मुंबई : कोणाच्याही बंधनात न अडकता स्वछंदी जीवन जगणं हे आजच्या तरुण – तरुणींचं भावविश्व निर्माण झालं आहे. साईराज प्रॉडक्शन निर्मित “द अनटोल्ड स्टोरी ऑफ – “वुमन” हे नाटक सध्या रंगभूमीवर सुरू असून त्याला खास करून महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ऋषिकेश घोसाळकर लिखित आणि दिग्दर्शित “वुमन” या नाटकाचा विषय बोल्ड असून आजच्या युवतींचं जग आणि त्यांचं भावविश्व साकारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
“वुमन” हे चारचौघी मैत्रिणींच्या सभोवताली फिरणारं नाटक आहे. रिया या टूर कंपनीत कामाला असलेल्या तरुणीच्या घरात हे नाटक घडते. तिची बिनधास्त मैत्रिण केतकी ही कॉल सेंटरला कामाला आहे. या दोघींसोबत पेईंग गेस्ट म्हणून मॉडेल असणारी सेजल व कारच्या शोरूम मध्ये नोकरीस असलेली शमा राहत असतात. त्याचबरोबर कंगणा नावाची कामवाली, रियाचा मित्र सदानंद व रियाचे खलनायकी वडील यांचीही हजेरी यात आहे. या चौघींचं भावनिक नातं यात जुळलं जातं. यात हेलावून सोडणारी प्रत्येकाची एक कहाणी व व्यथा आहे. नव्या पिढीचं प्रतिनिधित्व त्यात आहे. एकूणच कथानकातून तरुणींचं मानसिक, भावनिक व शारीरिक प्रश्न यात मांडले आहेत. आजची स्त्री जगाच्या दृष्टीने ‘मुक्त’ झाली असली तरी तिचे व्यक्तिमत्व खर्या अर्थाने मुक्त झाले आहे काय? एक उपभोग्य वस्तु म्हणून तिच्याकडे आजही बघितले जाते त्यातून बलात्कार, अत्याचार, खूनही होतात. समविचारी युवतींना एकत्र आनंदाने जगावे, हा विचार या नाटकातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
लेखक – दिग्दर्शक व निर्माते ऋषिकेश घोसाळकर यांनी आत्तापर्यंत अनेक लोकप्रिय बालनाटये व व्यावसायिक नाटकं सादर केली आहेत. त्यांचे “हरी आला दारी” हे व्यावसायिक नाटक खुपच लोकप्रिय झाले होते. “वुमन” हे त्यांचे ११ वे व्यावसायिक नाटक आहे. “वुमन” या नाटकातून त्यांनी आजच्या तरुणींचं भावविश्व साकारलं असून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न या नाटकातून केला आहे. यात हिमांगी सुर्वे, प्रियांका कासले, विभूति सावंत, सायली चौगुले, अक्षता साळवी, विनोद देहरे, सनीभुषण मुणगेकर आणि ऋषिकेश घोसाळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या नाटकाचे संगीत दयानंद दाभोळकर, विशेष आभार गोट्याकाका सावंत, सुत्रधार शेखर दाते, नेपथ्य प्रविण भोसले, नृत्ये स्नेहल अमृते, रंगभूषा देवा सरकटे यांची आहे. महिलांच्या पसंतीस उतरलेलं, हसता हसता गंभीर विषयाकडे नेऊन अंतर्मुख करणारं आजच्या तरुणींचं हे नाटक आवर्जून बघावं असंच आहे.