आयुष्याची सुरुवात शून्यातून होत नसून अनुभवातून (experienc) होते. “मातीत गाडलं, तर उगवून येता आलं पाहिजे. पाण्यात फेकलं, तर पोहता आलं पाहिजे. वादळात धरलं, तर झाडासारखी तग धरता आली पाहिजे; अन् काट्यात फेकलं, तर फूल होता आलं पाहिजे.” ऐश्वर्य पाटेकरांच्या लेखातील खेड्यापाड्यांतल्या माणसांचं अनुभवाच्या पाठ्यपुस्तकातील जीवन जगण्याचं हे सूत्र.

घरगुती शिक्षणाचा अनुभव (वागणं, बोलणं, ऐकणं, स्पर्श, चव, वास) या सातत्याच्या संवादातून होतो. प्रवास करताना दिशा, हवामान, लोकजीवनाचे तपशील, दुर्मीळ माणुसकी, काही इरसाल स्वभाव, शब्दात न मावणारे चाकोरीबाहेरचे, पाठ्यपुस्तकाबाहेरचे, नकाशाबाहेरचे अनुभव मिळतात. शिक्षणात ज्ञानरचनावाद सांगतो, मुलांना अनुभव द्या. मुले शिक्षणासाठी दूर राहिल्यावर त्यांना पैसा, वेळ, पालकांचे कष्ट समजतात. त्याचबरोबर जमवून घेणे, तडजोड करणे, चांगल्या-वाईट प्रसंगावर विचार करणे हेही शिकतात. उमेदवारीच्या काळात चढ-उतार परिस्थितीशी सामना करताना, तळागाळातील समाजाचा अनुभव मिळतो. सुरुवातीचे कष्टदायक दिवसच पुढील आयुष्याचा पाया असतो.

युवकांनो! स्वतःला शोधण्यासाठी बाहेर पडा. स्वतःच्या पायावर उभे राहून, मिळेल ते काम करून पैसे साठवून काही महिने विदेश पर्यटनातून जगाचा अनुभव घ्या. ‘पैसा कशासाठी, तर अनुभवासाठी’! अनावश्यक खरेदी टाळून अनुभवामध्ये गुंतवणूक करा. तेथील काही स्थाने, तसेच साहसी जीवनही स्वस्त नसते. समुद्र, आकाशामधील वेगवेगळ्या राईड्सचा अनुभव घ्या. नवीन वातावरणात स्वतःला झोकून द्या, व्यक्तिमत्त्व समृद्ध होते. अर्थात ते स्वतःत बदल करण्याच्या ताकदीवर अवलंबून असते.

संत तुकोबा म्हणतात, “अनुभव, जगाच्या बाजारी फुकट मिळत नाही. त्यासाठी किंमत मोजावी लागते, ही किंमत कुठल्या न कुठल्या स्वरूपात चुकती करावीच लागते.” घेतलेला अनुभव कधीच वाया जात नाही.

१. रीड कॉलेजात कॅलिग्राफीत रमलेल्या स्टीव्हने दहा वर्षांनंतर त्या ज्ञानांचा उपयोग आपल्या मॅक संगणकात केला.

२. दहावीला इंग्रजीत नापास. वडील म्हणाले, “आता गुराखी राखायला सुरुवात कर.” माझं गुरं राखणं आनंदात चालू होतं. हातात काठी असली तरी गुरांना मारणं मला शक्य नव्हतं. वर्षभर गुरांशिवाय दुसरा विचार माझ्या डोक्यात आला नव्हता. घरचाच असल्याने वडिलांनीही काही दिले नाही. याच अनुभवावर इंद्रजित भालेरावांनी लिहिलेल्या ‘गाई घरा आल्या’ पुस्तकाला शासनाचं दहा हजारांचे पारितोषिक मिळाले. जळगाव विद्यापीठानं व इतरही ठिकाणी ते पुस्तक अभ्यासाला लावल्याने पैसा, प्रसिद्धी सारे मिळाले. गुरं राखण्याचा अनुभव वाया गेला नाही.
युवकांचे अनुभवाचे बोल

१. मारुती चितमपल्लींनी विवेकानंदांच्या विचाराने, लग्न झाले असताना संन्यास घेण्यासाठी घरातून पलायन केले. उघड्या जगाचा अनुभव घेताना, समोरचे वास्तव पाहून लक्षात आले. पलायनाने समस्या सुटत नाहीत, उलट अधिक बिकट होतात…

२. मी (एक युवक) लहान होतो, तेव्हापासून मला जग बदलण्याचे स्वप्न होते. नेमके काय करायचे कळत नव्हते. मोठे झाल्यावर मी अनेक गोष्टी केल्या, परदेशात शिकलो, अनेक ठिकाणी काम केलं, ऑनलाइन व्यवसाय केला, माझ्या आयुष्यात बदल शोधत गेलो. या साऱ्या अनुभवानंतर १३व्या शतकांतील कवी रुमीच्या शब्दांवर थांबलो, ‘काल मी हुशार होतो म्हणून मला जग बदलायचं होतं. आज मी शहाणा आहे म्हणून मी स्वतःला बदलत आहे. ‘वेळ नाही, पैसा नाही, परिस्थिती नाही, कारण तुम्हीच तुमचा सर्वात मोठा अडथळा आहात.

३. मी (एक युवक) वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी सायलेंट ट्रीटसाठी स्वतःला साईनअप केले. त्यामुळे लक्ष केंद्रित करण्याची शक्ती वाढली. लोकांचे ऐकून घेण्याची, बडबड कमी करण्याची आणि लगेच रिअॅक्ट न होण्याची सवय लागली. २१ दिवसांत शंभर पानांचे पुस्तक लिहून झाले. मौनव्रत खूप शक्ती देते, हे कळाले.

सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यांतील घनदाट जंगलातील आदिवासी वस्तीत काही मदत करण्याच्या इच्छेने सुधा मूर्ती गेल्या होत्या. गवताने शाकारलेली शाळा. आदिवासींच्या टोळीतील सर्वात ज्येष्ठ नव्वदीच्या पुढचा म्हातारा ‘ठंडाप्पा’ने (आधी जाऊन आल्याने) मला ओळखले. आपण काहीही न मागता मुलांसाठी आणलेल्या वस्तूंची मोठी पिशवी त्यांच्या हातात ठेवली. ठंडाप्पा अवघडला. लाल रंगाच्या सरबताची बाटली त्यांनी मला दिली. “तुम्ही घरी काय पिता, हे आम्हाला माहीत नाही. जंगलात उन्हाळ्यात लाल रंगाच्या रानटी फळापासून काढलेला हा रस! किमान दोन पावसाळे टिकतो. तब्येतीला चांगला. पेलाभर पाण्यांत जरासा टाकायचा.” सुधा मूर्तींना अवघडल्यासारखे झाले. गरीब लोकांकडून भेट कशी स्वीकारू, या भावनेने त्यांनी नम्रपणे नकार दिला. त्यावर ठंडाप्पा म्हणाले, “तसं असेल अम्मा, तर आम्हालाही तुमची भेट नको. घेऊन जा.” मला धक्का बसला. आजवर असा अनुभव कधीच आला नव्हता. घेणारे हात सर्वत्र दिसतात. काही ठिकाणी कृतज्ञताही व्यक्त केली जात नाही. कमी रक्कम दिली, तर तक्रारीचा सूर ऐकायला मिळतो. शाळा न शिकलेला माणूस, जीवनाचं मोठं तत्त्वज्ञान जगत होता, “जेव्हा तुम्ही घेऊ शकत असाल तेव्हाच द्या. काहीतरी दिल्याशिवाय घेऊ नका. घेण्यात सुद्धा मोठेपणा असतो.”

नोकरी, व्यवसाय, शिक्षण, करिअरच्या सुरुवातीलाच मातब्बर लोकांच्या सहवासातून मिळणारी शिकवण आजन्म पुरते. रोहिणी हट्टंगडी लिहितात, “एनएसडीत पहिल्या वर्षीच्या विद्यार्थ्यांनी, नाटकांत दुसरे काय करतात ते बघायचं, सर काय सांगतात ते ऐकायचे असते. आम्ही सारे क्राऊड सीनमधले. नंतर सरांनी आम्हाला क्राऊड सीनमधील आमच्या भूमिकेविषयी लिहायला सांगितले. त्यावेळी नगण्य भूमिकेचा आवाकाही आमच्या कायमचा लक्षात आला.”

जीवनात तुम्हाला आलेले अनुभव उपयोगात आणा. कृती विचारापेक्षा अधिक स्पष्टता निर्माण करते, कारण तो अनुभव असतो. अनुभवात्मक ज्ञान इतर सर्व शहाणपणाला मागे टाकते. म्हणून ज्ञानेश्वरीची माहिती सांगताना संत नामदेव म्हणतात, “एक तरी ओवी अनुभवावी.”

-मृणालिनी कुलकर्णी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here