Monday, January 13, 2025
Homeदेशपेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी न करणाऱ्या राज्यांना पंतप्रधानांनी सुनावले खडे बोल

पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी न करणाऱ्या राज्यांना पंतप्रधानांनी सुनावले खडे बोल

नवी दिल्ली : कोविड परिस्थितीच्या आढावा बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे ऐकून घेतले. त्यानंतर संबोधित करताना पेट्रोल-डिझेलच्या दरावरुन महाराष्ट्रासह अनेक राज्यांना खडे बोल सुनावले.

देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर अनेक राज्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर यादी काढत पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी न करणाऱ्या राज्यांना खडे बोल सुनावले. बिगर भाजपशासित राज्यांमध्ये भाजपशासित राज्यांपेक्षा पेट्रोल-डिझेलचे दर जास्त असल्याचे मोदींनी सांगितले. यावेळी मोदींनी काही राज्यांची नावे सांगितली.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, “मी कोणावरही टीका करत नाही. तुमच्या राज्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करत आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू आणि झारखंड या राज्यांनी या ना त्या कारणाने केंद्राच्या सल्ल्याकडे लक्ष दिले नाही. त्याचा नागरिकांवर बोजा पडत राहिला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आता मी तुम्हाला प्रार्थना करतो की, गेल्या नोव्हेंबरमध्ये देशाच्या हितासाठी जे करायचे होतं त्याला सहा महिन्यांनी उशीर झाला आहे. व्हॅट कमी करुन जनतेला फायदा द्या. भारत सरकारला येणाऱ्या महसुलापैकी ४२ टक्के महसूल राज्यांनाच मिळतो. जागतिक संकटाच्या काळात संघ म्हणून काम करण्याची गरज आहे.

केंद्र सरकारने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. मात्र अनेक राज्यांनी तसे केलेले नाही. त्यांनी वॅट कमी करुन नागरिकांना फायदा दिला नाही. परिणामी त्या राज्यातील इंधनाचे दर हे कर कमी केलेल्या राज्यांच्या तुलनेत जास्त आहेत, असे मोदी म्हणाले. एकप्रकारे हा या राज्यांतील लोकांवर अन्यायच आहे, पण त्यामुळे शेजारील राज्यांचेही नुकसान होत आहे. जी राज्ये कर कमी करतात त्यांचा महसूल बुडतो. गुजरात आणि कर्नाटकने कर कमी केले आहेत. गुजरातने कर कमी केला नसता, तर त्यालाही साडेतीन हजार कोटींहून अधिक महसूल मिळाला असता. त्याच वेळी, काही राज्यांनी व्हॅट कमी केला नाही आणि या कालावधीत साडेतीन ते पाच हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळवला.

भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी केंद्र आणि राज्यांमध्ये सामंजस्य आवश्यक आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे पुरवठा प्रभावित झाला आहे. अशा वातावरणात आव्हाने वाढत आहेत, असे ते म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -