Thursday, July 25, 2024
Homeमहत्वाची बातमीएसयूव्ही - भारतीय कार बाजाराचे आकर्षण

एसयूव्ही – भारतीय कार बाजाराचे आकर्षण

भारतातील वाहनांची बाजारपेठ प्रचंड गतिमान आहे. येथे दर तिमाहीत कल बदलत असतात. सध्या कार्सची खरेदी डिजिटल पद्धतीने होत असल्याचे आपल्याला दिसत आहे. तसेच यापूर्वी कधीही झाली नव्हती एवढी वाहनांची विक्रमी नोंदणी या उद्योगाने अनुभवली आहे. भारतीय ग्राहक, ‘जेवढी मोठी कार, तेवढी बरी’, या मानसिकतेचा आहे. त्या दृष्टीने, ‘सेदान’ व ‘हॅचबॅक’ या वाहनांची मिळून जेवढी विक्री झाली, त्यांपेक्षा जास्त विक्री ‘एसयूव्ही’ गाड्याची झाली, असे वाहन उद्योगाची आकडेवारी पाहिल्यावर समजते. सध्या तर दर तिमाहीत दोन नवीन एसयूव्ही गाड्या बाजारात सादर होत आहेत. नवीन कंपन्या भारतीय बाजारात आल्या, तर त्या थेट येथील प्रचंड मागणी असलेल्या एसयूव्ही क्षेत्रातच उतरत आहेत. या ‘मस्क्युलर’ स्वरुपाच्या मोटारींमध्येच भारतीय वाहन बाजाराचे आकर्षण दडले आहे, हे वाहन उत्पादकांच्याही लक्षात आले आहे. चला समजून घेऊ या, भारतीय कार बाजारपेठेत एसयूव्ही एवढ्या आघाडीवर का आहेत.

डिझाईन हे एसयूव्ही लोकप्रिय होण्याचे एक प्राथमिक कारण आहे. ‘रूफरेल्स’ आणि ‘क्लॅडिंग’ यांसारख्या गोष्टींमुळे या गाडीच्या रंगरुपात फरक पडतो. मोठे टायर, आकर्षक फ्रंट ग्रिल, अॅथलेटिक उंची आणि मोठा व्हीलबेस या सर्व गोष्टी ‘एसयूव्ही’ला अधिक आकर्षक बनवतात. अनेक वाहन उत्पादक ‘मस्क्युलर डिझाईन स्टेटमेंट’ घेऊन येत आहेत. या डिझाईनमुळे गाडीचे रस्त्यावरील अस्तित्व ठळकपणे जाणवते. मुळात भारतीय कार खरेदीदारांना आपल्याकडे लक्ष वेधून घेणे आवडते. ‘एसयूव्ही’चे डिझाईन असलेल्या लहान कार, उर्फ ‘मायक्रो-एसयूव्ही’देखील बाजारात काही प्रमाणात आहेत. अलिकडेच एका भारतीय कार उत्पादकाने खास ‘एसयूव्हीं’साठी आपला मूळ व्यवसाय पुन्हा परिभाषित केला. ‘लॅम्बोर्गिनी’ आणि ‘फेरारी’सारख्या लक्झरी कार उत्पादकांनीही स्पोर्ट्स कार बनविण्याच्या गेल्या अनेक दशकांच्या धोरणानंतर आता आपली पहिली एसयूव्ही सादर केली आहे. ज्यावेळी केवळ स्पोर्ट्स कार बनविणाऱ्या कंपन्या एसयूव्ही घेऊन बाजारात येतात, तेव्हा नक्कीच ग्राहकांच्या संख्येत नक्कीच वाढ झालेली असते, हे सिद्ध होते. म्हणजेच, आता ‘फास्ट कार्स’पेक्षाही सर्वगुणसंपन्न कार्सना अधिक महत्त्व मिळू लागले आहे.

या प्रकारच्या कारसाठी पॉवर हा आणखी मोठा गुण ठरतो. या कारमध्ये जास्त जागा उपलब्ध असल्याने, मोठ्या क्षमतेचे इंजिन व इतर चल स्वरुपाचे भाग त्यात बसविणे उत्पादकांना सोपे जाते. प्रशस्तपणा हा अभियंत्यांना मिळू शकणारा सर्वात मोठा फायदा असतो. मोठी ‘फ्लोअर बेड’ उपलब्ध असल्याने एसयूव्हीमध्ये मोठ्या क्षमतेची बॅटरीदेखील बसू शकते. छोट्या कार्समध्ये हे शक्य होत नाही. ‘एसयूव्ही’मध्ये नावीन्यतेवर कोणतीही मर्यादा येत नाही. त्यामुळेच ही गाडी मोठी आणि चांगली बनू शकते.

प्रत्येकासाठी प्रशस्त जागा! सध्याच्या ट्रेंडनुसार बनविण्यात आलेली आणि शक्तिशाली एसयूव्ही तुमच्याकडे असेल, तर तुम्हा प्रत्येकाला या गाडीत पुरेशी जागा मिळते. कोणत्याही साध्या ‘एसयूव्ही’मध्ये किमान पाच प्रवासी आरामात बसू शकतात, तर मोठ्या ‘एसयूव्ही’मध्ये आठपर्यंत प्रवासी सहज मावतात. या गाडीतून तुम्ही कुटुंबासह लांबच्या सहलींचा आनंद घेऊ शकता, कॅम्पिंगसाठी जाऊ शकता, न चोखाळलेले मार्ग शोधून काढू शकता… आणि हे सर्व अगदी आरामात आणि आत्मविश्वासाने! उच्च-कार्यक्षमता असलेल्या ‘सस्पेन्शन सिस्टीम’सह मोठे टायर आणि चाकांच्या कमानी या वैशिष्ट्यांमुळे एसयूव्ही खडबडीत रस्त्यांवरूनदेखील जणू काही तरंगत जाते. तीव्र वळणांवर ती रस्ता सोडत नाही आणि त्यामुळे तिच्यातील प्रत्येक सफर ही सुरक्षित व आत्मविश्वासपूर्ण ठरते.

‘लक्झरी इंटीरियर’मुळे एसयूव्ही अधिक आकर्षक ठरतात. लक्झरी वाहन निर्मात्यांकडील ‘एसयूव्हीं’मध्ये आतील जागा आणखी मोठी असल्याचा आभास निर्माण करता येतो. ‘अल्कॅन्टरा सीट्स’, भोवतालची प्रकाश व्यवस्था, ‘स्टिरीओ थ्री-डी साउंड सिस्टम’, ‘स्पोर्टियर फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील’, ‘मसाज फंक्शन’ आणि ‘लेग स्पेस’ यांसह सर्व प्रकारच्या लक्झरी या गाडीत मिळू शकतात.

सिद्धार्थ चतुर्वेदी, संस्थापक आणि एमडी, बॉईज आणि मशीन्स

ही सर्व वैशिष्ट्ये एकत्रित केल्याने, इतर प्रकारच्या कार्सपेक्षा एसयूव्ही सर्वार्थाने वेगळी ठरते. तुम्हाला दणकट डिझाइन, विलक्षण शक्ती, प्रशस्त जागा आणि आलिशानपणा या सर्व गोष्टी एकाच पॅकेजमध्ये मिळतात. भारतीय कार बाजारातील हे आकर्षण अनुभवण्यासाठी अधिकाधिक खरेदीदार उत्सुक असतानाच, हा कल विकसित होत आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. काही उत्पादक ‘इलेक्ट्रिक कार’साठीही एसयूव्ही प्रकारच्या गाड्या मुद्दाम विकसीत करीत आहेत आणि भविष्यातील वाहनांच्या श्रेणींमध्ये ‘एसयूव्ही’चा प्रवेश घडवून आणीत आहेत. ‘इलेक्ट्रिक पॉवरट्रेन’मुळे मुळातच गाडी चालवण्याचा खर्च कमी येतो, त्यातच ‘एसयूव्ही’मधील आराम, आलिशानपणा आणि भरपूर जागा या घटकांची भर पडल्यास, उत्पादक व ग्राहक या दोघांसाठी हा उच्च पातळीवरचा व्यवहार ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -