Tuesday, July 1, 2025

सीआयएसएफ नसते तर सोमय्यांची हत्या झाली असती - प्रवीण दरेकर

सीआयएसएफ नसते तर सोमय्यांची हत्या झाली असती - प्रवीण दरेकर

मुंबई : सीआयएसएफ होते म्हणून किरीट सोमय्यांचा जीव वाचला. नाहीतर त्याच ठिकाणी त्यांची हत्या झाली असती, असे गंभीर आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केले आहे. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, किरीट सोमय्या या सरकारचे घोटाळे, भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत, त्यामुळे सोमय्या यांनाच नष्ट करावे अशा प्रकारचा कट या सरकारचा आहे.


ज्यांना झेड सेक्युरीटी आहे. त्यांच्यावर जर हल्ला होत असेल तर सर्वसामान्यांनी काय करायचे, उलट आयुक्त असे म्हणतात की सीआयएसएफ त्यावेळी काय करत होते. त्यांची अपेक्षा होती का की सीआयएसएफने गोळीबार करावा. महाराष्ट्र पोलिस आणि सीआयएसएफमध्ये तुंबळ युद्ध व्हावे. जबाबदार आयुक्तांनी असे बेजबाबदार वक्तव्य करणे योग्य नाही. सीआयएसएफ होते म्हणून किरीट सोमय्यांचा जीव वाचला आहे.


आम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांकडे, गृहसचिवांकडे गेलो असतो पण हे सरकार आम्हाला न्याय देईल असे वाटत नाही. सरकार सुडाने पेटलेले आहे. यामुळे संविधानाने आमच्या पालकत्वाची जबाबदारी ज्यांच्याकडे दिलेली आहे. त्या राज्यपालांकडे आम्ही न्यायाच्या अपेक्षेने गेलो होतो. यासंदर्भात कठोर कारवाई करा, अशी मागणी राज्यपालांकडे केली आहे, असे दरेकर म्हणाले.

Comments
Add Comment