Tuesday, June 24, 2025

गणपतीपुळे येथे पर्यटकाचा बुडून मृत्यू

रत्नागिरी (प्रतिनिधी) :तालुक्यातील गणपतीपुळे येथे फिरायला आलेल्या मूळ उत्तरप्रदेशमधील ५ पर्यटकांपैकी एकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. तर चौघांना वाचवण्यात जीव रक्षकांना यश आले असून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना रविवारी सायंकाळी घडली.



रत्नाकर कल्पनाथ सरोज (२४) असे बुडून मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. तर गोलू समरजित सरोज (२६), रोहित संजिवन वर्मा (२३), कपिल रामशंकर वर्मा (२८), मयुर सुधीर मिश्रा (२८) यांना वाचवण्यात जीवरक्षकांना यश आले आहे. हे सर्वजण गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी आले होते. रविवारी सायंकाळी समुद्रस्नानाचा आनंद घेण्यासाठी ते समुद्रात गेले असता रत्नाकर सरोज याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. ही बाब त्यांच्या साथीदारांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून जीव रक्षक अक्षय माने, ओंकार गवाणकर, आशिष माने, अनिकेत राजवाडकर, मयुरेश देवरुखकर यांनी समुद्रात उड्या घेऊन पाचही जणांना पाण्याबाहेर काढले. परंतु, रत्नाकर सरोज याच्या नाका-तोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला.

Comments
Add Comment