मुंबई : आमदार रवी राणा दाम्पत्य २३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार आहेत. राणांसोबत ५०० हून अधिक कार्यकर्ते असणार आहेत.
रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले होते की त्यांनी हनुमान चालिसेचे पठण करावे, नाहीतर आम्ही स्वतः येऊन मातोश्रीसमोर पठण करू. त्याप्रमाणे राणा दाम्पत्य आता २२ एप्रिल रोजी मुंबईत जाणार असून २३ एप्रिलला ते हनुमान चालिसा पठण करणार आहेत.
याबद्दल बोलताना रवी राणा म्हणाले की, हनुमान जयंतीच्या दिवशी मी उद्धव ठाकरेंना आवाहन केले होते की महाराष्ट्रात जेव्हापासून मुख्यमंत्री झालेत तेव्हा सगळ्या महाराष्ट्राला ग्रहण लागले होते. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे श्रद्धास्थान मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालिसा पठण करा. पण हनुमान जयंतीच्या शुभ पर्वावर त्यांनी हे पठण केले नाही. त्यामुळे २२ एप्रिलला आम्ही निघणार आहोत आणि मातोश्रीसमोर हनुमान चालिसा वाचू. ज्याप्रमाणे वारी शांततेत निघते, त्याप्रमाणे आम्ही शांततेत हे पठण करणार आहोत. कोणताही गोंधळ होणार नाही. शांततापूर्वक आम्ही हनुमान चालिसा वाचून महाराष्ट्राच्या शांतीसाठी प्रार्थना करू.