मुंबई : लालबागमधील वन अविघ्न पार्क इमारतीच्या १९व्या मजल्यावर लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. आगीपासून वाचण्याचा प्रयत्न करत असताना खाली पडून त्यांचा मृत्यू झाला. सोसायटीच्या सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान दाखवलं असतं तर एक जीव वाचला असता, अशी खंत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली आहे.
दुपारी बाराच्या सुमारास आग लागली. या आगीमधून बाहेर पडण्यासाठी, आपला जीव वाचवण्यासाठी एका व्यक्तीने १९ व्या मजल्यावरुन उडी मारली, त्यात त्याचा मृत्यू झाला. १९ व्या माळ्यावर फर्निचरचे काम सुरु असताना शॉकसर्किट झाले आणि आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरवाजा उघडल्यानंतर आग अंगावर आल्याने सुरक्षारक्षकाने पळण्याचा प्रयत्न केला मात्र तो बाल्कनीमध्ये गेला. तिथे तो लटकत होता तिथून तो खाली पडल्यानंतर जागीच त्याचा मृत्यू झाला. ही इमारत ६० मजली असून तिची उंची तब्बल २४७ मीटर इतकी आहे.
अरुंद रस्ते, उंच इमारत आणि पार्किंगमधील गाड्या काढण्यात गेलेला वेळ, अशा अनेक अडचणीनंतर अखेर अग्निशामक दलाच्या जवानांना या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी घटनास्थळी धाव घेतली.
किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी जाऊन संपूर्ण परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर त्या बोलत होत्या. ‘एका तरुणाचा हकनाक बळी गेला आहे. हा तरुण बराच वेळ इमारतीच्या बाहेर लटकत होता, अशी माहिती समोर आली आहे. इथल्या सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखून खाली चादर धरली असती किंवा खाली बिछाने, गाद्या घातल्या असत्या तर कदाचित त्या व्यक्तीचा जीव वाचला असता, असं महापौर म्हणाल्या. ‘इथं सुरक्षारक्षक व इतर मिळून जवळपास २०० कर्मचारी असल्याचं सांगितलं जातं. पण संकटकाळात एखाद्याला वाचवण्याचं प्रशिक्षण त्यांना मिळालेलं दिसत नाही, असं महापौरांनी सांगितलं.
इमारतीमधील अग्निरोधक यंत्रणेतील त्रुटींबद्दलही महापौरांनी नाराजी व्यक्त केली. ‘येथील अग्निरोधक यंत्रणा प्रचंड स्लो आहे. पार्किंगमधील गाड्या काढण्यात वेळ गेला. अशा परिस्थितीतही अनेक लोकांची सुखरूप सुटका करता आली याचं समाधान आहे, असं महापौर म्हणाल्या. ‘दोन वर्षांपूर्वी सोसायटी बनूनही ती हँडओव्हर केली गेलेली नाही. बिल्डरच्याच ताब्यात आहे. इमारतीतील रहिवाशी आक्रोश करत आहेत. राज्य सरकार आणि महापालिका त्याची योग्य ती दखल घेईल. या आगीची चौकशी करण्यात येईल,’ असं महापौर म्हणाल्या. महापौर म्हणाल्या की, ही आग कशामुळे लागली याबद्दल अद्याप काही माहिती समजू शकलेली नाही. राम तिवारी नावाची व्यक्ती लटकत होती. 10 मिनिटांपेक्षा जास्त ही व्यक्ती लटकत होती. त्या व्यक्तीचा यात मृत्यू झाला.
परिस्थितीची पाहणी केल्यानंतर चहल यांनी ही आग नियंत्रणात आली असल्याची माहिती दिली. दरम्यान बीएमसीने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. घटनास्थळावरुन माध्यमांशी संवाद साधताना चहल म्हणाले, “इथे जी दुर्दैवी घटना घडली आहे तिला दोन भागात बघितलं पाहिजे. सर्वात आधी म्हणजे ही आग लवकरात लवकर विझवायला हवी. आम्हाला ११ वाजून ५१ मिनिटांनी माहिती मिळाली आणि लगेचच तिथे लोक पोहोचले. ही आग आता विझवली गेली आहे. आमचे अधिकारी त्या इमारतीतच आहेत. आणखी काही घटना घडू नये यासाठी ही आग कायमची विझवली गेली पाहिजे. कारण अजूनही धूर येत आहे. आग विझली नाही तर ही आग पुन्हा लागण्याची शक्यता आहे. कारण तशा काही गोष्टी इमारतीमध्ये आहेत. इथे एका व्यक्तीचा मृत्यूही झाल्याची माहिती माझ्यापर्यंत आली आहे. या सगळ्या दुर्घटनेमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल”.
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…