मुंबई : मुंबईतील सायन रुग्णालयात कोरोनाबाधित मृतदेहाशेजारीच अन्य रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत सरकार आणि महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणावर ताशेरे ओढले आहेत.

राज्यात आज दिवसभरात सापडलेल्या १२३३ रुग्णांपैकी एकट्या मुंबईत आज ७६९ नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांचा आकडा १० हजार ५२७ वर गेला आहे. तर मृत्यूचा आकडा ४१२ वर पोहचला आहे.

२४ तासांत १२३३ नवे रुग्ण सापडल्याने महाराष्ट्रात कोरोनाचा नवा उच्चांक झाला असतानाच आता मुंबई व पुणे ही दोन्ही शहरे हॉटस्पॉट बनली आहेत. मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या १० हजारांच्या पुढे गेल्यानंतरही राज्य सरकार आणि मुंबई महापालिका अद्यापही गाफील आहे. याचा पुरावा देणारे सायन हॉस्पिटल मधील व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

या व्हिडिओमध्ये पेशंट बरोबर मृतदेहही ठेवल्याचे दिसून येते. मे महिन्यात कोरोना पेशंटची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल असा अंदाज आहे. एवढेच नव्हे तर मुंबईसारख्या हॉटस्पॉट मधून आलेला प्रत्येक रुग्ण तपासल्याशिवाय घेऊ नये, असे मत आरोग्य तज्ञांनी व्यक्त केले आहे. मात्र एवढे असूनही आरोग्य विभाग किती गाफील आहे हे या व्हिडिओतून दिसते.

या व्हिडिओमध्ये प्लॅस्टिकचा कागदात गुंडाळलेले अनेक मृतदेह कॉटवर ठेवलेले दिसतात. त्यात बाजूच्या कॉटवर पेशंट उपचार घेत आहेत. सायन हॉस्पिटल मधील हे दृश्य हादरवणारे आहे. कोरोना सारख्या जीवघेण्या आजारात सरकार किती गंभीर आहे, हे यातून दिसून येते.