे अलिबाग : पेण अर्बन बँक घोटाळ्यातील

अलिबाग नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी

उबाठा गटाचे स्वतंत्र निवडणूक लढविण्याचे संकेत अलिबाग : अलिबाग नगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची घोषणा

महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप युती

राष्ट्रवादी काँग्रेसला नगराध्यक्ष पद आणि १५ जागा महाड : ऐतिहासिक महाड नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी

विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम सुरू होण्याच्या दिशेने एक पाऊल

चार तासांचा प्रवास केवळ दीड तासांत होणार मुंबई  : गेल्या ९ वर्षांपासून रखडलेल्या विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम

जंजिरा किल्ला तब्बल नऊ दिवसांनी पर्यटकांसाठी झाला खुला

मुरुड : मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची मांदियाळी येत असते. अचानक हवामानात बदल

करंजाचा धाडसी युवक आतिश कोळी ठरला ‘देवदूत’

वादळात अडकलेल्या १५ खलाशांचा वाचवला जीव अलिबाग  : उरण तालुक्यातील करंजा पाडा येथील आतिश सदानंद कोळी या युवकाने