खेड (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात चिपळूणकडे जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना धामणदेवी गाव हद्दीत मंगळवारी स. ६.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पलायन केले.
महामार्ग पोलीस केंद्र कशेडीचे हद्दीमध्ये मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ वर धामणदेवी गावच्या हद्दीत कशेडी घाटामध्ये मंगळवारी सकाळी ६.४५ वाजण्याचे दरम्यान तळोजा ते लोटे जाणारा ट्रक अज्ञात चालकाने ओव्हरटेक करून राँग साइडला जाऊन समोरून पेढांबे चिपळूण ते मुंबईकडे जाणारी दुचाकी क्रमांक (एम एच -०८-ए व्ही -३७२६) वरील चालक अथर्व मोहन सावंत (वय २५, रा. पेढांबे, तालुका चिपळूण) यांचे मोटर सायकलला जोराची ठोकर देऊन अपघात केला.