Thursday, October 3, 2024
Homeअध्यात्मबालकवितेतून भाषासमृद्धीकडे...

बालकवितेतून भाषासमृद्धीकडे…

‘अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं रुप्याचा वाळा तान्ह्या बाळा’

डॉ. वीणा सानेकर

बाळाला तीट लावत जोजवणारी पिढी हळूहळू जुनी झाली. विंदा, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, वंदना विटणकर अशा किती तरी कवी-कवयित्रींच्या कवितांनी सजलेले-नटलेले बालपण केव्हाच हरवले. चकाकत्या शायनिंग इंग्रजी शाळांच्या जाहिरातींच्या भूलभुलैयाला भुललेली मम्मी-पप्पांची पिढी आपल्या मुलांच्या ‘इंटरव्ह्यू’करिता मुलांकडून ‘पोएम्स’ पाठ करून घ्यायला लागली. घरी पाहुणे आले की ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टारचे प्रयोग घरोघरी रंगू लागले. खरे तर आपल्याकडे बालकवितांचा केवढा मोठा खजिना आहे. मात्र फार मोठ्या पालकवर्गाने मराठी शाळांकडे पाठ फिरवल्यामुळे मुलांच्या हाती मराठीतील बालकविता दिसत नाहीत.

खरे तर नाद, लय, यमक, अनुप्रास, या सर्वांच्या अनुभवातून भाषासमृद्धीची वाट बालकवितांतून सापडते. शब्दांच्या विविध छटा मुलांना गवसतात. प्रेम, देशभक्ती, समाजाच्या जवळ जाण्याकरिता आवाहन, निसर्ग जाणून घेण्याची ओढ, अशा विविध जाणिवा मातृभाषेतील कवितांच्या आकलनातून बालपणापासून सहजगत्या विकसित होतात. मात्र परक्या भाषेतल्या कविता इतक्या सहजतेने भिडू शकतील का? सुनीता नागपूरकर यांची एक छोटीशीच कविता आहे. तिच्यातल्या या ओळी नकळत संदेश देऊन जातात.

गुलाबाचं फूल म्हणतं कसं,
तोडू नका मला फुलण्याआधी असं…

सुनीता नागपूरकर म्हणजे माझ्या प्राथमिक शाळेतल्या बाई. शैक्षणिक साधनांच्या निर्मितीत बाईंचा हातखंडा होता. या अर्थाने त्या अनुताई वाघ, ताराबाई मोडक यांच्या परंपरेतल्या! खेळांच्या माध्यमातून भाषेचे संस्कार करण्याच्या गमती-जमती मी शाळेत खूप अनुभवल्या. माध्यमिक शाळेत हमखास आम्ही हस्तलिखित तयार करायचो. कविता, गोष्टी रचायची स्पर्धाच लागायची. हे सगळेच मी माझ्या मुलीच्या शिक्षणाच्या निमित्ताने पुन्हा अनुभवले. ती मराठी शाळेतच शिकत असल्याने बालकवितांचा खजिना मीही तिच्यासोबत लुटला.

विंदा करंदीकरांची बालकविता नव्याने भेटली. करंदीकरांनी त्यांच्या बालकविता निर्मितीची पार्श्वभूमी एके ठिकाणी उलगडली आहे. त्यांचा मुलगा अंधाराला घाबरायचा. हळूहळू अंधाराचा सामना करायला त्याला कवितांचा उपाय सापडला. तो भीती वाटली की, घडाघडा कविता म्हणू लागला आणि त्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या तमाम मुलांना विंदांच्या कवितांचा खजिना मिळाला. परी गं परी, एटू लोकांचा देश, अडम-तडम, एकदा काय झाले, राणीची बाग असे त्यांचे संग्रह आजही खूप आनंद देतात. पण तो लुटायला मायभाषेची गोडी हवी. पिशी मावशी, सुरवंट, गोगलगाय, बागुलबुवा इतकंच काय, तर खुर्ची, स्टूल यांच्यासारख्या निर्जीव वस्तूदेखील त्यांच्या कवितेतली सजीव पात्र बनतात.

अनंत भावे यांच्या कवितांमध्येही शब्दांच्या विविध करामती दिसतात. खारुताईवरची त्यांची एक दीर्घ कविता मला आवर्जून आठवते. ‘सांगा सांगा ढगोजीबाप्पा’ नावाची त्यांची एक कविता आहे. या कवितेतल्या प्रत्येक कडव्यात क्रियापदाची जादू आहे.

पाऊस कोठे अडला?
पाऊस कोठे दडला?
पाऊस कोठे झुकला?
पाऊस कोठे चुकला?

क्रियापदांचा हा फेर किती मनोरम आहे. ‘चाफा’ हा कुसुमाग्रजांचा कवितासंग्रह इंद्रीय संवेदना जागवतो. या संग्रहात ‘नदीमाय’ नावाची कविता आहे.

नदीबाई माय माझी डोंगरात घर,
लेकरांच्या मायेपोटी येते भूमीवर…

या कवितेतून नदीचे देणे तर कळतेच, पण तिच्याबद्दलच्या कृतज्ञतेने मन भरून जाते. भेदभाव न करता सर्वांना जवळ वाटणारी नदी हे निसर्गाचे एक रूप.

निसर्गाची स्पंदने टिपणारी विविधांगी कविता मराठीत आहे. दृक् संवेदना, रंग संवेदना, श्रुती, गंध संवेदना अशा संवेदनांना ती आवाहन करते. माणूस म्हणून आपल्या भावजीवनाची जडणघडण करणारी बालकविता ही आपल्या मुलांची गरज आहे. त्या कवितांशी त्यांचे नाते मराठी शिक्षणातून जुळू शकते. मुलांमध्ये कल्पनाशक्तीचा विकास घडवण्यासाठी कविता हवी व त्याकरिता त्यांच्यासोबत अगदी सहजतेने एकरूप झालेली मायभाषा हवी.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -