केपटाऊन (वृत्तसंस्था): वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरासह (५ विकेट) भारताच्या सर्वच गोलंदाजांनी अचूक आणि प्रभावी केला. चौथ्या क्रमांकावरील कीगॅन पीटरसन नडला. तिसऱ्या आणि अंतिम कसोटीतील दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा डाव २१० धावांमध्ये आटोपला. पाहुण्यांनी पहिल्या डावात १३ धावांची नाममात्र परंतु, महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.
प्रमुख फलंदाजांनी निराशा केली तरी पीटरसनने खेळपट्टीवर थांबून राहताना भारताच्या गोलंदाजांची परीक्षा घेतली. त्याच्या १६६ चेंडूंतील नाबाद ७२ धावांच्या खेळीत ९ चौकारांचा समावेश आहे. पीटरसनने वैयक्तिक खेळ उंचावला. शिवाय दोन महत्त्वपूर्ण भागीदाऱ्या केल्या. त्याने रॉसी वॅन डर ड्युसेनसह चौथ्या विकेटसाठी ६७ धावा जोडल्या. दक्षिण आफ्रिकेच्या डावातील ही सर्वाधिक भागीदारी ठरली. त्यानंतर टेंबा बवुमासह पाचव्या विकेटसाठी ४२ धावा जोडल्या. पीटरसननंतर बवुमाचे सर्वाधिक २८ धावांचे योगदान आहे. त्या खालोखाल केशव महाराज (२५ धावा) आणि रॉसी वॅन डर ड्युसेनच्या(२१) धावा आहेत.
दोनशेच्या घरात झेप घेतली तरी १ बाद १७ धावांवरून पुढे खेळणाऱ्या यजमानांना भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने सुरुवातीलाच हादरवले. दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होताच त्याने दुसरा सलामीवीर आयडन मर्करमचा (८) त्रिफळा उडवला. संघाचा अर्धशतकी पल्ला गाठण्यापूर्वी नाईट वॉचमन केशव महाराजही (२५) परतला. उमेश यादवने त्याची विकेट घेतली. पीटरसन आणि रॉसी वॅन डर ड्युसेनने संघाला सावरले. मात्र, ड्युसेनला बाद करत उमेश यादवनेच जोडी फोडली. त्यानंतर आलेल्या टेंबा बवुमाने पीटरसनला थोडी साथ दिली. पीटरसनने आपले अर्धशतक पूर्ण करत एका बाजूला किल्ला लढवला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आधी बवुमाला आणि त्यानंतर काइल वेरेनला बाद करत आफ्रिकेला अजून संकटात टाकले.
तिसऱ्या सत्रात पीटरसनची विकेट घेत बुमराने भारताला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. तरीही तळातील तीन फलंदाजांनी ३४ धावांची भर घातली. पाहुण्यांकडून जसप्रीत बुमरा सर्वात यशस्वी ठरला. त्याने ४२ धावांमध्ये निम्मा संघ गारद केला. त्याचा सहकारी उमेश यादव आणि मोहम्मद यादवने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. शार्दूल ठाकूरला एक विकेट मिळाली. मात्र, ऑफस्पिनर आर. अश्विनला एकही फलंदाज बाद करता आला नाही.
भारताने पहिल्या डावात २२३ धावांची मजल मारली. त्याचे क्रेडिट कर्णधार विराट कोहलीला जाते. त्याने २०१ चेंडूंचा सामना करत १२ चौकार आणि एक षटकारासह ७९ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाने ४ तसेच जॅन्सेनने ३ विकेट घेतल्या.