ब्रॅण्ड ही एक व्यापारी भाषेतली संज्ञा आहे. एकदा का एखाद्या गोष्टीचा ब्रॅण्ड बाजारात प्रस्थापित झाला की मग त्या नावाने काहीही खपवता येत असते. त्याची किंमत कितीही लावली तरी लोक पैसे मोजायला तयारच असतात. ब्रॅण्ड मार्केटिंगच्या या जगातला सर्वात मोठा ग्राहक म्हणजे युवा वर्ग!

आजची तरुणाई या ब्रॅण्ड्सवर नुसता विश्वासच ठेवते असं नाही तर त्यांच्यासाठी वस्तू वापरताना ती कोणत्या ब्रॅण्डची आहे हे पाहणं महत्त्वाचं असतं. त्यांच्या जगात ब्रॅण्डला मोठी किंमत आहे. त्या ब्रॅण्डवर त्यांची स्टाईल, व्यक्तिमत्त्व सारंच जोखलं जातं. तरुण वर्गाने नेहमीच स्टाईलला महत्त्व दिले आहे. यांना स्टायलिश राहायला खूप आवडते.

परंपरा जोपासताना अभिरुचीतील बदलानुसार तरुणाईकडून ब्रॅण्डेड वस्तू, साधनांचा वापर वाढला आहे. फॅशन हा विषय आज तरुणाईच्या खूपच जवळचा झाला आहे. फॅशन करणा-या इतरांना नाकं मुरडूनही स्वत:ची अशी एक ‘स्टाईल’ ही मुलं जपतच असतात. फॅशन आणि ब्रॅण्डचे प्रत्येकाचे निरनिराळे फंडे असतात.

जगातले सर्वात जास्त तरुण आज भारतात आहेत. आयटी क्रांतीमुळे आर्थिक प्राप्तीमध्ये खूप मोठी वाढ झाली आणि त्याचमुळे ‘ब्रॅण्ड कल्चर’ भारतामध्ये विकसित होऊ लागले. कोणताही वस्तूचा ब्रॅण्ड त्यांना लगेच आपलासा होतो. दुस-यावर छाप पाडण्यात या ब्रॅण्डचा चांगलाच उपयोग होतो. ज्या ब्रॅण्डबद्दल विश्वासार्हता वाटली, प्रेम जडलं की लागलीच तोच त्यांचा ब्रॅण्ड होतो.
आपल्या जीवनात मोबाईलचे महत्त्व खूप वाढलेले आहे. मोबाईल आपल्या कुटुंबासारखा आपली सोबत करीत असतो. आपण त्याच्यावर आपल्या कुटुंबाप्रमाणेच प्रेम करीत असतो. आपण मोबाईलची किंमत किती आहे यापेक्षा ती वस्तू कशा प्रकारची आहे हे पाहतो. अशा वेळी, अशा काही वस्तूंसाठी ब्रॅण्डला महत्त्व दिले जाते. पण तरुणांना एक गोष्ट लक्षात येत नाही की, ब्रॅण्डची किंमत मोठी असते. त्यामुळे उत्पादनाचीही किंमत वाढते.

सर्वाचा लाडका सचिन असो नाहीतर महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली किंवा अमिताभ बच्चन नाहीतर ऐश्वर्या रॉय.. प्रत्येकाच्या लोकप्रियतेनुसार ज्याने त्याने स्वत:चे ब्रॅण्ड मूल्य ओळखलं आहे आणि हीच मंडळी युवावर्गालाही त्यांच्या ब्रॅण्डच्या जाळ्यात खेचत असतात. ब्रॅण्डची जाहिरात करून त्यांना कोटय़वधी पैसे मिळतात, मात्र त्याच ब्रॅण्डची एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी तरुण आपल्या किंवा पालकांच्या मेहनतीचा पैसा खर्च करत असतात. मँगो, नाईकी, नक्षत्र, टायटन, लीवाईज टॉमी हायिफग्लर, आदिदास, राल्फ लॉरेन, मार्क्‍स स्पेंसर, ख्रिस्टीआन डिऑर.. हे शब्द म्हणजे शॉपिंग सॅव्ही तरुण पिढीचे की-वर्डस आहेत. नव्याने वाढत असलेल्या भल्यामोठय़ा युवावगार्साठी फॅशन आणि रेकग्नाईज्ड ब्रॅण्ड ही चैन किंवा आकर्षण न राहता गरज बनू लागली आहे. एकेकाळी फक्त दोनच ब्रॅण्ड प्रसिद्ध होते.. टिकाऊ आणि मळखाऊ!

लोकांच्या या बदलत्या अ‍ॅटिटय़ूडकडे पाहिल्यास ब्रॅण्ड परवडायला लागले तरी ब्रॅण्डेड कपडे हे फक्त ग्रेट फिगर आणि हाईट असणा-यांसाठीच असतात, असाही एक न्यूनगंड पूर्वी होता. पण नव्याने विकसित होणा-या अनेक ब्रॅण्ड्सनी या प्रश्नावरही शिरजोरी केल्यामुळे ब्रॅण्ड कॉन्शसचा विस्तार आणखीनच झपाटय़ाने झाला आहे. ब्रॅण्ड कधी नावाच्या रूपात असतो, कधी चिन्हांच्या, कधी उत्पादनातील आगळ्यावेगळ्या वैशिष्टय़ांच्या तर कधी अगदी छोटय़ाशा रूपात ग्राहकांसाठी केलेल्या सदिच्छा प्रयत्नांच्या.

उत्पादनावर ग्राहकांच्या स्मरणात राहील असा ठसा म्हणजेच ब्रॅण्ड निर्मिती. आताच्या आधुनिक आविष्कारात ब्रॅण्डची ओळख ही वेगवेगळी चिन्हं, प्रतीकं, नावं, नावांचं सुलेखन आदी रूपात पाहायला मिळते. वारंवार तीच वस्तू खरेदी करून उत्पादनाला आश्रय देणारे ग्राहक आणि तेही आताच्या पिढीतील तरुण हे आपल्याच ब्रॅण्डचे केवळ हक्काचे निष्ठावंत असतील याची शाश्वती कंपनीला नसते. त्यामुळेच ब्रॅण्ड तयार करणे, हे जिकिरीचं काम असतं वा त्याला दीर्घकाळ लागतो. प्रतिस्पध्र्याला नामोहरम करणे हा ब्रॅण्ड बिल्डिंगचा उद्देश असतोच; पण तसं करताना ग्राहकाला गृहीत धरून चालत नाही.

ब्रॅण्ड हा वस्तूच्या अस्तित्वापेक्षाही मोठा व चिरंतन असतो. खरेदी या मनुष्याच्या मूळ स्वभाव धर्माला अनुसरत झपाटय़ाने लोकप्रिय होणा-या क्रिएटिव्ह इंडियन ब्रॅण्ड्समुळे आपण आपली स्टाइलिश ब्रॅण्ड ओळख जागतिक पातळीवर विस्तारायला सुरुवात केली आहे हे मात्र नक्की! त्यामुळेच तर हल्ली भारतीय निर्मित वस्तूंकडेही तरुणवर्गाची नजर वळलेली दिसते. ब्रॅण्डेड वस्तूंना मागणी वाढली आणि त्या त्या ब्रॅण्डचे शोरूम्स वेगवेगळ्या शहरांमध्ये उभे राहिले. आपल्या जवळ असलेल्या सर्वच वस्तू ब्रॅण्डेड असायला हव्यात हा अट्टहास अलीकडे तरुणांमध्ये दिसून येतो. अनेक ब्रॅण्ड प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांचे लोगोसुद्धा प्रसिद्ध आहेत. प्रत्येक ब्रॅण्डच्या लोगोमध्ये काही ना काही अर्थ दडलेला असतो. पण तरुणांनो, ब्रॅण्ड पाहून खरेदी करू नका. आपल्याला जे आवडते तेच खरेदी करा.