मुंबई (प्रतिनिधी) : महापालिका निवडणूक जवळ येऊ लागली असताना मुंबईत होर्डिंगबाजी पाहायला मिळत आहे. सध्या मोक्याच्या ठिकाणी बेकायदा शुभेच्छा फलक झळकल्याचे दिसत आहेत. मात्र पालिका प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
आगामी पालिका निवडणूक आणि दिवाळीनिमित्त शहरातील चौकाचौकांत, रस्त्यावर राजकीय पक्षांची फलक बाजी सुरू आहे. जाहिरात धोरणानुसार शहरातील काही मोजक्या जागा निश्चित केल्या आहेत. मात्र असे असताना जिथे जागा मिळेल तिथे शुभेच्छा फलक झळकताना दिसत आहेत.
फलक लावण्यासाठी विभाग कार्यालय स्तरावर तसेच पालिका मुख्यालयातून परवानगी घेतल्याशिवाय फलक लावता येत नाहीत. तसेच अधिकृत फलकावर पालिकेची परवानगी प्रत किंवा परवानगी क्रमांक प्रसिद्ध करणे आवश्यक असते; परंतु हा नियम डावलल्याचे दिसत आहे. त्यामुळे कारवाई करण्याची मागणी होत आहे.