मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईची प्रतिभावंत टेबलटेनिसपटू रिया चितळेने आंतरराष्ट्रीय टेबलटेनिस फेडरेशनच्या (टीटीएफआय) महिला क्रमवारीत (रँकिंग) संयुक्तरीत्या अव्वल स्थान पटकावले. ९ जानेवारी रोजी जाहीर झालेल्या रँकिंगमध्ये दिया हिने रीथ रिश्या (पीएसपीबी) आणि श्रीजा अकुलासह (आरबीआय) पहिल्या स्थानी आहे.
टीएसटीटीएच्या १८ वर्षीय दियाने इंदूरमध्ये झालेल्या यूटीटी राष्ट्रीय रँकिंग टेबल टेनिस स्पर्धेत (मध्य विभाग) जेतेपद पटकावताना ९० रँकिंग गुणांची कमाई केली. त्यामुळे तिची एकूण रँकिंग गुणसंख्या २२५वर गेली. या स्पर्धेतील उपविजेती रीथला ६० तसेच उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या श्रीजा हिला ४५ गुण मिळाले. यूटीटी राष्ट्रीय रँकिंग टेबल टेनिस (मध्य विभाग) स्पर्धेपूर्वी दिया ही जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी होती. मात्र या स्पर्धेत दोन मानांकित खेळाडूला हरवत तिने जेतेपदावर नाव कोरले. त्यामुळे तिने रँकिंगमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली. मध्य विभाग स्पर्धेत दिया हिने उपांत्य फेरीत भारताची नंबर वन आणि अव्वल सीडेड श्रीजा हिच्यावर मात केली. त्यानंतर अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित रीथ रिश्या हिच्यावर चुरशीच्या लढतीत विजय मिळवला.