
मुंबई : सामाजिक न्याय मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याकडे एका महिलेने पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित महिलेविरोधात मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास सध्या गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. दरम्यान धमकावणाऱ्या रेणू शर्मा हिला पोलिसांनी अटक केली आहे. अटक केल्यानंतर रेणू शर्मा यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी म्हणजेच २३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंडे यांच्याकडे एका परिचित महिलेने पाच कोटी रुपयांची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास बलात्कार केल्याची तक्रार करण्याची धमकी या महिलेने दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी आणि मार्च दरम्यान एका परिचित महिलेने मुंडे यांना आंतरराष्ट्रीय नंबरवरून फोन करून खंडणीची मागणी केली. या महिलेने आपल्याकडे पाच कोटी रुपयांचं दुकान आणि एक महागडं घड्याळ मागितल्याचे मुंडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच ही मागणी पूर्ण न झाल्यास बलात्काराची तक्रार करण्यासह सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी या महिलेने दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, महिलेने केलेल्या मागणीनंतर मुंडे यांनी सदर महिलेला परिचिताकरवी कुरियरच्या माध्यमातून ३ लाख रुपये आणि महागडा मोबाईल पाठवला होता. पण या महिलेने ५ कोटींसाठी तगादा लावला. त्यामुळे अखेर मुंडे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर सदर महिलेविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.