Wednesday, April 24, 2024
Homeमहत्वाची बातमी‘राष्ट्रभक्त झुंजार पत्रकार नाट्याचार्य खाडिलकर १५०’

‘राष्ट्रभक्त झुंजार पत्रकार नाट्याचार्य खाडिलकर १५०’

(कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त)

‘नमन नटवरा विस्मयकारा’ या गाजलेल्या ‘मानापमान’ नाटकातील नांदी प्रमाणेच विस्मयकारक प्रतिभा आणि आयुष्य लाभलेले झुंजार पत्रकार आणि ‘नाट्याचार्य’ ही सार्थ उपाधी लाभलेल्या कै. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांची आज १५० वी जयंती! ‘सिनें में ज़ुनू, ऑखों में देंशभक्ती की चमक रखता हुँ।’ ‘दुश्मन की साँसें थम जाए,’ ‘कलम में वो धमक रखता हूँ।’ या एका धारदार शेरामध्येच खाडिलकरांच्या वीरश्रीपूर्ण जीवनाचे मर्म दडलेले आहे!

नाट्य लेखनाची उपजतच प्रतिभा आणि हातोटी असणाऱ्या खाडिलकरांनी पहिले नाटक शाळेत तिसऱ्या इयत्तेत असतानाच लिहिले. पण त्यामुळे त्या काळचे वर्गशिक्षक संतापले आणि त्यांचे पहिले नाटक अग्नीत स्वाहा झाले. ते म्हणत की, माझे पहिले नाटक अग्नीच्या माध्यमातून देवाला अर्पण झाले. लोकमान्य टिळकांच्या केसरीकडे खाडिलकर गेले ते स्वतःचे मोठे नाट्यगुण घेऊनच गेले. किंबहुना त्यांनी ‘बीए’च्या अखेरच्या वर्षाला असताना लिहिलेले ‘सवाई माधवरावांचा मृत्यू’ हे नाटक आणि ‘ब्राह्मण त्याची विद्या’ या ग्रंथावरील टीकात्मक अभिप्राय गाजलेला पाहूनच टिळकांनी त्यांना केसरीत घेतले.

म्हणूनच खाडिलकर स्वतःला प्रथम नाटककार मग पत्रकार असे म्हणत. १८८६ मध्ये त्यांनी केसरीत संपादक म्हणून प्रवेश केला. केसरीत त्यांनी लिहिलेल्या ब्रिटिश सरकार विरोधातल्या देशभक्तीपर जहाल अग्रलेखांमुळे ब्रिटिशांनी लोकमान्यांवर खटला भरला.

केसरी वृत्तपत्राचे मालक म्हणून टिळकांनी सर्व अग्रलेखांची नैतिक जबाबदारी स्वीकारली आणि त्यांना तुरुंगवासाची सजा झाली. हे शल्य खाडिलकरांना अहोरात्र बोचत होते. पण, नंतर खाडिलकरांनी स्वतः स्थापन केलेल्या दैनिक नवाकाळमध्ये न. र. फाटक यांनी लिहिलेल्या अग्रलेखामुळे खाडिलकरांना तुरुंगवासाची शिक्षा झाली. गुरुऋणातून मुक्त झालो, असे आनंद उद्गार काढूनच ते तुरुंगात गेले. १ ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्य यांचे देहावसान झाल्यावर केसरी आणि पुणे सोडून खाडिलकर मुंबईला आले. टिळकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मरणार्थ मुंबईत ‘लोकमान्य’ दैनिक सुरू झाले. ते खाडिलकरांच्या संपादन कौशल्यामुळे अल्पावधीत लोकप्रिय झाले. पण डायरेक्टर बोर्डाच्या एका मीटिंगमध्ये असे उद्गार मुद्दामून काढण्यात आले की, लोकमान्य या नावामुळेच हे दैनिक लोकप्रिय झाले आहे. बाकी काही नाही…!

या जहरी जीवघेण्या उद्गारांसरशी खाडिलकर तिथून निघून गेले आणि १९२३ मध्ये रंगपंचमीच्या मुहूर्तावर स्वतःचे ‘नवाकाळ’ दैनिक सुरू केले. संपादकीय कौशल्य आणि अथक परिश्रमाच्या जोरावर ते अल्पावधीतच यशस्वी आणि लोकप्रिय करून दाखवले.

काकासाहेब खाडिलकर लोकमान्यांच्या आदेशावरून कौलांचा कारखाना काढण्याच्या आवरणाखाली, क्रांतिकारकांसाठी पिस्तुलांचा कारखाना काढण्यासाठी नेपाळला गेले. ‘कौले बनवण्यातील तज्ज्ञ’ म्हणून त्यांनी नेपाळमध्ये प्रवेश मिळवला. पण कौले काही जमेनात…!! आपल्या आत्मनिवेदनात ते म्हणतात, ‘शेवटी मी ईश्वराचा धावा केला.

मी राष्ट्रकार्य करीत असल्याने ईश्वर धावून येईल अशी मला श्रद्धा होती. भट्टी लावताना काळजी घेतल्याने म्हणा किंवा ईश्वरी आशीर्वादाने म्हणा भट्टी जमली’ त्यांच्या या कारखान्यात तब्बल ४०० कामगार होते! पण या कटाचा इंग्रजांना सुगावा लागून सगळा डावच फिस्कटला…

खाडिलकरांची सर्वच नाटके ही वीरश्री पूर्ण, स्वातंत्र्याचा जागर करणारी आणि जुलमी ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव करणारी होती. त्यांच्या ‘कीचकवध’ नाटकावर ब्रिटिशांनी बंदी घातली तेव्हा त्यांना कोर्टात जाण्याचा सल्ला देण्यात आला. यावर ते म्हणाले की, कोर्टात जेवढा वेळ खर्च होईल, तेवढ्या वेळात मी अजून जहाल नवीन नाटक लिहीन. बालगंधर्व खाडिलकरांना गुरू मानत असत. गंधर्वांसाठी खाडिलकरांनी ‘स्वयंवर’, ‘मानापमान’, ‘द्रौपदी’, ‘मेनका’, ‘सावित्री’, ‘विद्याहरण’ अशा कधीही न आटणाऱ्या कामधेनूच अर्पण केल्यात! एखाद्या स्त्रीप्रमाणेच बालगंधर्वांनासुद्धा वाढत्या वयाची चिंता होती. त्यावर खाडिलकर म्हणाले होते, ‘तू चिंता करू नकोस. मी तुझ्यासाठी ‘देवकी’ नाटक लिहीन. तू कितीही म्हातारा झालास तरी आठ मुलांची आई नक्कीच शोभशील!’ दुर्दैवाने हे नाटक काही लिहून झालंच नाही.

खाडिलकरांना कुठलीही मान मान्यता सहजपणे लाभली नाही. अवमान सोसून निकराने लढत त्यांना पुरुषार्थ सिद्ध करावा लागला. आजही त्यांच्या ‘स्वयंवर’, ‘मानापमान‘, ‘विद्याहरण’ इ. नाटकांचे हाऊसफुल्ल प्रयोग होत असतात. आमचे मित्र सुबोध भावे त्यांच्या ‘मानापमान’ नाटकावर आधारित सिनेमा बनवत आहेत, त्यांना खूप शुभेच्छा! मात्र तरीही इतक्या अष्टपैलू झुंजार ‘स्वातंत्र्यसैनिक’ नाट्याचार्यांच्या १५०व्या जयंतीची आठवण कोणालाही नाही! नुकत्याच गोव्यात पार पडलेल्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत नव्या रंगकर्मींनी सादर केलेल्या खाडिलकरांच्याच ‘स्वयंवर’ नाटकाने प्रथम पुरस्कार पटकावला! मात्र तरीही नाट्याचार्यांपासून ते आम्हा चौथ्या पिढीतील खाडिलकरांपर्यंत सारेच उपेक्षित, दुर्लक्षित आणि अभागी! अर्थातच हे मराठी संगीत रंगभूमी आणि पत्रकारितेचं दुर्दैव की, राष्ट्रासाठी अखंड विचार करणाऱ्या क्रांतिकारी पत्रकार आणि तब्बल १५ यशस्वी नाटके लिहिणाऱ्या सर्वाधिक लोकप्रिय नाटककाराची अवहेलना १५०व्या जयंती वर्षातच व्हावी!

पण अखेर स्वतः नाट्याचार्य म्हणत तेच खरे… ‘माझं नाव घेतल्याशिवाय मराठी नाट्यसृष्टीचा विचार करता येणार नाही आणि तेवढे मला पुरेसे आहे!’म्हणूनच समस्त महाराष्ट्राच्या वतीने प्रणाम करून म्हणावसं वाटतं…

।। शुरा मी वंदिले।।

-ह.भ.प. डॉ. वीणा खाडिलकर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -