हिंमत असेल, तर शिंगावर घ्या! - नारायण राणे


दिवस आणि वेळ कळवा!!




शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा वृत्तांत ‘सामना’मध्ये वाचला. मेळाव्यामध्ये जोश आणि दरारा, जो संजय राऊत यांनाच दिसला, तो इतर कोणाला दिसला नाही. मेळाव्याचे फोटो पाहिले. अंतर ठेवून बसलेले शिवसैनिक. अनेकांच्या डोळ्यांसमोर मोबाईल. हॉलमध्ये बसण्याची क्षमता किती? त्याच्या अर्ध्या संख्येमध्ये जल्लोष काय आणि दरारा काय? कोणाला दाखविता दरारा? माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात व्हायचा. मेळाव्याला शिवाजी पार्कचे मैदान पुरत नसे. आत शिरायला जागा नसायची. या वेळेचा ‘ऐतिहासिक’ दसरा मेळावा षण्मुखानंद हॉलमध्ये तुटपुंज्या सैनिकांच्या उपस्थितीत झाला. त्यात कसला जल्लोष आणि कसला दरारा! संजय राऊत हनुमंताचा गणपती करण्यात पटाईत! दांडग्या पैलवानासमोर अपंग माणसाला उभा करून ते त्याच्याही तोंडी शब्द घालतील, ‘या अंगावर!’ या दसरा मेळाव्याच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तोंडी ‘नामर्द’, ‘अक्करमाशा’, ‘निर्लज्जपणा’ असे शब्द येतात आणि त्यांची उजळणी ‘सामना’मध्ये होते. याला काय म्हणायचे? ही भाषा आणि संस्कृती महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची नाही.


यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एक आदर्श निर्माण करून ठेवला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा आदर्श आत्मसात करून काम करीत असतात. उद्धव ठाकरे यांच्याकडून ही अपेक्षा ठेवता येत नाही. सध्या संजय राऊत नैराश्यामध्ये आहेत. त्या अवस्थेमधूनच ते उद्धव यांना सर्वांपेक्षा वरचढ दाखवायचे आणि नसलेले गुण त्यांच्या अंगी चिकटवून त्यांना कर्तबगार दाखवायचे, हे एकमेव काम करीत असतात. ‘सामना’च्या याच अंकात ‘फटकारे’ या मथळ्याखाली ‘... महाराष्ट्राने तुम्हाला नकार दिला म्हणून महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आणि प्रतिमेवर अॅसिड फेकता? कुठे फेडाल हे पाप!’ अशी मुक्ताफळे उधळली आहेत. तर मग, वैयक्तिक रागापोटी, मालमत्तेच्या हव्यासापोटी घरातल्या नातेवाइकांवर अॅसिड फेकण्याची सुपारी दिली जाते. घरच्या माणसांवर अॅसिड फेकणाऱ्यांची ही कोणती संस्कृती? कुठे फेडाल हे पाप?


हर हर महादेव! गर्जनेचा उल्लेख भाषणामध्ये आणि ‘फटकारे’मध्ये आला. आता हर हर महादेवाचा गजर करण्याचा अधिकार शिवसेनेला राहिलेला नाही. सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली मिळेल ते पदरात पाडून घ्या, हा एकमेव कार्यक्रम त्यांच्याकडे आहे.


‘मराठी माणसाची आणि हिंदूंची एकजूट करा! हिंदू तितुका मेळवावा!! हिंदुस्थान धर्म वाढवावा!!!’ किती हा बोगसपणा? किती हा खोटारडेपणा?? किती ही बनवाबनवी??? महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद हडपण्यासाठी तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिली. आता तुमच्याकडे ना हिंदुत्व, ना धर्म! तुमच्याकडे आहे ते फक्त सत्तेच्या लालसेपोटी हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळविलेले मुख्यमंत्री पद!!


याच ‘सामना’मध्ये उल्लेख आहे की, ‘अमली पदार्थांचा नायनाट केलाच पाहिजे. पण सत्तेचं व्यसन हा सुद्धा एक अमली प्रकारच आहे.’ कोण करणार नायनाट? सत्तेचा जनहितासाठी वापर कधी करणार? घ्या की अंगावर, करा की नायनाट ! संजय राऊत बरोबर बोलतात. सत्तेचं व्यसन हा सुद्धा अमली पदार्थांचाच प्रकार. सत्तेचे व्यसन लागल्यामुळेच हिंदुत्वाचा त्याग आणि सत्तेचा हव्यास!!


शिवसैनिक हीच माझी शस्त्रे


मेळाव्याच्या सुरुवातीला शस्त्रपूजेनंतर उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावर पुढे येऊन हातातील ओंजळभर फुले समोर उपस्थित शिवसैनिकांवर उधळली. उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मूर्ख समजतात काय? त्यांनी उधळलेल्या फुलांची एक-एक पाकळी शिवसैनिकांनी घरातल्या कपाटात नेऊन ठेवली, तर ती धनलक्ष्मी होणार आहे काय? त्यातून शिवसैनिकांचा संसार चालून उदरनिर्वाह होणार आहे काय? मागच्या दोन वर्षांत त्यांनी शिवसैनिकांच्या नोकरी-धंद्याचा, पोटा-पाण्याचा प्रश्न हाताळण्याचा प्रयत्न केला काय? शिवसैनिक या मानवी रूपातील शस्त्राला अन्न, वस्त्र आणि निवारा मिळण्यासाठी काय केले? या दोन वर्षांत शिवसैनिकांच्या हातावर तुम्ही काय ठेवले? शिवसैनिकांना नोकरी-धंदा दिला साहेबांनी! साहेबांना जे जमले ते तुम्हाला नाही जमायचे. जाहीर भाषणांमध्ये क्षणाेक्षणी साहेबांचे नाव घेऊन सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. अन्यथा, ते हयात असताना त्यांना छळण्याचे काम तुम्ही कसे केले, ते सांगावे लागेल.



‘शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कुणावर आसूड ओढणार...’ असा उल्लेख ‘सामना’मध्ये आला आहे. त्यांचे कोणाशी वैमनस्य आहे? सांगावे की! महाराष्ट्राच्या जनतेवर आसून ओढणार का? हिंमत असेल, तर अंगावर या, ही डरकाळी आहे काय? डरकाळी कोणी द्यावी? कोणाच्या जीवावर? भाषण करताना हात वर करून आव आणणे वेगळे आणि अंगावर आलेल्याला समोरून जबाब देणे वेगळे. शिवसैनिकांच्या ताकदीवर आणि हिंमतीवर शिवसेना वाढली. नवीन आलेल्या पुळचट, घाबरट लोकांमुळे शिवसेना नाही वाढली. कोणाच्या गालाला पाच बोटे सुद्धा न लावणारे, हिंमत असेल, तर अंगावर या म्हणतात, यापेक्षा मोठा विनोद कोणता? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुसंस्कृत, कर्तबगार आणि अभ्यासू असावेत. अंगावर या, नामर्द, निर्लज्जपणा, अक्करमाशी अशी शिवराळ भाषा उसनं अवसान आणून वापरणारे नको.


हे म्हणतात, मला शरद पवार यांनी मुख्यमंत्री केले. आम्हाला माहिती आहे, कसे केले ते! शिवसैनिक साक्षीदार आहेत. संजय राऊत जी, मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होण्याच्या आदल्या रात्री आपण उद्धव ठाकरे व आदित्यना घेऊन शरद पवार साहेबांच्या घरी पोहोचलात. त्यावेळी तुमच्यासोबत एकनाथ शिंदे किंवा अन्य कोणी शिवसैनिक नव्हता. आपण तिघे शरद पवार यांना भेटल्यानंतर त्यांना विनंती केली की, ‘साहेब, आम्हाला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करावयाचे होते, पण काही कारणामुळे ते शक्य नाही. आता मलाच मुख्यमंत्री करा, अशी विनंती करायला आलो आहे.’ याला राऊत साहेबांनी दुजोरा दिला. त्यानंतर शरद पवार साहेब म्हणाले, ‘वा! हे उत्तमच झाले! मी उद्याच्या बैठकीत हे जाहीर करतो.’ त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशीच्या बैठकीमध्ये शरद पवार साहेबांनी आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे आपण मांजरीप्रमाणे डोळे मिटून दूध पिण्याचे सोडा. शिवसेना आता वाघ राहिलेली नाही. तिची मांजर, शेळी झाली आहे. भारतीय जनता पक्ष देशभर आहे. तुम्ही फक्त महाराष्ट्रात आणि तेही ५६. आयत्या बिळावरचे नागोबा. भाजप महाराष्ट्रात १०६ आहे. बहुमतासाठी आवश्यक आकडा १४५. भारतीय जनता पक्षाबाबत आणि आमच्या नेत्यांबाबत ही भाषा आपण वापराल आणि बदनामी कराल, तर तुम्ही जे पेरता तेच उगवेल, हे लक्षात ठेवा आणि त्यावेळी काय होईल, याची कल्पना करा. जीभ संयमात ठेवा, जिभेचा सैरावैरा वापर करू नका.


पुत्रकर्तव्य!


उद्धव ठाकरे यांनी काय काय थापा मारल्या. साहेबांना दिलेलं वचन म्हणे पूर्ण केलं. मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करीन, हा शब्द तुम्ही साहेबांना दिला. पण स्वत:च मुख्यमंत्री झालात. यापुढे शक्यच नाही. पण, भविष्यात चुकून संधी मिळाली, तर हे ठाकरे सोडून कोणालाच मुख्यमंत्री करू शकत नाहीत, ही काळ्या दगडावरची रेघ. साहेबांनी घातलेली शपथ मोडून दोनदा घर सोडून हॉटेल हॉलिडे इनमध्ये राहायला गेलेले साहेबांचा शब्द काय पाळणार? शिवसैनिकांना कदाचित ही बनवाबनवी समजणार नाही. पण माझ्यासारखे अनेक लोक या इतिहासाचे साक्षीदार आहेत. त्यावेळी मी मध्यस्थी केली नसती, तर आता आपण कुठे असता? साहेबांच्या हयातीत जे पुत्रकर्तव्यास जागले नाहीत, ते साहेब गेल्यानंतर कसे काय पुत्रकर्तव्यास जागणार संजय राऊतजी? मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुखांचे दसरा मेळाव्याचे भाषण शिवसैनिकांना मार्गदर्शन करणारे असले पाहिजे. मागील काळात जी अनेक भाषणे झाली त्या भाषणांमध्ये आणि कालच्या दसरा मेळाव्याच्या भाषणामध्ये काहीही फरक नाही. तीच तीच वाक्ये, तेच तेच विषय, त्याच त्याच धमक्या! महाराष्ट्राचा विकास कसा करणार, जनतेचे प्रश्न कसे सोडविणार यावर काही वक्तव्य नाही. का? समजत नाही? महाराष्ट्राच्या प्रश्नांचा आधी अभ्यास करा. मला येथे एक गुजराती म्हण आठवते, ‘जेनू काम तेनू थाय. बिजा करे सो गोता खाय!’


याच ‘सामना’मध्ये उल्लेख आहे की, ‘केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितलं की, हिंदुत्वाला धोका नाही. याच क्षणाची तर आपण वाट बघत होतो. पण हिंदुत्वाला धोका नाही म्हटल्यानतर आता खरं हिंदुत्व धोक्यात आहे ते परक्यांपासून नाही, तर उपटसुंभ नवहिंदू उगवले आहेत त्यांच्यापासून.’ उपटसुंभ कोण? नवहिंदू कोण? तुम्हाला महाराष्ट्र सांभाळता येतो का? मुंबई सांभाळता येते का? मग, तुम्हाला देशपातळीवर जाऊन हिंदूंबद्दल बोलण्याचा काहीही अधिकार नाही. एखाद्या ग्रामपंचायतीचे सरपंचपद सांभाळा, नंतर महापालिका आणि नंतर महाराष्ट्र राज्य! जनतेला दिलासा आणि सुख देणे आपल्याला जमणार नाही. मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीने आपण उच्चारली ती भाषा वापरावी? शैली, संस्कृती आणि संस्कार नसलेली माणसे अशी भाषा वापरतात.


मुक्ताफळे...




  • स्वर्गवासी साहेबांच्या भाषणाच्या ध्वनिफिती पाहून त्यांची नक्कल करण्याचा केविलवाणा प्रयत्न. एका वाक्याचा पुढच्या वाक्याशी संबंध नाही आणि हे म्हणे विचारांचे सोने.






  • हिंदुत्वाबद्दल उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यांबाबत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने भूमिका स्पष्ट केली पाहिजे.






  • संघराज्यावर मुक्तपणाने चर्चा करायची म्हणतात. प्रत्येक आर्थिक प्रश्नाबाबत केंद्राकडे बोट दाखवायचे आणि पुन्हा केंद्र-राज्य संबंधांवर टीकाही करायची याला दुतोंडीपणा म्हणतात.






  • ज्या मोदीसाहेबांकडून आमदारकीची व त्या अनुषंगाने मुख्यमंत्रीपदाची भीक झोळीमध्ये घालून घेतली, त्यांच्यावर टीका करण्याचा यांना अधिकार आहे काय?






  • सत्तेसाठी हिंदुत्वाशी गद्दारी करणारे उद्धव ठाकरे १९२५मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आता हिंदुत्व शिकवायला निघाले आहेत.






  • शस्त्रपूजा म्हणून तुमची पूजा केली, असे हे शिवसैनिकांना सांगतात. त्यांच्या इस्टेटी जगभर पसरल्या, सामान्य शिवसैनिक मात्र कफल्लकच राहिला.



Comments
Add Comment

Mumbai Local Train Power Block : प्रवाशांनो घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक तपासा! पनवेल, कर्जत, कल्याण मार्गावर ब्लॉकचा मोठा फटका; परिणाम कुठे होणार ?

मुंबई : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर (समर्पित माल वाहतूक मार्ग) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला वेग

BMC Election 2026 : मुंबईचा बॅास कोण ? बीएमसी निवडणूक निर्णायक टप्प्यात

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ कडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज

Snake Spotted Polling Station : चेंबूरमधील मतदान केंद्रात विषारी सापाचं दर्शन! सुरक्षा रक्षकांमध्ये भीतीचं वातावरण; थेट आला अन्...

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीसाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी चेंबूर परिसरातील

Tejasvee Ghosalkar : मतदानाच्या दिवशी तेजस्वी घोसाळकर भावूक! आज शारीरिकदृष्ट्या अभिषेक सोबत नसले, तरी...

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत असताना, दहिसरमधील वॉर्ड क्रमांक २ मध्ये एक अत्यंत

Maharashtra Election 2026 Voting : आज दारू मिळणार? बँका सुरु आहेत का? आज काय काय सुरु आहे? वाचा संपूर्ण यादी

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी

BMC Elections : ही सुट्टी म्हणून घरात बसून राहू नका...; नाना पाटेकरांचे मतदारांना कळकळीचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्र आज एका मोठ्या राजकीय वळणावर उभा आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या २,८६९ जागांसाठी आज मतदान