Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीमुरुडला पर्यटन फुलू लागले

मुरुडला पर्यटन फुलू लागले

पर्यटकांकडून तालुक्यात लॉजिंग बुकिंग सुरू

मुरूड (वार्ताहर) : इयत्ता १०वी-१२वीच्या परीक्षा संपून या आठवड्यात सलग सुट्ट्यादेखील आल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर राज्यातील पर्यटक रायगडच्या समुद्रकिनारी असलेल्या विविध पर्यटन ठिकाणांकडे वळू लागले आहेत. १ मेनंतर उन्हाळी सुट्टी सुरू होणार असल्याने आणि कोरोनामुक्त वातावरणामुळे कुटुंबासमवेत मोठ्या संख्येने पर्यटक या हंगामामध्ये फिरण्यासाठी समुद्रकिनारी येऊ लागले असल्याने हळूहळू मुरुडचे पर्यटन फुलू लागले आहे.

कोरोनामुक्त वातावरणामुळे रायगडातील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन आदी समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून जातील, असे स्पष्ट संकेत बुधवारी लॉजिंग आणि हॉटेल्स व्यावसायिकांनी बोलताना दिले होते. वरील तिन्ही ठिकाणी जलवाहतुकीची मोठी साधने उपलब्ध असल्याने वाहने आणि प्रवासी वाहतूक जलद आणि नजीकच्या मार्गाने जोडली गेली असून भविष्यात मुंबई ते काशीद बीचपर्यंत क्रूझ जलवाहतूक सुरू होणार असल्याने रायगडचे समुद्रकिनारे आधिक लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्यासाठी आणि व्यावसायिकांसाठी समुद्रकिनारी वाढते पर्यटन म्हणजे मोठे उत्पन्न देणारा उद्योग ठरणार आहे. कोकणातील सर्वच किनारे रमणीय असून अधिक मोठ्या संख्येने पर्यटक किनारी पर्यटनाकडे खेचले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रखडलेले उत्तम रुंद रस्ते प्राधान्याने पूर्ण व्हायला हवेत. या आठवड्यात गुरुवारपासून पर्यटकांची वर्दळ सुरू झाली आहे. मुरुडमध्ये पर्यटकांची लॉजिंग बुकिंग सुरू झाल्याची माहिती हिरा रेसिडेन्सी लॉजचे मालक महेंद्र पाटील यांनी दिली. सलग सुट्टी असल्याने चाकरमानी वर्ग कुटुंबातील सदस्यांना घेऊन पर्यटनासाठी बाहेर पडतील, असे संकेत पाटील यांनी बोलताना दिली.

रायगडच्या किनाऱ्यावर वॉटर स्कुटर्स, बनाना राइडर्स, समुद्रातील बोटिंग असे जलक्रीडांची साधनेही उपलब्ध झाली आहेत. श्री हरिहरेश्वर (दक्षिण काशी), दिवेआगर, जीवना बीचकडे जाण्यासाठी अलिबागहुन मुरुड तालुका मार्गे आगरदांडा ते दिघी खाडीतून जंगल जेटीने वाहने घेऊन थेट जाण्याची सुविधा रात्रीपर्यंत उपलब्ध आहे. याचाच अर्थ अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन हा सागरी किनारा पर्यटन विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. रायगडात धार्मिक, ऐतिहासिक, आणि निसर्गरम्य अशी स्थळे भरपूर आहेत. शिवाय पुढे रत्नागिरीकडे जाण्यासाठी हाच जलमार्ग महत्त्वाचा ठरणार आहे.

रस्त्याच्या समस्या सुटाव्यात

वळणावळणाचे रस्ते ही रायगडची अनेक वर्षांपासूनची डोकेदुखी आहे. त्यामानाने बारामती, सोलापूर, कोल्हापूरचे सरळ आणि रुंद डांबरी रस्ते पाहून अवाक व्हायला होते. कोकणात पाऊस भरपूर पडतो, हे माहीत असूनही मजबूत आणि नवीन तंत्रज्ञानाचे रस्ते होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात रस्ते करतानाही हे डांबर आहे की काळे तेल, हेच हल्ली समजून येत नाही.

पर्यटकांसाठी पर्वणी

रायगडातील मुरुड-जंजिरा तालुका ऐतिहासिक वास्तू आणि निसर्गरम्य तालुका म्हणून प्रसिद्ध असून जंजिरा संस्थानची राजधानी होती. बारशिव, काशीद, सर्वे, नांदगांव, मुरुड असे पाच ते सात समुद्र बीच तालुक्यात असून येथील किनाऱ्यावर फिरण्यात पर्यटकांना वेगळीच मौज वाटते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -