सिंधुदुर्ग : चिपी विमानतळावरून मुंबईला जायचं असेल तर आता एअर इंडियाच्या साईटवरून बुकींग बंद झाले आहे. त्याऐवजी या विमानतळासाठी सेवा देणाऱ्या अलायन्स एअर या कंपनीच्या वेबसाईटवरून तिकीट बुकिंग सेवा सुरु झाली असल्याची माहिती अलायन्स एअरचे अधिकारी समीर कुलकर्णी यांनी आज दिली.
चिपी विमानतळ झाल्यामुळे सिंधुदुर्गवरून मुंबईचा प्रवास करता येतो. रोज एक विमान त्यासाठी सेवा देते. आतापर्यंत त्यासाठी एअरइंडियाच्या साईटवर जाऊन तिकीट बुकिंग करता येत होते. पण १५ एप्रिल पासून एअर इंडिया टाटा कंपनानीने घेतल्याने एअर इंडियाने आपल्या साईटवरून सिंधुदुर्ग बुकिंग बंद केले आहे . मुंबई ते चिपी आणि परत या मार्गासाठी एअर इंडियाची संलग्न कंपनी अलायन्स एअर हि सेवा देते. पण आता एअर इण्डिया टाटानी घेतल्याने या दोन कंपन्या वेगळ्या झाल्या. त्यामुळे अलायन्स एअर या कंपनीच्या साईटवरून सिंधुदुर्ग-मुंबई विमानप्रवासाचे तिकीट बुकिंग उपलब्ध झाले आहे. www.allianceair.in अशी ही वेबसाईट असून या वेबसाईटवर तिकीट बुकिंग उपलब्ध असल्याची माहिती समीर कुलकर्णी यांनी दिली.
त्याच बरोबर उडान योजनेअंतर्गत ३५ सीट्स राखीव असून त्यासाठी रु. २४२५/- तिकीट आहे. पण त्यानंतरचा तिकीट दर कंपनीच्या दराप्रमाणे उपलब्ध असल्याचे श्री. कुलकर्णी यांनी सांगितले.
विमानाच्या वेळाबाबतीतही श्री. कुलकर्णी यांनी माहिती दिली. आठवड्यातून बुधवार, शुक्रवार आणि रविवार या तीन दिवशी सिंधुदुर्ग विमानतळावरून सकाळी ९.५५ वाजता विमान सुटेल. तर सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार या दिवसांसाठी दुपारी १.५० वा. विमान सुटेल असे समीर कुलकर्णी यांनी सांगितले.