मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात अतिवृष्टीच्या संकटामुळे झालेल्या नुकसानीची आकडेवारी सादर करत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. सरकारने अद्याप पंचनामे केले नसून नुकसानग्रस्तांना कोणतीही मदत दिलेली नसल्याचा आरोपही केला आहे. यावेळी त्यांनी राजकीय विषयावरही भाष्य केले असून महाविकास आघाडीतल्या सगळ्यांची डोकी तपासण्याची वेळ आली आहे, असे विधान केले आहे.
चंद्रकांत पाटील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांना विजय वडेट्टीवार यांच्या विधानासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. वडेट्टीवार म्हणाले होते की, देवेंद्र फडणवीसांची जिरवायची असे आमचे नितीन गडकरींसोबत ठरले होते. कारण, त्या दोघांचे जमत नाही. त्यांच्या याच विधानावर बोलताना पाटील म्हणाले, ‘महाविकास आघाडीतल्या सगळ्यांची डोकी तपासायची वेळ आता आली आहे. कारण ज्याला त्याला जे सुचेल ते तो करत आहे आणि जिरवणे वगैरे हे जाहीर सभेत वापरण्याचे शब्द आहेत का? त्यामुळे खोटे बोल पण रेटून बोल हा जो स्वभाव महाविकास आघाडीतल्या नेत्यांचा झाला आहे, त्याचाच तो भाग आहे.
नितीनजी आमच्या सगळ्यांचे नेते आहेत. आमच्या सगळ्यांचे पालक आहेत. ते आम्हा सर्वांची काळजी घेतात. त्यांची विचारांवरची आणि पक्षावरची निष्ठा टोकाची आहे. त्यामुळे वडेट्टीवारांनी हा शोध कुठून लावला ते माहित नाही’.