सीमा दाते
मुंबई : मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर ८ मार्च २०२२ला पालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. पालिकेवर प्रशासक नियुक्त केल्याला गुरुवारी महिना पूर्ण झाला असून पालिकेचे कामकाज ठप्प असल्याचेच चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे येत्या काही काळात विकासकामे आणि नागरिकांच्या समस्यांचे निवारण होणार का? हा प्रश्न उभा राहत आहे. दरम्यान पालिकेचा कालावधी संपल्याने राज्य सरकारने पालिकेवर पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना प्रशासक म्हणून नियुक्त केले असून ते कामकाज बघत आहेत.
संपूर्ण जबाबदारी ही प्रशासकवर आली आहे. यासाठी पालिकेतील विकासकामे करता यावीत, प्रस्ताव मंजूर करता यावेत, यासाठी आयुक्तांनी राज्य सरकारला पत्र देऊन विविध समित्या स्थापन करण्याची मागणी केली होती. त्यावर प्रशासक नियुक्त केले असल्याने आयुक्तांनीच यावर निर्णय घ्यावा, असे सरकारने कळविले होते. त्यानुसार स्थायी, सुधार तसेच शिक्षण, बेस्ट, आरोग्य, स्थापत्य, विधी व महसूल, महिला व बालकल्याण यासाठी एकूण तीन समित्या स्थापन करण्याचा विचार सुरू आहे.
मात्र यावर अद्याप निर्णय झालेला नाही. यामुळे प्रशासक नियुक्त होऊन एक महिना झाला तरी नालेसफाई, चर बुजवणे अशी महत्त्वाची कामे सुरू झालेली नाहीत. तसेच या समित्यांवर अध्यक्ष म्हणून माजी सनदी अधिकारी जॉनी जोसेफ यांची नियुक्ती केली जाणार असल्याची चर्चा आहे. याबाबत पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत आपल्याला काही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
कोणते प्रस्ताव मंजूर झाले?
नालेसफाईचे १६२ कोटींचे, तर रस्त्यावरील चर बुजवण्याचे ३८३ कोटींचे असे एकूण ५५४ कोटींची कंत्राटे मंजूर करण्यात आली आहेत. राणी बागेतील प्राण्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या पिंजऱ्यांचा प्रस्ताव पालिका आयुक्तांनी रद्द केला आहे. याशिवाय कोणतेही प्रस्ताव मंजूर झालेले नाहीत.