Friday, March 29, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सकाय चुकलं सुमेधाचं?

काय चुकलं सुमेधाचं?

माधवी घारपुरे

रात्रीचे बारा वाजून गेले तरी मंदा आजीला आज झोप नव्हती. सारखे उलट सुलट विचार मनात येत होते. आजची दुपार विसरता विसरत नव्हती. मंदा आजीचे आणि सून सुमेधाचे संबंध खरंच चांगले होते. घर म्हटलं की भांड्याला भांडं लागणारचं. तसं दोघींनी कधीही भांडण केलं नाही. आपलं वय झालं हे मंदा आजीला कळत होतं. पण मन मानायला तयार नव्हतं. दुपारचा प्रसंग डोळ्यांसमोरून जात नव्हता.

“आई आज माझ्याकडे भिशी आहे. ४ ते ६ तुम्ही खोलीतून बाहेर नाही आलात, तर बरे होईल नाही तर मंदिरात जा.”
सुमेधाचे हे शब्द ऐकले आणि डोळ्यांत टचकन पाणी आले. आजीने ते लपविलेले सुमेधाला दिसले नाहीत. मला आज आलेला अनुभव जिव्हारी लागला. मला आलेला अनुभव अनेक मैत्रिणींना वेगळ्या वेगळ्या प्रकारे येतो. कुणाकडे म्हातारा-म्हातारी हॉलमध्ये टीव्ही पाहायला बसले की, सून-मुलगा आत बसतात. कुणाकडे दोघं म्हातारे जेवले की, मग हे दोघे बसतात. कुणाकडे नाटक, सिनेमाला यांना तिकिटे केव्हाही काढून देतात. पण ४-५ जण एकदम जाऊया, असं कधी म्हणत नाहीत. प्रेमाचा स्पर्श कधी मिळत नाही. हेच खरं दु:ख.

घरातल्या कुत्र्यालासुद्धा मांडीवर घेऊन जेवतील. पण माणूस? एखाद्या प्रश्नाचं डिटेल उत्तर मिळणार नाही. प्राण्यांवर जरूर प्रेम करावं. त्यात शंका नाही. परवा तर गोरेआजी सांगत होती की, तिच्या सुनेने कुत्रा सांभाळला. तो उन्हाळ्यात त्यांच्याच रूममध्ये एसीमध्ये झोपायचा. एखाद दिवस ते दोघे नसले तरी त्याच रूममध्ये एसीशिवाय झोपायचा नाही. भुंकून बेजार करायचा. त्या कुत्रीला केव्हा पिल्ले होणार आहेत कळले तेव्हा तिच्यासाठी चौकोनी डनलॉपची गादी आणली. पिल्लं झाल्यावर तर तिला सर्व प्रकारच्या खिरी खायला घातल्या. ती कुत्री तिच्या पूर्वकर्मामुळेच जन्माला आली. कारण ती जेव्हा गेली तेव्हा या लोकांनी तिचे दहन केले आणि तिचे अस्थी विसर्जन हरिद्वारला जाऊन गंगा नदीत केले. आजीच्या मैत्रिणीला हरिद्वारला जाणे झाले नव्हते. विमानाने जायचे होते. पण आजीला एकटी ठेवून गेले.

जाऊ दे झालं! लोकांच्या आठवणी काढून काय फायदा? आपल्या पायाखाली काय जळतंय ते पाहायचं पण माझ्यासारख्या खूपजणी आहेत. झालं तर!

आपल्यासारखा दुसराही दु:खी पाहून मानवी मन कुठेतरी सुखावतं. ही गोष्ट एकदम खरी! दुपारचे ४ वाजले. सुमेधाच्या मैत्रिणी एक एक करून जमायला लागल्या. सगळ्यांच्या अंगावर फुला-फुलांच्या साड्या. कारण आज सुमेधाने गार्डन थीम ठेवली होती. म्हणूनच हॉलमध्ये कुंड्याच कुंड्या दिसत होत्या. कल्पना चांगली होती.

कार्यक्रम छान रंगला होता. आईस्क्रीम वगैरे झालं. मग मी बाहेर येऊन पाणी घेतले तशी मुली म्हणाल्या, “आजी दिसल्याच नाहीत. आम्ही भेंड्या खेळतोय, बसा ना पाच मिनिटे” मलाही बरं वाटलं. मी पण बसले. “चूप नही बैठेंगे आज.” ‘ज’ आलं, आजी ‘ज’चं गाणं म्हणा. “मी मराठी म्हणणार हं”

“जगी जीवनाचे सार घ्यावे जाणुनी सत्वर
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर”

‘र’ आलं, ‘र’चं म्हणा, असं म्हणेपर्यंत सुमेधा म्हणाली, “आई दुपारचं औषध घ्यायचंय ना? आणून देऊ का?” असं म्हटल्यावर लक्षात आलं की, आपण बाहेर आलो. आपली चूक झाली. त्यांचा चेहरा उतरला. म्हणाल्या, “नको, नको मी आत जाऊन घेते.”

कार्यक्रम साडेसहा, पावणेसातपर्यंत संपला. सगळ्या जाताना मला सांगून गेल्या. खरोखर सुरेख झाला कार्यक्रम. सातपर्यंत राहुल ऑफिसमधून आला. त्याला सुमेधाने अथपासून इतिपर्यंत रसभरीत वर्णन सांगितले. आईने गाणे म्हटले, एवढे सोडून.

रात्री नऊ साडेनऊ वाजता सुमेधाने विचारलं, “आई तुम्ही काही खाणार का? पावभाजी, पाणीपुरी, शिरा, गुलाबजाम सगळंच आहे. मी जेवणार नाही. तुम्ही जेवणार असाल, तर भात लावणार नाही तर सरळ झोपणार जाऊन.”

मंदा आजी नको म्हणाल्या. कारण त्यांनी नको म्हणावं अशाच हिशोबाने तिने विचारलं. खरं तर रात्री त्या भाताशिवाय कधीच काही खात नाहीत. सोसत नाही.

तशाच, भूक असताना अंथरुणावर पडल्या पण १२ वाजले तरी झोप नाही. परत परत एकच ओळ ओठावर “जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर” सुमेधाला मूठभर भाताचा कुकर लावायला काय झाले? चमचमीत मी काही खात नाही. डायबेटीसमुळे शिरा खात नाही. पण काय बोलू? आपण आपल्या सासुबाईंशी असेच वागलो का? हा प्रश्न डोक्यात आला आणि त्या क्षणभर दचकल्या.

सासुबाईंना अक्का म्हणत. काही बोलले की त्या म्हणायच्या, “माझ्या वयाची झालीस की तुला कळेल. तुम्ही मला सगळं देता. पण जवळ किती बसता? भले नाटक-सिनेमाला मी तुमच्याबरोबर नसते. पण आल्यावर नाटक कसं होतं? कोण होतं नाटकात, इतक्या गोष्टी तरी बोलाल की नाही. मानसिक जवळीक आहे का? साडी, जेवायला बासुंदी नसली तरी चालेल, आता भूक आहे ती मायेच्या स्पर्शाची, चार जणात गप्पा मारण्याची. मंदा आपली कर्मच आपला निर्णायक घटक आहेत, हे विसरू नको. जे कर्म कराल तेच तुमचे जीवन घडवते. आयुष्यातल्या मनस्तापासाठी आपणच जबाबदार असतो.” काय खोटं होतं का अक्काचं बोलणं? मी पण आधी अक्कांना जेवायला वाढत होते. मग आम्ही जेवत होतो. अक्का गावाला गेल्या की, मग मैत्रिणींना जेवायला बोलवत होते. मग सुमेधाचं काय चुकलं? अशा विचारांत पडता पडता मंदा आजीला शांत झोप आली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -