नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोक्योऑलिम्पिकमधील भालाफेकमध्ये सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रासह एकूण ११ क्रीडापटूंची यंदाच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी (२०२१) शिफारस करण्यात आली आहे. एकाच वेळी ११ खेळाडूंची शिफारस करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
नीरजसह इतर टोक्योतील ४ पदकविजेत्या खेळाडूंची खेलरत्नसाठी शिफारस झाली आहे तर टोक्यो पॅरालिम्पिकमधील अनेक विजेत्यांपैकी ५ खेळाडूंचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी तयार करण्यात आलेल्या समितीने ११ खेलरत्नांव्यतिरिक्त ३५ अर्जुन पुरस्कारांसाठी खेळाडूंची शिफारस केली.नीरज व्यतिरिक्त टोक्योऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमध्ये चमकलेल्या इतर काही खेळाडू, महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज आणि फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यांचीही देशाच्या सर्वोच्च नागरी क्रीडा सन्मानासाठी शिफारस झाली आहे.
खेलरत्न पुरस्कार शिफारस केलेल्यांमध्ये नीरज चोप्रा व्यतिरिक्त मिताली राज, सुनील छेत्री, कुस्तीपटू रवी दहिया, बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन, हॉकी संघाचा गोलकीपर पी.आर. श्रीजेश, बॅडमिंटनपटू प्रमोद भगत, भालाफेकपटू सुमित अंतिल, नेमबाज अवनी लेखरा, बॅडमिंटनपटू एम. कृष्णा नागर आणि नेमबाज एम. नारवाल यांचा समावेश आहे. याचबरोबर शिखर धवनसह ३५ खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.