काळानुसार बदल करावा लागतो, तरच बदलत्या काळासोबत आपल्याला राहता येईल. प्रत्येक व्यक्ती आपल्या कुवतीप्रमाणे पैसे कमावत असतो. परंतु, त्यातील काहींनाच पैशाचे झाड बचतीच्या माध्यमातून लावता येते. त्याची योग्य ती मशागत केल्याने त्याचे रूपांतर अर्थवृक्षात होते. असाच एक गुंतवणुकीचा योग्य उत्तम प्रकार म्हणजे म्युच्युअल फंड होय.

भारतामध्ये म्युचुअल फंडचा उदय झाला आणि ‘युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया’ या पहिल्या म्युच्युअल फंडाची पाया उभारणी सरकारी माध्यमातून झाली. बदलत्या वातावरणात त्यानेही जोर धरत विकास झपाट्याने होऊ लागला. गुंतवणूकदारास फायदा, संरक्षण, योग्य परतावा या तिन्ही गोष्टी म्युचुअल फंडमध्ये मिळत असल्याने गुंतवणुकीसाठी ‘म्युच्युअल फंड सही है’ ही भावना आता सर्वसामान्यांमध्ये रुजली जात आहे.

दरम्यान, म्युच्युअल फंड आणि एसआयपी म्हणजे नेमके काय, यात अनेकांचा खूप गोंधळ उडाला आहे. अनेकांना एसआयपीमध्ये गुंतवणूक करायची असते. एसआयपी हा कोणता गुंतवणुकीचा पर्याय नसून तो गुंतवणुकीचा प्रकार आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. गेल्या ५-१० वर्षांमध्ये म्युच्युअल फंड कंपन्यांच्या जाहिरातीमुळे एसआयपी हा गुंतवणूक प्रकार घराघरात पोहोचला आहे. भारतीय लोकांना त्यांच्या पारंपरिक मानसिकतेतून बाहेर काढून म्युच्युअल फंड अशा शेअर बाजारमधील गुंतवणुकीकडे वळवणे तेवढे सोपे नाही. अनेकांनी हे समजून घेतल्याने मोठा बदल होत आहे.

एसआयपी म्हणजे नक्की काय?

Systematic Invesment Plan म्हणजे एसआयपी, ज्याप्रमाणे आपण बँकेत किंवा पोस्टात दर महिन्याला आरडी अकाऊंटला पैसे भरतो आणि ती छोटीशी रक्कम पुढच्या ५-१० वर्षांत एक मोठी रक्कम होते. त्याचप्रमाणे Systematic Invesment Plan नुसार दरमहिन्याला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली जाते. फरक इतकाच ही ऑटोमोटेड सिस्टिम आहे आणि आतपर्यंत आपण दर महिन्याला ज्या गुंतवणूक करत आलो त्या आपण जाऊन कराव्या लागत. त्यात काही त्रुटी होत्या, या म्युच्युअल फंडच्या एसआयपीमध्ये त्या भरून काढल्या आहेत. म्युच्युअल फंड : एसआयपीमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करून १५-१६ टक्के हमखास परतावा मिळू शकतो. त्यामुळे एकंदरीत भविष्यात भारताच्या आर्थिक प्रगतीमध्ये म्युचल फंडचे योगदान महत्त्वाचे ठरणार, हे मात्र निश्चित.