...तर अर्धे मंत्रिमंडळ तुरुंगात असते!

नागपूर (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात ईडीच्या कारवायांवरून केंद्र सरकारवर टीका केली होती. त्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कधीच अशा एजन्सीचा गैरवापर करीत नाहीत. एजन्सीच्या कामाच्या आडही येत नाहीत. एजन्सीचा राजकीय वापर करू देत नाहीत. आम्ही यंत्रणांचा गैरवापर केला असता तर तुमचे अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात असते, असे देवेंद्र फडणवीस यांनी सुनावले आहे.


देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेऊन दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा समाचार घेतला. आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे लोक आहोत. मागच्या काळात काँग्रेस आणि इतरांनी एजन्सींचा दुरुपयोग केला. आम्ही तसा गैरवापर केला नाही. पण एक गोष्ट नक्की की, भ्रष्टाचार खणून काढल्याशिवाय मोदी स्वस्थ बसणार नाहीत. भ्रष्टाचार केला असेल त्यांनी घाबरावे. ज्यांनी केला नाही त्यांनी घाबरू नये, असे फडणवीस म्हणाले.


महाराष्ट्राच्या इतिहासातील सगळ्यात भ्रष्ट सरकार महाविकास आघाडी आहे. या सरकारचा एकच अजेंडा आहे, तो म्हणजे खंडणी वसुली. शेतकऱ्यांना मदत करायला या सरकारजवळ पैसे नसतात. आश्वासने द्यायची आणि नंतर कारणे सांगत पाठ दाखवली जाते, अशी टीका त्यांनी केली.


प्राप्तीकर विभागाच्या छाप्यांमध्ये असे लक्षात येते की, काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर तयार आहे आणि त्यातून अलर्ट मिळतात की, कोणाकडून किती वसुली करायची आहे. हे जर चालत असेल तर महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने ईडी, सीबीआय येणारच आहेत. ज्याने काही केले आहे, त्यालाच यांचे भय असेल, असे फडणवीस म्हणाले.


मुख्यमंत्री ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात मुख्यमंत्रीपदावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली होती. त्यालाही फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे. मुख्यमंत्रीपदाची त्यांची महत्त्वकांक्षा होती, ती त्यांनी पूर्ण केली. आता दोन वर्ष झाली आहेत. किती दिवस तेच तेच बोलणार? राजकारणात महत्त्वकांक्षा असणे गैर नाही. पण त्याला तत्वज्ञानाची जोड देणे कितपत योग्य आहे? असा सवाल त्यांनी केला.


शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्दच पाळायचा होता, तर सुभाष देसाई, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे यांच्यापैकी एकाला मुख्यमंत्री करायचे होते. तसेच तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे नव्हते तर नारायण राणे यांना पक्षातून का बाहेर जावे लागले? राणेंना तर पक्षप्रमुख व्हायचं नव्हते. राज ठाकरे यांना पक्षातून का जावे लागले? त्यामुळे दोष देणे थांबवा, असे फडणवीस म्हणाले.



महाराष्ट्र हा महाराष्ट्रच राहील


आम्हाला महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. म्हणजे नक्की काय करायचे आहे? खंडणीबाजीमुळे बंगालमध्ये एकही उद्योग टिकलेला नाही. तुमच्या विरोधात जो बोलेल त्याचे हात-पाय तोडून त्याला फासावर लटकवायचे, असा महाराष्ट्र घडवायचा आहे का? आमच्यात जोवर रक्ताचा एक थेंब आहे तोवर आम्ही, महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही. महाराष्ट्र हा महाराष्ट्रच राहील, असे त्यांनी खडसावले.

Comments
Add Comment

पुण्यातील सायकल स्पर्धेनिमित्त सिंहगड किल्ल्यावर जाणारी वाहतूक पुढील ३ दिवस बंद, पर्यटकांना पायी मार्ग वापरण्याचा पर्याय

पुणे: पुण्यातील सिंहगड किल्ला नेहमीच पर्यटकांचे आकर्षण केंद्र राहिला आहे. मात्र आजपासून पुढील ३ दिवस सिंहगड

‘युनेस्को’च्या वर्ल्ड बुक कॅपिटल या दर्जासाठी पुण्याची दावेदारी

पुणे : ‘युनेस्को’च्या ‘जागतिक पुस्तक राजधानी’ (वर्ल्ड बुक कॅपिटल) या दर्जासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात! ट्रक चालकाचा ताबा सुटला अन् बॅरियर ओलांडत थेट चारचाकीवर उलटला

मुंबई: पुणे–मुंबई द्रुतगती महामार्गावर आज पहाटे एक भीषण अपघात झाला आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील

ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरातील ८०० एकर जागेचे होणार पर्यावरणीय पुनरुज्जीवन

मुंबई : विदर्भातील विविध विकास कामांबरोबरच तेथील जंगल संपदा राखण्यासाठी व त्याच्या वाढीसाठी मुख्यमंत्री

नागपूरमध्ये अतिविशेषोपचार वैद्यकीय अभ्यासक्रमांसह ६१५ खाटांचे रुग्णालय

नागपूर : नागपूर येथे वैद्यकीय उपचाराच्या दर्जेदार सुविधा रुग्णांना उपलब्ध व्हाव्यात आणि वैद्यकीय

शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एसटीची हेल्पलाईन

धाराशिव (प्रतिनिधी) - शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी