एसटी संपामुळे ग्रामीण भागात बेकारी वाढणार

पालघर  :एसटी कामगारांच्या संप मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे ग्रामीण जीवनावर त्याचा चांगलाच परिणाम जाणवू लागला आहे. ग्रामीण भागातील जनतेचे दळणवळणाचे साधनच नाहीसे झाल्यामुळे समाजातील सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला आहे.


या संपामुळे कष्टकरी, शेतकरी, रोजंदारीवर काम करणारे वीटभट्टी कामगार व शेतमजूर सध्या हलाखीचे जीवन जगत आहेत. रिक्षाचा खर्च परवडत नसल्यामुळे ग्रामीण भागातील कृषी व बागायती उत्पन्नाच्या खरेदी-विक्री व्यवहारावर संकट आले आहे. वसई तालुक्यातील अर्नाळा, आगाशी, भुईगाव, निर्मळ, नवापूर ज्योती व अन्य काही गावांतील बागायती उत्पन्न दररोज पहाटे एसटी व रेल्वेच्या माध्यमातून मुंबईच्या बाजारात नेण्यात येत असे.


पण गेल्या दोन महिन्यांपासून स्थानिक भूमिपुत्रांना रिक्षाचे अव्वाच्या सव्वा भाडे देऊन मुंबई गाठावी लागत आहे. तसेच, ग्रामीण भागातील गावागावात भरणाऱ्या आठवडे बाजारातील आर्थिक उलाढालही घसरली आहे. या आठवडे बाजारात खरेदी व विक्रीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे विक्रेतेही हवालदिल झाले आहेत. पूर्वी आठवडे बाजारात पाय ठेवायला जागा नसायची. आज हे बाजार ग्राहकांअभावी ओस पडले आहेत.


अशीच परिस्थिती आणखी काही काळ राहिल्यास ग्रामीण भागातील जनतेला जगणे कठीण होईल, अशी भीती सर्वत्र व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यास सारे काही संपल्यात जमा होईल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.





रिक्षाचा खर्च आम्हाला परवडत नाही - आत्माराम पाटील बागायतदार, अर्नाळा



एसटीची सेवा ठप्प झाल्यामुळे भाजीपाला गावातून विरार रेल्वे स्थानकापर्यंत नेणे व तेथून रेल्वेतून दादरच्या घाऊक बाजारात पोहोचवणे हे अग्निदिव्यच असते. रिक्षाचा खर्च आम्हाला परवडत नाही. पूर्वी एसटीतून आम्ही आमचा माल नेत असू. आता त्यासाठी बरीच पदरमोड करावी लागते.




तर ग्रामीण भागातील जनतेचे जीवन उद्ध्वस्त होईल. - अनुसूया भोईर, गृहिणी, शिरगाव विरार पूर्व



आम्ही गावातील १० ते १२ महिला दर गुरुवारी एसटीने मांडवी गावात भरणाऱ्या आठवडे बाजारात जात असू. पण एसटी सेवा बंद झाल्यामुळे आमची पंचाईत झाली आहे. रिक्षाभाडे परवडत नाही. एसटी परवडत होती, पण रिक्षावाले दुप्पट भाडे घेतात. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. संप मिटला नाही तर ग्रामीण भागातील जनतेचे जीवन उद्ध्वस्त होईल. - अनुसूया भोईर, गृहिणी, शिरगाव विरार पूर्व




तर आम्हा विक्रेत्यांचे काही खरं नाही. - चंदन कुर्मी, आठवडे बाजारातील विक्रेता,



एसटी संपामुळे आठवडे बाजारातील खरेदी व्यवहारात घट झाली आहे. पूर्वी दिवसाकाठी तीन ते चार हजारांची विक्री होत असे. आता ती हजार ते बाराशेवर आली आहे. एसटी संपाचा हा परिणाम असून तो लवकर मिटला नाही तर आम्हा विक्रेत्यांचे काही खरं नाही. - चंदन कुर्मी, आठवडे बाजारातील विक्रेता,



पायी चालत जावे लागते. - सुखदेव बापू, शेतमजूर कोपरी



मी शेतात शेतमजूर म्हणून काम करतो. वाडी साफसफाई करणे, झाडांना पाणी देणे, खत टाकणे अशी कामे करत असायचो. आता एसटी संपामुळे मला कामाच्या ठिकाणी जाता येत नाही. रस्ते खडबडीत असले तरी एसटी जायची पण रिक्षावाले यायला तयार नसतात. त्यामुळे पायी चालत जावे लागते. - सुखदेव बापू, शेतमजूर कोपरी



अन्यथा ग्रामीण भाग बेकारीमध्ये होरपळेल. - सुनंदा निजाई, दांडी, तारापूर, मच्छीविक्रेता



मी दररोज पहाटे एसटीने मच्छीच्या पाट्या नेत असे. पण आता या संपामुळे बंद झाले. रिक्षा परवडत नसले तरी सहन करत व्यवसाय करावा लागतो. सरकारने हा संप लवकरात लवकर मिटवावा, अन्यथा ग्रामीण भाग बेकारीमध्ये होरपळेल. - सुनंदा निजाई, दांडी, तारापूर, मच्छीविक्रेता

Comments
Add Comment

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा