मोबाइल, कॉम्प्युटर, लॅपटॉप, बँक अकाऊंट, सोशल मीडिया अकाऊंट हॅक होणे याबाबत आपण सर्रास ऐकतो. इलेक्ट्रॉनिक गॅझेट हॅक होणं स्वाभाविक आहे. (hacked) हॅकरला त्यातून फायदा मिळवायचा असतो आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने तो आपलं ध्येय साध्य करतो. दुसऱ्याची आर्थिक फसवणूक करण्यासाठी जसे हॅकिंग तंत्रज्ञान वापरता येते तसेच दुसऱ्याच्या मानसिक, भावनिक, वैचारिक फसवणुकीसाठीही ते वापरले जाते.

आजकाल लोक आपल्या स्वार्थासाठी, आपलंच खरं करण्यासाठी, आपल्या चुकीच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण करून घेण्यासाठी इतरांचे मन, बुद्धी, वैचारिकता, संस्कार, मानसिकता देखील हॅक करू लागले आहेत.

आपण जास्तीत-जास्त वेळ ज्या लोकांसोबत घालवतो; मग ते समाजातले असोत, घरातले जवळचे असोत, कुटुंबातील असोत, ओळखीचे असोत, मित्र मैत्रिणी असोत वा नात्यातले असोत, आपल्यासोबत काम करणारे असोत वा कोणत्याही कारणास्तव आपल्या संपर्कात आलेले असोत त्यांच्या वागण्याचा बोलण्याचा विचारांचा आपल्यावर चांगला वाईट परिणाम होत असतो.

आपण ज्यांच्या सानिध्यात सातत्याने राहतो, आपली उठ-बस, रोजचे संभाषण ज्यांच्यासोबत होत असते त्यांच्या वागण्या-बोलण्याचा, त्यांच्या विचारांचा, मतांचा, स्वभावाचा आपल्यावर कळतनकळत पगडा बसत असतो.

आपल्या संपर्कातील आपल्या कक्षेतील लोक जर सद्बुद्धी, निकोप विचारधारा, गुणी, संस्कारी आणि चांगल्या ध्येयाकडे वाटचाल करणारे, आपले चांगले चिंतणारे, आपल्याबद्दल मनापासून प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि कळकळ असलेले असतील, तर ते आपल्यात चांगुलपणा निर्माण करतात. आपल्याला सकारात्मक, योग्य दिशा दाखवतात.

आपणदेखील चांगल्या प्रभावाखाली राहून चांगले निर्णय घेणे, चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे, कोणाची निंदानालस्ती न करणे, कटकारस्थान राजकारण न करणे, कोणाबद्दल वाईट न बोलणे, वाईट न चिंतने अशा सदृढ मानसिकतेने सर्व कामे करतो आणि त्यामुळे आपल्याला यशस्वी होणे, आपला विकास होणे, आपले ध्येय धोरण पूर्णत्वास नेणे शक्य होते.

उलटपक्षी जर आपल्याच आजूबाजूला आपण चुकीची, वाईट वृत्तीची, खोटा दिखाऊपणा करणारी, स्वतःचा स्वार्थ साधणारी, आपली दिशाभूल करणारी, आपल्याला फसवणारी, आपल्याला चुकीचे सल्ले देणारी, आपल्याला इतरांबद्दल सतत वाईट आणि खोटी माहिती पुरवणारी, आपल्याला इतरांपासून तोडणारी, आपल्या मार्गात नकळत अडथळे आणणारी लोक जमा केली असतील, तर ती आपल्याला अधोगतीकडे घेऊन जातात.

आपले चांगले – वाईट, चूक – बरोबर खरं – खोटं ठरवण्याचे मापदंड अशी लोकं मोडीत काढतात आणि त्यांच्या चुकीच्या विचारांना आपल्या डोक्यात भरवण्याचा प्रयत्न करतात. त्या ठिकाणी कोणीही असो जर एकच गोष्ट सातत्याने आपल्या मनावर बिंबवली गेली, तर मनाला, बुद्धीला पटत नसलं तरी आपण ती स्वीकारतो. आपल्यासमोर एखाद्या व्यक्तीच्या चुका सातत्याने सांगितल्या गेल्या, तर आपण पण त्या व्यक्तीकडे त्याच नजरेतून बघायला लागतो म्हणजेच आपलं मन बुद्धी हॅक झालेली असते.

एखाद्याच्या खूप जवळ जाऊन त्याला इतरांपासून लांब करण्यासाठी, त्याच्या विचारांवर निर्णयावर ताबा मिळविण्यासाठी, तो फक्त आपलंच ऐकेल, त्याला आपलंच पटेल इतकं त्याला वैचारिक दृष्टीने बधिर करण्यासाठी अनेकदा तुमच्या सातत्याने जवळ राहून, सातत्याने संपर्कात राहून तुमचा बुद्धिभेद करण्यात असे लोक पटाईत असतात.

खूप कमीजण असे असतात, जे ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’ ही उक्ती खऱ्या अर्थाने अमलात आणू शकतात. आपण दररोजच्या जीवनात कोणाच्याही किती आहारी जायचं, आपली मानसिक, वैचारिक शक्ती कोणाला किती दुर्बल करू द्यायची, कोणाच्याही सांगण्याला कितपत महत्त्व द्यायचे, कोणाकडून मिळालेल्या माहितीवर किती विश्वास ठेवायचा, चुकीच्या किंवा खोट्या ऐकलेल्या माहितीनुसार निर्णय घ्यायचे की, शहानिशा करायची हे सर्वस्वी आपल्या हातात असते.
अनेकजण हेतुपुरस्सर आपल्यापर्यंत कोणत्याही गोष्टीची, कोणत्याही व्यक्तीची, कोणत्याही घटनेची फक्त वाईट बाजू, चुकीची माहितीच पोहोचवतात.

आपल्यापर्यंत अर्धवट अथवा त्यांच्या फायद्याची माहिती पोहोचवली जाते. असं एकदा, दोनदा अनेकदा झाल्यावर आपलं मन, आपली बुद्धीदेखील तेच खरं समजू लागते आणि स्वतःच्या सद्सदविवेकबुद्धीचा वापर करण्यात आपण कमी पडतो.
त्यामुळे सातत्याने आपल्या आजूबाजूला असणारे लोक, आपल्याला सल्ला सूचना देणारे, मार्गदर्शन करणारे लोक ओळखा. कोणालाच आयुष्यात इतकं महत्त्वाचे, इतके जवळचे, इतके गोपनीय स्थान देऊ नका की, तो तुमच्या मनाचा कब्जा करण्यात यशस्वी होईल. स्वतःचे इप्सित साध्य करण्यासाठी तुमचा चुकीचा वापर करेल. सतत कोणा एकाच व्यक्तीला खूप जवळ करून ठेवू नका, फक्त एकाच व्यक्तीच्या सल्ल्याने सातत्याने मार्गक्रमण करू नका. कोणतीही एकच व्यक्ती आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची आहे, तिच्याशिवाय आपलं पान हलणार नाही, अशी स्वतःची दुरवस्था होऊ देऊ नका. वेगवेगळ्या, सर्व प्रकारच्या लोकांमध्ये सक्रिय राहा. आपल्या आयुष्यात, आपल्या कामात, निर्णयात अनेक सकारात्मक, चांगल्या निकोप मानसिकतेच्या लोकांना समाविष्ट करून घ्या. सगळ्यांनाच सारखं महत्त्व द्या, सगळ्यांचा आदर करा, सगळ्यांच्या सूचना, मार्गदर्शन, सल्ले ऐकून घ्या. एकाच व्यक्तीने दिलेला सल्ला, सांगितलेला मार्ग अनेकांकडून पडताळून घ्या.

आपल्या घरात, नातेवाइकांत, समाजात, ओळखीत, कार्यालयात, व्यवसायात, मित्र-मैत्रिणींमध्ये, शेजाऱ्यांमध्ये कोण काय हेतू मनात धरून आपल्याशी जवळीक करतोय, हे लवकर लक्षात येत नाही. आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्या कल्याणासाठी आलेली नसते. आपल्यासाठी जर कोणीही खूप काही करत असेल, सातत्याने आपल्या जवळ राहत असेल, तर त्याला फक्त प्रेम, माया, आपुलकी, चांगुलपणा, माणुसकी ही बाळबोध विशेषणे न लावता त्यामागे त्यांचा खरा उद्देश काय असावा? याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.

भावनेच्या भरात आपण आपली इत्यंभूत माहिती सगळ्यांना देत असतो आणि त्याचाच उपयोग करुन आपल्या मनाला हॅक करण्यात समोरचा यशस्वी होतो. सहानुभूती, सहकार्य, मदत, काम, हातभार या नावाखाली लोक आपलं अतोनात नुकसान करत असतात, हे लक्षात यायला खूप उशीर होतो. आपण कोण आहोत, कसे आहोत, आपले आजपर्यंतचे विचार कसे आहेत, आपल्याला काय पटत आहे, आपले वैयक्तिक निरीक्षण, अनुभव काय सांगतो? याचा सर्वांगीण विचार करूनच आयुष्याची वाटचाल करणे योग्य राहील.

-मीनाक्षी जगदाळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here