साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १८ जुलै रोजी पुण्यतिथी आहे. संपूर्ण महाराष्ट्र या दिवशी अण्णाभाऊंना श्रद्धांजली अर्पण करतो. मातंग समाजात जन्मलेल्या अण्णाभाऊंना महाराष्ट्र ओळखतो तो महान शाहीर तसेच दीन-दुबळ्यांचे उपेक्षितांच्या जीवनाचे वास्तव चित्रण करणारा पहिला दलित साहित्यिक म्हणून.

annabhau satheअण्णाभाऊ साठेंनी तीस कादंब-या तसेच जवळ जवळ अडीचशे ते तीनशे कथा लिहिल्या. त्यांचे साहित्य केवळ मराठी भाषेपुरतेच मर्यादित न राहता चौदा भारतीय भाषात तसेच जर्मन, इंग्रजी, झेक, पोलीश, रशियन इत्यादी परकीय भाषात भाषांतरीत झाले आहे. त्यांचे साहित्य जात, धर्म, देश, भाषा इ. बंधनांच्या पलीकडे पोहोचले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

त्यांच्या साहित्यात संघर्ष विद्रोह प्रकर्षाने जागोजागी जाणवतो. त्यांची पात्रे शोषित दलित जनतेची दु:खे वाचकांपर्यंत वास्तवपणे पोहोचवतात. त्यांच्या ‘निळू मांग, मकुल मुलाणी, भोमक्या, फुला, नसरू, दादा न्हावी या पात्रांनी सा-या महाराष्ट्राला वेड लावले झपाटून टाकले.

समाजातील दलित शोषित जनतेने जात-पात, धर्म, मान-पान यांचा त्याग करावा व एक समतेवर आधारीत समाज निर्माण करण्यात पुढाकार घ्यावा असे अण्णाभाऊंना प्रकर्षाने वाटत होते.

अण्णाभाऊंनी विविध साहित्य प्रकार हाताळले. कथा, कादंब-या, पोवाडे, लावण्या, लोकनाटय़े, पदे, गीते अशी विविध क्षेत्रे त्यांनी सहजगत्या पादाक्रांत केली. आपल्या साहित्यातून शोषण, अन्याय, अत्याचाराला विरोध करणे हेच त्यांनी ध्येय मानले व मानवी वृत्ती, प्रवृत्तीचे वास्तव दर्शन वाचकांना घडविले. शब्दांना अंगाराचे रूप देऊन दलितांच्या निर्जीव मनाला चेतवत अण्णाभाऊ मराठी साहित्यातील अढळ पदावर विराजमान झाले आहेत.

अण्णाभाऊ साठेचं नाव घेतल्याशिवाय संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होणार नाही. संयुक्त महाराष्ट्र लढय़ातील एक महारथी लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी १८ जुलैला आहे. सारा महाराष्ट्र अण्णाभाऊंनी अमरशेख यांच्या साथीने जागवला-पेटवला.

तत्कालीन मोरारजी सरकारने त्यांच्या ‘माझी मुंबई अर्थात मुंबई कुणाची?’ या नाटिकेवर बंदी आणली तरी अण्णाभाऊ आणि त्यांच्या साथीदारांनी तिचे प्रयोग करून महाराष्ट्र पेटता ठेवला. ‘माझी मैना’ हे गाजलेले गीत लिहून अण्णाभाऊंनी मुंबईबद्दलच्या सर्वसामान्यांच्या भावनाच व्यक्त केल्या.

अण्णाभाऊंच्या साहित्याचा गौरव महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्या जिवंतपणीच केला. पण शासनाने त्यांच्या ‘फकिरा’ कादंबरीला पारितोषिक देण्याशिवाय काहीच केले नाही. अण्णाभाऊंनी कित्येक कथा कादंब-या, गीते, नाटके लिहिली त्यापैकी बरेच साहित्य प्रसिद्ध झालेले असले तरी अजूनही बरेच साहित्य अप्रकाशित आहे किंवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत या साहित्याचा अतिशय मोलाचा उपयोग झालेला आहे. अण्णाभाऊंचे हे साहित्य जपणे हे शासनाचे तसेच सर्व समाजाचे कर्तव्य आहे. खास करून अण्णाभाऊ ज्या समाजात जन्मले त्या मातंग समाजाने हा अनमोल ठेवा जतन करण्यासाठी विशेष दखल घेऊन प्रयत्न केले पाहिजेत. हीच अण्णाभाऊंना त्यांच्या पुण्यतिथिनिमित्त खरी श्रद्धांजली ठरेल.
– मुकुंद वायदंडे

1 COMMENT

Comments are closed.