
मुंबई (प्रतिनिधी) : महापालिका कर्मचारी आणि बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांना पालिकेने २० हजार रुपये बोनस जाहीर केला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आगामी महापालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून बोनसची घोषणा केली असल्याची चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे, पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना पुढील तीन वर्षे २० हजार रुपयेच बोनस दिला जाणार असल्याचे जाहीर केले आहे, मात्र यामुळे पालिकेवर २५४ कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडणार असल्याचे सांगण्यात येते.
गेले दोन दिवस पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनस बाबत बैठक होती, मात्र दोन दिवसांनंतर शुक्रवारी याबाबत घोषणा करण्यात आली आहे. पालिका कर्मचाऱ्यांना बोनस वाढवून द्यावा, यासाठी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर गुरुवारी बैठक झाली. मात्र बोनस किती वाढवावा? याबाबत कोणताच निर्णय झाला नव्हता, त्यामुळे शुक्रवारी पुन्हा मुखमंत्र्यांच्या उपस्थितीत कामगार संघटना, महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर सुहास वाडकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर, पालिका आयुक्त तसेच बेस्टचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये इतका बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २० हजार रुपये बोनस पुढील तीन वर्षे म्हणजेच २०२३ - २४ पर्यंत दिला जाणार आहे.
