अनघा निकम-मगदूम
गेल्या वर्षीची २२ जुलैची सकाळ केवळ चिपळूनच नाही, तर संपूर्ण कोकणासाठी हादरवून सोडणारी ठरली. कोकणातील महत्त्वाचे शहर असलेले चिपळूण शहर महापुराच्या विळख्यात अडकले होते. अनेक तास माणसे अडकून पडली होती. संपर्क तुटला होता. केवळ घरेच नव्हे, तर चिपळूणची अख्खी बाजारपेठ महापुराच्या मगरमिठीमध्ये अडकली होती. अनेकांचे व्यापार, व्यवसाय सोबत घेऊन गुदमरली होती. हा महापूर का आला? यावर त्यानंतर आरोप-प्रत्यारोप, पुरावे सादर झाले, चौकशी झाली, अहवाल आले. त्यातही चिपळूणमधील वाशिष्ठी नदीतील अनेक वर्षांपासून साचलेल्या गाळामुळे नदीचे पात्र विस्तारले हे एक मुख्य कारण पुढे आले आणि अन्य तांत्रिक कारणांसोबतच महापुराच्या कारणांमधले ते महत्त्वाचे कारण ठरले. त्यानंतर आता या नदीमधील गाळ काढण्याचे काम चिपळूणच्या नागरिकांच्या पाठपुराव्यामुळे हाती घेण्यात आले आहे. मात्र त्याचवेळी केवळ वाशिष्ठीच नव्हे, तर कोकणातील अन्यही नद्यांमधील गाळ काढणे किती आवश्यक आहे हेही स्पष्ट झाले आहे.
कोकण म्हणजे पूर्वेला सह्याद्री पर्वत व पश्चिमेला अरबी समुद्र यांच्यामध्ये वसलेला ७२० किलोमीटर लांबीचा आणि सुमारे ४० ते ६० किलोमीटर रुंदीचा चिंचोळा भूभाग. या तीव्र उताराच्या चिंचोळ्या भागातून अनेक छोट्या-मोठ्या पश्चिमवाहिनी नद्या वाहतात. पूर्वेला सह्याद्री पर्वतात उगम पावून त्या पश्चिमेला अरबी समुद्राला मिळतात. या कोकणामध्ये उत्तर टोकावर, पालघर जिल्ह्यात वैतरणा नदीचं खोरं आहे. सुमारे सव्वाशे किलोमीटर लांबीची ही नदी सह्याद्री पर्वतात नाशिक जिल्ह्यात त्र्यंबक येथे उगम पावते. वैतरणा ही मुंबईची जलदायिनी आहे. मुंबईचा बहुतांश पाणीपुरवठा वैतरणा नदीवर बांधलेल्या मोडकसागर जलाशयातून होतो. दमणगंगा नदी सह्याद्री पर्वतात उगम पावून पालघर जिल्ह्यातून वाहत जाऊन गुजरातमध्ये प्रवेश करते. रायगड जिल्ह्यातल्या राजमाची टेकड्यांवर उगम पावणारी उल्हास नदी उत्तरेकडे वाहत जाऊन वसईच्या खाडीला मिळते. भातसा, काळू, मुरबाडी, पेज, बारवी, पोशीर, शिलार, भिवपुरी आदी छोट्या-छोट्या नद्या उल्हास नदीला येऊन मिळतात. उल्हास नदीतून मुख्यत्वे नवी मुंबई-बदलापूरला पाणीपुरवठा केला जातो. याच रायगड जिल्ह्यात असलेली पाताळगंगा नदी खंडाळ्याच्या घाटात उगम पावते आणि धरमतर खाडीला मिळते, तर अंबा ही नदी रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागात उगम पावून उत्तरेकडे वाहत जाते आणि धरमतर खाडीला मिळते. कुंडलिका ही नदी उत्तर-पश्चिमवाहिनी नदी रोहा, कुडे, कोलाड असा प्रवास करत रोह्याच्या खाडीला जाऊन मिळते. रायगड जिल्ह्यातला सुप्रसिद्ध देवकुंड धबधबा तसेच भीरा जलविद्युत प्रकल्प या नदीवर आहे आणि रायगड जिल्ह्याच्या दक्षिण टोकाला सावित्री नदी येते. महाबळेश्वरला उगम पावलेली ही नदी रायगड जिल्ह्यात पोलादपूर, महाड, माणगाव, श्रीवर्धन असा प्रवास करत हरिहरेश्वर इथे बाणकोटच्या खाडीत अरबी समुद्राला मिळते. ही नदी म्हणजे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याची सीमारेषा आहे. काळ नदी ही सावित्रीची मुख्य उपनदी असून ती उत्तरेकडून वाहत येऊन दासगावजवळ सावित्रीला मिळते. रत्नागिरी जिल्ह्यात उत्तर टोकाला सावित्रीला समांतर भारजा नदी वाहते. मंडणगड तालुक्यातून वाहणारी ही नदी केळशीच्या खाडीला मिळते.
त्यानंतर चिपळूणमधील वाशिष्ठी व संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदी आहे. वाशिष्ठी ही नदी सह्याद्री पर्वतात उगम पावलेली असून चिपळूण तालुक्यातून वाहत जाऊन दाभोळच्या खाडीला मिळते. ही नदी चिपळूणची जीवनवाहिनी आहे. जगबुडी आणि कोंडजाई या दोन नद्या उत्तरेकडून खेड तालुक्यातून वाहत येऊन वाशिष्ठी नदीला मिळतात. ही नदी खारफुटीची जंगले आणि मगरींसाठी प्रसिद्ध आहे. कोयना धरणातून सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे ही नदी बाराही महिने भरलेली असते. वाशिष्ठी नदीला समांतर शास्त्री नदी संगमेश्वर तालुक्यातून वाहते आणि जयगडच्या खाडीला मिळते. बाव नदी ही शास्त्रीची उपनदी आहे. रत्नागिरी तालुक्यात भाट्ये खाडीला मिळणारी काजळी नदी व पूर्णगड खाडीला मिळणारी मुचकुंदी नदी या प्रमुख नद्या आहेत. अर्जुना ही राजापूर तालुक्यातली प्रमुख नदी असून ती जैतापूर खाडीला मिळते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गड नदी, कर्ली नदी, आचरा नदी, तेरेखोल नदी अशा प्रमुख नद्या आहेत. तेरेखोल नदी ही कोकणातली सर्वात दक्षिणेकडची नदी असून तेरेखोलच्या खाडीजवळ ती अरबी समुद्रास मिळते.
कोकणातील या नद्या लांबीने खूप मोठ्या नाहीत. सह्याद्रीमध्ये त्यांचा उगम होऊन त्या अरुंद कोकण पट्ट्यावरून धावत अरबी समुद्राला जाऊन मिळतात. या नद्यांचे किनारे अत्यंत सुपीक मानले जातात. नद्यांच्या किनारी गाळाची सुपीक जमीन तयार झाल्यामुळे कडधान्ये व भाजीपाल्याची शेती होते. सह्याद्रीच्या तीव्र उतारामुळे छोटी धरणे बांधून गुरुत्वाकर्षणाने पाणीपुरवठा करणं शक्य होतं; परंतु या नद्यांमधील गाळ काढणे, त्यांचे खोलीकरण करणे या गोष्टींकडे होणारे दुर्लक्ष गेल्या काही वर्षांपासून कोकणातील नद्यांच्या पुराच्या वाढत्या प्रमाणाचे कारण ठरले आहे. गत वर्षी चिपळूण महापुराने वेढले गेले आणि त्यानंतर त्याची वेगवेगळ्या प्रकारे कारणमिमांसाही झाली. कोळकेवाडी धरणातील अतिरिक्त पाणी साठ्यामुळे हा महापूर आला इथपासून वेगवेगळ्या गोष्टींवर तर्क काढले गेले, समिती नेमून अभ्यास करण्यात आला. मात्र अखेरीस वाशिष्ठी नदीमधील गाळ काढणे आणि खोलीकरण करणे हेच महत्त्वाचे मुद्दे ठरले आणि नाम या सामाजिक संस्थेसह स्थानिक नागरिक, अन्य विविध संस्था, लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून हे काम चिपळूण येथे सुरू झाले सुद्धा!
पण केवळ वाशिष्ठी महापुराने वेढली म्हणून तिच्यापुरता गाळ काढण्याचा कार्यक्रम घेऊन हा प्रश्न सुटणार आहे का, हा मुख्य मुद्दा आहे. कोकणात भविष्यात महापुरासारखी परिस्थिती निर्माण होऊ न देण्यासाठी आता व्यापक विचार करण्याची गरज आहे.