पूनम राणे

आई… आई… ज्यूस प्यायचा आहे मला. घे ना गं आई…’
‘हो, हो, राजा, घेऊया आपण ज्यूस…’
‘अगं सपना… किती दिवसांनी भेटलीस आणि हे काय दोन्ही खांद्याला दोन, दोन दप्तर! शाळेत निघालीस वाटतं, मुलांना घेऊन!’
‘नाही गं, आज मुलांचा परीक्षेचा शेवटचा दिवस होता. पेपर संपल्यावर घरी निघालोय. बरं… बरं तू कशी आहेस? बीएड केलेस, नोकरी वगैरे काही पाहायची नाही का?’
‘अगं तुला तर माहीत आहे मुलांना शिकवायला मला फार आवडते.’ ‘मग प्रयत्न का करत नाहीस?’
‘करते, पण नोकरीच मिळत नाही. सध्या पटसंख्या कमी झाल्याने आहेत तेच शिक्षक सरप्लस होत आहेत. मुलं लहान आहेत. सासूबाई आजारी आहेत.’
‘मग ट्यूशन का घेत नाहीस?’ अगं, दहा बाय दहाची खोली. सासूबाईंचे आजारपण त्यांनाही आराम हवा असतो. तरीही पाहूया, परमेश्वराच्या मनात काय आहे ते!’
‘मिस्टर काय करतात.’
‘यांचीही नोकरी गेलीय.’ लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइनमुळे कंपनीतील माणसे कमी केलीत. त्यामुळे दोन वर्षं हेसुद्धा घरीच आहेत. छोटे छोटे काम आले, तर करतात.’
‘राज… राज… ज्यूससाठी आईकडे हट्ट करू नकोस! अरे, तुला माहीत आहे ना, आपल्या बाबांची नोकरी गेल्याने आई आपले घर कसे चालवते.’
आई येत आहे हे पाहून संदेश सुशांतच्या कानात काहीतरी कुजबुजला.
‘अलका, किती दिवसांनी भेटलीस गं. खूप बरं वाटलं तुझ्याशी बोलून. पुन्हा कधीतरी भेटू आपण. चल, बाय… बाय…’
‘राज… राज… इकडे या दोघेजण. तुला ज्यूस प्यायचा आहे ना.’
‘अगं आई, ज्यूस नकोय मला, आपण लवकर लवकर घरी जाऊया. चल लवकर लवकर.’
‘ज्यूस पिऊन नंतर निघूया.’
‘नको, नको… अरे राजा, दोन मिनिट धीर धर.’ एखादी भाजी घेते.
‘हो आई, घे भाजी.’
सपनाने भाजी घेतली आणि तिघांनी घरची वाट धरली…

शरद-सपना यांना दोन मुले. एक सुकांत आणि दुसरा संदेश. गेली अनेक वर्षे ते मुंबईत राहतात. शरद कंपनीत कामाला होता. तुटपुंज्या पगारावर त्याचे घर चालले होते. त्याच्या आईची किडनी फेल झाल्याने दर दोन दिवसांनी डायलिसिस करावे लागत होते. तरीही तो आपली जबाबदारी समर्थपणे पेलवत होता. कोरोनाच्या काळात नोकरी गेली होती. छोटी मोठी कामे करून सपना त्याला मदत करीत होती.

सुकांत आणि संदेश दोन्ही मुले अतिशय समंजस. वर्गात नेहमीच सर्वात प्रथम. येईल त्या स्पर्धेत भाग घेणारी. संदेशला वाचनाची प्रचंड आवड होती. लहानपणापासून त्याने वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन अनेक बक्षिसे आणि प्रमाणपत्रे मिळविली होती.

आज दहावीचा निकाल होता. संदेश मुंबई विभागातून प्रथम आला होता. पेपरमध्ये पहिल्या पानावर बातमी झळकली होती. व्हॉट्सअॅपवर शुभेच्छांचे मेसेज येत होते. आई-वडिलांचा आनंद गगनात मावत नव्हता.

शाळेने आज सत्कार समारंभ आयोजित केला होता. सर्व पालक व हितचिंतकांच्या उपस्थितीत हा समारंभ संपन्न होत होता. नामांकित मान्यवर समारंभाला उपस्थित होते. व्यासपीठावर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी संदेशच्या आईला आमंत्रित करण्यात आले, त्यावेळी आईने तो प्रसंग सांगायला सुरुवात केली.

माझी दोन्ही मुले सुरुवातीपासून या शाळेत शिकली. साधारणतः दोघेही तिसरी चौथीत असतील त्या वेळची गोष्ट. शनिवारचा दिवस होता. परीक्षा संपली आणि त्या दोघांना घेऊन मी घरी जात होती. माझा छोटा मुलगा सुकांत यांने माझ्याकडे ज्यूस पिण्याची इच्छा व्यक्त केली. एवढ्यात बऱ्याच दिवसानंतर माझी शालेय मैत्रीण मला रस्त्यात भेटली. थोडा वेळ आम्ही दोघी गप्पा मारत होतो.

मैत्रीण निघून गेल्यानंतर मी सुकांतला म्हटलं, ‘राजा, चला दोघेजण ज्यूस पिऊन घ्या.’ पण आम्ही घरी निघालो. ‘घरी आल्यावर मी त्याला विचारलं, ‘तुझ्या कानात दादा काय सांगत होता?’
आई दादा म्हणाला, ‘सुकांत आईकडे ज्यूससाठी हट्ट नको करूस!’ तुझ्यासोबत ती मलाही ज्यूस घ्यायला सांगेल, दोन ज्यूसला चाळीस रुपये लागतील. या चाळीस रुपयांची एक दिवसाची भाजी येईल!’

‘खरंच सांगते,’ असं म्हणून त्यांच्या भावना दाटून आल्या. स्वत:ला सांभाळत त्या म्हणाल्या, ‘आपली मुले परिस्थितीला व आम्हाला समजून घेतात, याशिवाय दुसरे भाग्य ते कोणते!’ भले आमच्यावर लक्ष्मी रुसली तरी सरस्वती मात्र आम्हावर प्रसन्न आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. ही मुलेच माझी संपत्ती आहेत. माझ्या मुलांच्या जडणघडणीत शाळेतील प्रत्येक घटकाचा वाटा आहे. प्रत्येक घटकाचे मला आभार मानायचे आहेत.’
‘सभागृहात सर्वांच्याच डोळ्यांतून आनंदाश्रू बाहेर पडत होते आणि टाळ्यांचा कडकडाट.’
संदेश आज मोठ्या पदावर कार्यरत आहे आणि आई-वडिलांना सुखात ठेवलेले आहे.

वाचकहो, आजच्या विज्ञानयुगात आपण नेहमी ऐकतो, ही मुलं ऐकतच नाहीत. चिडचिडीत झालीत, हट्ट करतात. मात्र मुलांना सर्व सुविधा देताना विचार करून द्यायला हव्यात. सहजासहजी मिळालेल्या कोणत्याही गोष्टीची किंमत नसते. घरातील परिस्थितीची कल्पना आपण मुलांना घ्यायला हवी, तरच संदेशसारखा दृष्टिकोन पुढील पिढ्यांमध्ये निर्माण होईल.