Tuesday, April 21, 2026

Santosh Deshmukh : 'त्यांच्यावर कुटुंबीयांचा दबाव'..., मस्साजोगच्या सरपंचपदाच्या उमेदवाराचा खळबळजनक आरोप

Santosh Deshmukh : 'त्यांच्यावर कुटुंबीयांचा दबाव'..., मस्साजोगच्या सरपंचपदाच्या उमेदवाराचा खळबळजनक आरोप

संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख ( Santosh Deshmukh ) यांच्या मस्साजोग या गावात राजकीय वातावरण रंगले आहे. मस्साजोग गावच्या सरपंच पदाची पोटनिवडणुक ही बिनविरोध होईल अशी चर्चा होती कारण या जागेसाठी संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी संतोष देशमुख या उभ्या होत्या मात्र आता ही निवडणूक बिनविरोध होणार नसून अश्विनी संतोष देशमुख आणि स्वरूपानंद विश्वनाथराव देशमुख यांच्यात आता थेट लढत होणार आहे. आणखी ३ उमेदवार निवडणूक लढवण्यास इच्छुक होते मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ५ पैकी ३ उमेदवारांनी माघार घेतल्याने ही चुरस अधिकच स्पष्ट झाली आहे.

'त्यांच्यावर कुटुंबीयांचा दबाव' - स्वरूपानंद देशमुख दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निधनाने रिक्त झालेली जागा ही त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख ( Ashwini Santosh Deshmukh )यांना मिळावी यासाठी अनेक जण आग्रही होते मात्र तसे काही घडले नाही. दरम्यान अश्विनी देशमुख यांच्या विरोधात उभे असलेले उमेदवार स्वरूपानंद देशमुख यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. स्वरूपानंद देशमुख यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, अश्विनी देशमुख या स्वतः हून निवडणूक लढवत नसून त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबाचा, विशेषतः त्यांच्या दिराचा मोठा दबाव आहे. काहींची राजकीय महत्त्वाकांक्षा आडवी येत असल्याने अश्विनी देशमुख यांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केला.

...तर गावासमोर नाक घासेन सरपंच पदाची पोटनिवडणूक २८ एप्रिल रोजी होणार असून २९ एप्रिल रोजी मतमोजणी होईल. दरम्यान स्वरूपानंद देशमुख हे पोटनिवडणुकीत उभे राहिल्याने त्यांना अनेकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा 'डमी' उमेदवार म्हणून स्वरूपानंद देशमुख उभे राहिले आहेत, असा आरोप त्यांच्यावर केला जात होता. या आरोपाला त्यांनी प्रत्युत्तर देत खुले आव्हान देत म्हटले आहे की "जर मी कोणाच्या सांगण्यावरून उभा राहिलो आहे हे सिद्ध झाले, तर सर्व गावासमोर नाक घासून त्यांना पाठिंबा द्यायला तयार आहे.

हीच त्यांना खरी श्रद्धांजली यापूर्वी मला ग्रामस्थांनी साडेतीन वर्षे काम करण्याची संधी दिली होती. आता पुढील १८ महिन्यांच्या कार्यकाळात संतोष देशमुख यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल, असेही स्वरूपानंद देशमुख यांनी म्हटले आहे. दरम्यान एकीकडे सहानभूतीची लाट आणि दुसरीकडे अनुभवाचा दावा यापैकी ग्रामस्थ कोणाला कौल देतील हे निवडणूक निकालात दिसून येईल. त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा