Friday, May 9, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

‘मातोश्री’ला दिले दोन कोटी?

‘मातोश्री’ला दिले दोन कोटी?

मुंबई (प्रतिनिधी) : बृहन्मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या बेनामी प्रॉपर्टीवर सध्या आयकर विभाग (इन्कम टॅक्स) आणि ईडीच्या धाडी सुरू आहेत. त्यात जाधव यांच्या डायरीतील नोंदीतील ‘मातोश्री’चा उल्लेख चर्चेत आहे.


यशवंत जाधव यांच्या डायरीमध्ये कोट्यवधींच्या व्यवहाराच्या नोंदी आहेत. यात मातोश्रीला दोन कोटी दिल्याचा उल्लेख असल्याची माहिती आयकर विभागाच्या माहितगारांनी दिली आहे. ‘मातोश्री’ला २ लाख ५० लाख रुपयांचे घड्याळ दिल्याचाही डायरीत उल्लेख आहे. मात्र डायरीतील ‘मातोश्री’ म्हणजे, आपल्या आई असल्याचा दावा जाधव यांनी केला आहे. आता आयकर विभागाकडून या संदर्भात तपास सुरू आहे. आयकर विभागाने जाधव यांच्या घरी छापेमारी करून दस्ताऐवज जप्त केले होते. तसेच विमल अग्रवाल यांच्या घरीही आयकरने छापेमारी केली होती.


आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना नेते यशवंत जाधवांवर आयकर विभागाकडून कारवाई सुरू आहे. जानेवारी महिन्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. मुंबईतील कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तसेच यामध्ये मनी लॉन्ड्रिंग केल्याचाही गंभीर आरोपही सोमय्यांनी जाधवांवर केला होता. जाधव यांच्या बेनामी प्रॉपर्टी प्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना इन्कम टॅक्स विभागाने नोटीस पाठवली आहे. यापूर्वी, १० मार्च २०२२ रोजी आयकर विभागाने चहल यांना नोटीस पाठवली होती. त्याला चहल यांनी उत्तर दिले होते. आता पुन्हा एकदा त्यांना प्राप्तिकर विभागाने नोटीस पाठवली आहे.


आयकर विभाग योग्य चौकशी करेल : फडणवीस


यशवंत जाधव यांची आयकर विभाग चौकशी करत आहे. त्यामुळे या विषयावर अधिक बोलणे योग्य होणार नाही. त्यांनी कोविडच्या काळात २४ महिन्यांत ३८ मालमत्ता खरेदी केल्या आहेत. कोविड काळात मुंबई महापालिकेला लुटले आहे. डायरीत नेमकी काय नोंद आहे, हे मी पाहिलेले नाही. मात्र आयकर विभाग ज्या काही नोंदी आहेत त्यासंदर्भात योग्य चौकशी करेल, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली.


‘मातोश्री’बाबत अनभिज्ञ, पण चौकशीतून कुणाचीही सुटका नाही : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : यशवंत जाधव यांच्याकडे आयकर खात्याला कसली डायरी सापडली आणि त्यात कोणत्या ‘मातोश्री’ची नोंद आहे, हे मला माहिती नाही. पण मला एवढेच दिसते आहे की, चौकशीतून कोणीही सुटू शकत नाही आणि खूप काही होणार आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे सांगितले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काहीही आरोप केले तरी केंद्रीय तपास यंत्रणा स्वायत्त आहेत, ही वस्तुस्थिती आहे, असे पाटील यांनी यावेळी सांगितले. संबंधित डायरीची ईडीकडून चौकशी व्हायला हवी, या आमदार अतुल भातखळकर यांच्या मागणीचे पाटील यांनी समर्थन केले.

Comments
Add Comment