सातारा : नेहमीच आपल्या फिल्मी स्टाईलने बेधडक आणि रोखठोक विधानांनी चर्चेत असलेले साता-याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर ईडी ताब्यात द्या, यांना दांडक्याने सडकून काढतो अशी खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे.
सध्याचे राजकीय वातावरण कुणी बिघडवले याचा विचार केला पाहिजे. या लोकांनी पैसे खाल्लेच आहेत, माझ्या हातात द्या ईडी, मग दाखवतो यांना. ही ईडीची चेष्टा झाली आहे. पानपट्टीवर बीडी मिळते तशी अवस्था ईडीची झाली आहे. लावा ना ईडी. चाप लावा. घ्या ताब्यात सगळे येतील. यांना दांडक्याने सडकून काढले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.
माझे आवडते चॅनेल टॉम अँड जेरी आहे. पण सध्या मी ते बघायचे बंद केले आहे आणि ज्या माकड उड्या चालल्या आहेत त्या बघत बसतो. कोण कुणाला मारते, कोण कुणाला आत टाकते हे बघतो. मजा येते, अशा शब्दात उदयनराजेंनी निशाणा साधला आहे.
उदयनराजेंनी म्हटले आहे की, एका बाजूला फुटपाथवर लोक झोपत आहेत, या लोकांना ते दिसत नाही का? प्रत्येकाने एकमेकांची पाठ थोपटायची, जेलमध्ये आहे तरी त्याने काही केले नाही. दीड वर्ष, दोन वर्ष जेलमध्ये पण त्याने काही केले नाही म्हणायचे. लोकांना डोळे नाही, लोकांना मेंदू नाही, लोक हसतायत, असे ते म्हणाले. जर निवडणुका लागल्या तर हे काय करणार हे त्यांचे त्यांनाच माहिती, असेही ते म्हणाले. माझे नाव घ्यायचे नाही, मी कुणाच्या नादाला लागत नाही, असेही ते म्हणाले.