पर्यटन विषयाला सध्या प्रचंड मागणी आहे. जगभरातील उंचावणारी उत्पन्न मर्यादा, विविध देशांबद्दल, जागांबद्दल आणि माणसांबद्दल माणसाला असलेली मूलभूत उत्सुकता आणि धकाधकीच्या जीवनाची गरज म्हणून लोकांचा पर्यटनाकडे ओढा वाढत आहे. त्यामुळे व्यवसाय म्हणून पर्यटनाचे महत्त्वही वाढत आहे. यातूनच एका संकल्पनेने जन्म घेतला, त्याला ‘एक्स्पिरिअन्स टुरिझम’ म्हणजे ‘अनुभवात्मक पर्यटन’ म्हणतात. एखाद्या जागी फक्त जाऊन येण्यापेक्षा तिकडचे जीवन, पद्धती प्रत्यक्षात अनुभवण्याकडे पर्यटकांचा ओढा आहे. माणूस हा खेडय़ातून शहराकडे गेला आहे. आज बहुतांश शहरी कमावणारा गट शहरातच जन्मलेला असला तरी आपले आजोबा, खापरपणजोबा कसे जीवन जगायचे हे त्याला अनुभवायला आवडते. ज्यांना गाव नाही त्यांना गावातील जीवन पाहायला आवडते. यातूनच कृषी पर्यटनाची क्रेझ निर्माण झाली आहे. ती ओसरणार नाहीच. त्यामुळे कृषी पर्यटन व्यावसायिक म्हणून आपण काय देतोय यावर आपल्याकडे पर्यटकांचा ओघ कसा असेल हे अवलंबून आहे. अतिशय सुंदर आणि आव्हानात्मक व्यवसाय-कृषी पर्यटन!

कृषी ही माणसाची मूलभूत क्रिया. माणूस भटक्या जगातून स्थिर झाला तो कृषी करण्यासाठीच. त्यामुळे हजारो वर्षापासून तो शेती करतो आहे आणि त्यातील चिखलाशी त्याची नाळ जन्मजन्मांतरीची. कितीही काचेच्या चकचकीत ऑफिसमध्ये राहून कॉम्प्युटरच्या जंजाळात तो काम करू लागला तरी त्याला या मोकळ्या हवेचे आणि या चिखलाचे अप्रूप नेहमीच राहणार. नेमकी हीच गरज कृषी पर्यटन पूर्ण करते. येणा-या पर्यटकाला गावाच्या वातावरणाचा फील देऊन, त्याला शेतीच्या हिरवळीने थंड करून दोन तीन दिवसांचा न विसरता येणारा अनुभव दिलात की तो पर्यटक पुन्हा तुमच्याकडे येणारच आणि आपल्या मित्रांनाही घेऊन येईल.

..आता कृषी पर्यटनासाठी हे महत्त्वाचे
टार्गेट मार्केट : कुठल्याही व्यवसायाची पहिली गरज म्हणजे आपले मार्केट काय आहे ते समजणे. ते समजले की त्यांच्या गरजा समजू शकतात. कृषी पर्यटक हा शहरात राहणारा किंवा अगदी विदेशातील एखादा पर्यटक आहे. त्याला गावातील निर्मळ, निर्भेळ वातावरणाचा अनुभव घ्यायचा आहे. त्यामुळे तुमच्याकडे एखाद्या कंपनीतील ऑफिसरपासून एखाद्या मोठय़ा कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकापर्यंत कोणीही येऊ शकतो. किंबहुना आपले मार्केटिंग असे असावे की जास्तीत जास्त मोठय़ा लोकांपर्यंत आपण पोहोचू. रोजच्या कामाची दगदग, टेन्शन प्रेशर अशा लोकांना अधिक असते. त्यामुळे नेहमीच्या आयुष्यातून अशा निर्भेळ जगात येण्याची गरज त्यांच्यापेक्षा अधिक कोणालाही नसेल. बरे! पर्यटनात तुम्ही गिराईकाला सुंदर अनुभव देणे गरजेचे असते, की मग तो अशा वेळेस पैशांची काळजी करीत नाही. किंबहुना ते दोन-तीन दिवस त्याला कुठली काळजी येऊच नये ही तुमची जबाबदारी समजा.

जागा : तुम्हाला शेत तयार करायचे आहे आणि त्याभोवताली पर्यटनाच्या सुविधाही द्यायच्या आहेत. त्यामुळे तुमच्या कडची जागा ही शेतीसाठी पूरक असावी. साधारणत: २-५ एकर जागा तुमच्याकडे असावी. अर्थात ती सरळ असावी असे नाही. तुम्हाला या जागेचा वापर शेतीसाठी नाही तर शेतीसदृश परिस्थिती निर्माण करण्यासाठी करायचा आहे. जागा उंच-सखल असली किंवा डोंगराळ असली तरीही कल्पकतेने त्याचा वापर केला जाऊ शकतो.

या ठिकाणी तुम्ही काय करू शकता?
तुम्ही जागेचे विभाजन करून थोडय़ा भागात भातशेती, थोडय़ा भागात भाज्या आणि फळझाडांची लागवड करू शकता. त्यामुळे शेतातील ताजा माल तुम्ही जेवणाला वापरू शकाल. जागा पाच एकर किंवा तत्सम असेल तर तुम्ही ब-यापैकी मोठी शेती करू शकता. थोडय़ा भागात तुम्ही गोडय़ा पाण्यातील मत्स्यशेती आणि थोडय़ा जागेत कुक्कुटपालन करू शकता. दुग्धव्यवसाय आणि शेळीपालन यामध्ये शेणाची किंवा विष्ठेची घाण निर्माण होत असल्याने पर्यटकांच्या राहण्याच्या जागेपासून लांब तुम्ही ते करू शकता. मात्र, शक्यतो या सर्व गोष्टींचा वापर हा तुमच्या पर्यटनास वातावरण निर्मितीसाठी आणि फारतर पर्यटकांच्या गरजेपुरता हवा, अन्यथा हे व्यवसाय जास्त होतील आणि पर्यटनाकडे दुर्लक्ष होईल.
तूम्ही हे सर्व प्रकार न करता संपूर्ण जागेवर फक्त फुलशेती सुद्धा करू शकता. पाश्चात्त्य देशात लांबच लांब पसरलेल्या झेंडूच्या किंवा गुलाबाच्या फुलांच्या बागा असतात. त्यामुळे ती जागा खूप सुंदर दिसते.

जंगल पर्यटन
तुमच्याकडील जागा डोंगराळ असेल किंवा डोंगराच्या जवळ असेल, तर वर उल्लेखलेल्यांपेक्षा अतिशय वेगळे असे जंगल पर्यटन तुम्ही करू शकता. यात तुम्हाला तुमचं पर्यटकांना जंगलात आल्याचा फील द्यायचा आहे. त्यामुळे तुम्ही बाबू, खैर असे मोठे मोठे वृक्ष लावाल. त्याचबरोबर औषधी वनस्पतींची लागवड करू शकता. बांबू तीन वर्षात प्रचंड प्रमाणात उत्पादन देतात. त्यामुळे तो फायदेशीर वृक्ष आहे.
याचबरोबर तुम्हाला ससे, हरिण असे प्राणी पाळता येतील जेणेकरून जंगलाचा फील येईल. एखाद्या ठिकाणी कृत्रिम धबधबा तयार करा. मात्र एका गोष्टीची काळजी घ्या की पर्यटकांना कुठेही भीती वाटणार नाही.

विशेष घ्यायची काळजी..
हा व्यवसाय अतिशय जोखमीचा व्यवसाय आहे. कारण यात तुमच्या पर्यटकांची जबाबदारी आणि काळजी तुमच्यावर असते. त्यामुळे अनेक गोष्टीची काळजी घेण्याची गरज असते.
कृषी पर्यटनात विशेष घ्यायची काळजी म्हणजे पर्यटकांची सुरक्षितता. पर्यटकांना कधीही असुरक्षित किंवा भीती वाटणे हा धोक्याचा इशारा आहे. गावातील आयुष्यातील शांतता, निरागसता आणि वेळेच्या मागे न धावणारी जीवनपद्धती याचा त्यांना पुरेपूर आनंद घेऊ द्या. मात्र कुठेही गावातील गूढ वातावरण, भुतांची भीती, साप, विंचू आणि जंगली प्राणी यांची भीती लोकांना सतावणार नाही याची काळजी घ्या.
याचबरोबर गावातील राजकारण, काही कपटी माणसे यांच्यापासून पर्यटकांची काळजी घ्या.

घरे : राहण्याच्या रूम्स कौलारू घरांसारख्या दिसणे अधिक उत्तम. बाहेरील बांधकाम विटांचे किंवा कुडाचे असले तरी आत एखाद्या हॉटेलच्या रूमप्रमाणे सुखसोयी असाव्यात. रूम एसी असेल, तर अधिक उत्तम.
प्रत्येक घरात डबल बेड, फ्रीज, उत्तम बाथरूम व शौचालय आणि हवेशीर व सूर्यप्रकाश येईल अशा खिडक्यांच्या रचना असाव्यात. पडदे, उत्तम दरवाजा, खिडक्या अशी पर्यटकांच्या प्रायव्हसीची पुरेपूर काळजी घेणारी यंत्रणा असावी.

पर्यटन वेळापत्रक
तुम्ही पहिल्या दिवशी पर्यटकांना सकाळी बोलावता तेव्हा त्यांना वेलकम ड्रिंक देऊन त्यांचे स्वागत करा. त्यानंतर त्यांना नाश्ता देऊन फ्रेश व्हायला सांगा. पुढचे दोन दिवस तुमच्या पर्यटन केंद्राच्या रचनेप्रमाणे तुम्ही वेळापत्रक आखून द्या. तुमच्या केंद्रात अशा गोष्टींचा भरणा करा उदा. कृत्रिम धबधबा, ओहोळ ज्याच्या आजूबाजूला पर्यटक स्वत:चं मर्जीप्रमाणे वेळ घालवू शकतो. तुमच्या केंद्राभोवतीची तीन-चार पर्यटन स्थळे त्यांना दाखवून आणू शकता. उदा: गुहागर/ सिंधुदुर्ग येथे केंद्र असेल, तर मालवण किल्ला, तारकर्ली, गणपतीपुळे इ. मात्र पर्यटकांची जास्त दमछाक होणार नाही याची काळजी घ्या. दुसरी बाब म्हणजे पर्यटकाला तुमच्या केंद्रात अधिक वेळ घालवता आला पाहिजे याकडे लक्ष द्या.
बैलगाडी सैर, माकडवाल्याचे खेळ, सकाळी वासुदेव, संध्याकाळी दही, रात्री ठेचा, हंडीतील चिकन, मटण, भाज्या अशा खास गावरान गोष्टींचा भरणा करा. त्यामुळे पर्यटकाला अधिकाधिक अनुभव घेता येईल. तुमच्या शेतातील सैर, त्यांना थोडी कामे करू द्या, तळ्यातील मासे पकडू द्या, या गोष्टींचा अनुभव त्यांना घेऊ द्या.

उत्पन्न आणि खर्चाचा मेळ उत्पन्न :
तुम्ही दोन रात्री, तीन दिवसांचे पकेज ठेऊ शकता. तुमचे केंद्र कुठे आहे आणि जेथून मुख्य पर्यटक येऊ शकतात उदा मुंबई, पुणे, औरंगाबाद येथून ते किती लांब आहे यावर तुम्ही किती दिवसांचे पकेज ठेवावेत हे अवलंबून आहे.
= पर्यटकांचा तुमच्या केंद्रापर्यंत येण्याचा वेळ
= तुमच्या केंद्रातून परत घरी जाण्याचा वेळ
= साधारणत: त्यांना कामावर सुट्टी घ्यावी लागेल का याचा अंदाज
= पर्यटनाचा कालावधी
= तुमच्या केंद्राभोवती असणारी पर्यटनस्थळे
यावर तुमचे पकेज किती दिवसांचे असावे हे अवलंबून आहे.