मुंबई : सलामीवीर मयांक अगरवालच्या (खेळत आहे १२०) नाबाद शतकाच्या जोरावर भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीमध्ये पहिल्या दिवसअखेर शुक्रवारी पहिल्या डावात ४ बाद २२१ धावा केल्या. पावसामुळे मैदान ओले असल्याने जवळपास दोन तास उशिराने सामना सुरू झाला. त्यामुळे २० षटकांचा खेळ वाया गेला.
मयांकने अख्खा दिवस खेळून काढताना वैयक्तिक खेळ उंचावला. शिवाय तीन अर्धशतकी भागीदाऱ्या रचल्या.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मयांकने शुबमन गिलने दमदार सुरुवात करताना ८० धावांची सलामी दिली. २८व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर डावखुरा फिरकीपटू अजाझ पटेलने गिलला रॉस टेलरकरवी झेलबाद केले. गिलने ७१ चेंडूंत ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४४ धावा केल्या. त्यानंतर त्याच्या पुढच्याच षटकात चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली बाद झाले. दोघांनाही खाते उघडता आले नाही. पुजारा पाच चेंडू खेळून त्रिफळाचीत झाला. विराट पायचीत झाला. तो चार चेंडू मैदानावर टिकला. अनुभवी फलंदाज पुजारा आणि कोहली बाद झाल्यानंतर मयांकने मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यरसह चौथ्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी करताना संघाला सावरले. चहापानाआधी ही जोडी फोडण्यात एजाझला यश आले. त्याने श्रेयसला (१८) यष्ट्यांमागे टॉम ब्लंडेलकरवी झेलबाद केले.
चहापानानंतर मयांकने वृद्धिमान साहासह पाचव्या विकेटसाठी ६१ धावा जोडताना भारताला दोनशेपार नेले. तसेच वैयक्तिक चौथे शतकही पूर्ण केले. पहिल्या दिवसअखेर भारताने ७० षटकात ४ बाद २२१ धावा केल्या असून मयंक १४ चौकार आणि ४ षटकारांसह १२० तर वृद्धिमान साहा २५ धावांवर खेळत आहेत. न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाझ पटेलने भारताच्या चारही विकेट घेतल्या. त्याने विराट कोहलीसह शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि श्रेयस अय्यर यांना बाद केले.
विद्यमान कसोटी मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे दोन सामन्यांत चार कॅप्टन पाहायला मिळाले. पहिल्या कसोटीमध्ये विराट कोहलीने विश्रांती घेतल्याने उपकर्णधार अजिंक्य रहाणेने हंगामी नेतृत्वाची धुरा सांभाळली. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन होता. दुखापतीचे कारण पुढे करताना दुसऱ्या कसोटीमध्ये हंगामी कर्णधार रहाणेला संघाबाहेर ठेवले. भारताचा नियोजित कॅप्टन कोहली मुंबईत परतला, पण दुखापतीमुळे विल्यमसन खेळू शकला नाही. त्यामुळे मुंबई कसोटीत कोहली आणि टॉम लॅथमने आपापल्या संघांचे नेतृत्व केले.
मयांकचे १६ सामन्यांतील हे चौथे शतक आहे. यापूर्वी, इंदूरमध्ये (१४ नोव्हेंबर २०१९) बांगलादेशविरुद्ध त्याने द्वि(शतकी) खेळी केली होती. त्यानंतर १३ डावांमध्ये अगरवालला केवळ एक अर्धशतक झळकावता आले. विद्यमान मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध (१३ आणि १७ धावा) त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले. मात्र, मुंबईत नाबाद शतक ठोकताना मयांकने दमदार पुनरागमन केले.
पुनरागमन करणारा भारताचा नियोजित कर्णधार विराट कोहलीला खातेही उघडता आले नाही. तिसऱ्या अंपायर्सच्या निर्णयानंतरही पॅव्हेलियनमध्ये परतत असताना त्याने राग व्यक्त करताना चौकाराच्या सीमारेषेरवर जोराने बॅट जोरात आपटली.
चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर विराट चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आणि ४ चेंडू खेळूनही त्याला खाते उघडता आले नाही. फिरकीपटू एजाज पटेलने त्याला पायचीत केले. विराटने मैदानावरील पंचांच्या निर्णयाला आव्हान देताना डीआरएसचा वापर केला.
चेंडू त्याच्या बॅटला आणि पॅडला एकाच वेळी लागल्याचे रिव्ह्यूमध्ये आढळून आले. यामुळे तिसऱ्या अंपायरनेही निर्णय कायम ठेवला. अंपायर्सच्या या निर्णयावर सोशल मीडियावर काही चाहते चांगलेच संतापले. विराटच्या बाद होण्याशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. काही टीव्ही समालोचकांनीही विराटचे समर्थन केले आणि पंचांच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले. युएईत झालेल्या आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकपनंतर विराटने विश्रांती घेतली होती. कानपूर कसोटीतही तो खेळला नव्हता.
पुणे : हवाई प्रवास करताना योग्य दरात आणि गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने पुणे…
फ्रांन्सशी झाला ६४ हजार कोटी रुपयांचा करार नवी दिल्ली: भारत सरकार नौदलासाठी 26 राफेल मरीन…
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तानात तणावपूर्ण वातावरण आहे. हे संबंध आणिखी ताणले जाऊ…
मागील पाच वर्षांत लागले एक हजार वणवे; ९० टक्के मानवनिर्मित; वनसंपदेला वाढता धोका अलिबाग :…
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २५ हिंदू पर्यटक आणि एक स्थानिक…
मुंबई : लखनऊ सुपर जायन्ट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात काल ( दि .२७) पार पडलेल्या…