मरण अटळ असले तरी ते येत असताना आपण परावलंबी आहोत. नाकातोंडात नळ्या घातल्या आहेत आणि केवळ कृत्रिम उपकरणाच्या साहाय्याने जिवंत आहोत अशी स्वतःबद्दलची कल्पनाच कोणी करू शकत नाही. आपला शेवटचा दिवस गोड व्हावा ही प्रत्येकाची इच्छा असल्याने अशा विषयावर चर्चा करणे म्हणजे काही तरी अभद्र बोलणे असे समजले जाते. आपल्या माहितीत अशी काही उदाहरणे असतील, ज्यांच्यावर त्यांच्या प्रिय व्यक्तींना केवळ भावनेच्या आहारी जाऊन असे फारसा उपयोग नसलेले उपचार करण्याची वेळ आली. यात ती व्यक्ती तर गेलीच पण त्याच्या कुटुंबीयांना मानसिक त्रासातून जावे लागले. याशिवाय मोठे भरमसाट बिल झाल्याने आर्थिक झटका बसला ते वेगळेच. काही उपाय होत नाही, परवडत नाही किंवा काही उपायच नाहीत अशा प्रसंगात यामुळे पेशंटला घरी नेऊन तो कधी जातो याकडे वाट पाहत बसावे लागते ते वेगळेच.

अशी वेळ नक्की कोणावर कधी येईल हे सांगून येत नसेल तरी सुजाण व्यक्ती आपल्यामुळे भविष्यात आपल्या कुटुंबावर कदाचित अशी वेळ आली, तर काय करायचे? आपल्या आजारावर उपचार करून उपयोग होणार नसेलच, तर खर्च करत राहायचा का? ज्याच्या सुखासाठी आपण आयुष्यभर धडपडलो त्या प्रिय व्यक्तींना मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रासात अडकवून ठेवावे का? कोणते उपचार करावेत, करू नयेत, याबद्दल आपली इच्छा व्यक्त करणारे इच्छापत्र आपण बनवू शकतो. यास लिव्हिंग विल असे म्हणतात. आपण या संदर्भात निर्णय घेण्यास सक्षम नसू, अशा वेळी कोणते उपचार करावेत आणि कोणते करू नयेत यासंबंधी आपल्या इच्छा त्यात व्यक्त करता येतील. थोडक्यात आपली इच्छा नसताना आपल्यावर कोणते उपचार केले जाऊ नयेत याविषयी आपल्या कुटुंबीयांना केलेले हे मार्गदर्शन असते. त्यामुळे लोक काय म्हणतील? सुचवलेले उपचार करावे की न करावे यासंबंधी वेळेत निर्णय घेण्याचे मानसिक बळ त्यांना मिळेल. वैद्यकीय इच्छापत्राद्वारे आपण ते करू शकतो.

कोणतेही निर्णय घेण्यास आपण असमर्थ असलो किंवा झालो तर आपल्यावर कोणत्या टप्प्यापर्यंत उपचार करावेत, याविषयी आपले वारस किंवा जे कोणी काळजी घेणारे असतील त्यांना आणि आपल्यावर उपचार करणारे कोणीही डॉक्टर (फॅमिली डॉक्टर ही संकल्पना आता मोडीत निघाली आहे.) यांना दिशादर्शन करणारा हा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. उदा. मेंदू काम करेनासा झाल्यास कृत्रिम साधने लावू नयेत, अन्न जात नसल्यास नळीच्या द्वारे अन्न देऊ नये. श्वसनाचा त्रास होत असल्यास ऑक्सिजन लावू नये, व्हेंटिलेटरवर ठेवू नये किंवा विशिष्ट पॅथीचेच उपचार करावेत अथवा करू नयेत, यासंबंधी आपण त्यात लिहू शकतो. याचबरोबर मृत्यूपश्चात नेत्रदान, देहदान अवयवदान करायचे असल्यास त्या संदर्भातील आपल्या इच्छा यात लिहिता येतील.

यासंबंधी पूर्ण विचार करून आपल्या इच्छा लिहाव्यात आणि त्याचा तपशील एकत्रित करून ₹ १००/- च्या बॉण्डपेपरवर ते लिहून काढून त्यावर सही करावी. साक्षीदार म्हणून जोडीदार, मुले यांची सही घ्यावी. याशिवाय या व्यक्तीची मानसिक स्थिती उत्तम असल्याचे डॉ. तेथेच प्रमाणित करून सही करावी याशिवाय दोन विश्वासू व्यक्तींच्या सह्या घ्याव्या म्हणजे कठीण प्रसंगात घरचे लोक द्विधा मनस्थितीत असले तर त्यांचे ते अशा प्रसंगात योग्य निर्णय घेण्यात सहाय्य करतील. असे वैद्यकीय इच्छापत्र नोटराईजकरून त्याच्या प्रमाणित प्रति अधिक जास्तीची प्रत प्रत्येक संबंधितांना द्यावी.

मृत्यूपत्र आणि हे इच्छापत्र यातील महत्त्वाचा फरक हा की मृत्यूपत्राची अंमलबजावणी व्यक्तीच्या मृत्यूनंतर होते आणि तो आपल्या संपत्तीचे वाटप कसे व्हावे हे सांगणारा कायदेशीर दस्त आहे. त्यातील तरतुदींची माहिती वारसांना नसते. वैद्यकीय इच्छापत्रातील तरतुदी तुम्ही जेव्हा कोणतेही निर्णय घेण्यास अकार्यक्षम होता तेव्हाच उपयोगात आणण्याचा विचार केला जातो. मृत्यूपत्रातील तरतुदी लाभार्थीना माहिती नसण्याची शक्यता जास्त असते. वैद्यकीय इच्छापत्रात त्यांना याची माहिती आधीच असल्याने ठोस निर्णय घेण्यास मदत होते. याचा अर्थ आपण असे इच्छापत्र केल्यास आपल्यावर उपचार होणार नाहीत असा नाही, कारण जोपर्यंत व्यक्ती विचार करू शकते, तोपर्यंत तिच्या इच्छेनेच त्यावर उपचार केले जातात. जेव्हा तुम्ही काहीही करू शकत नाही, अशा प्रसंगातच काय करावे याचे मार्गदर्शन तुम्हीच करून ठेवलेले असल्याने त्याचा नक्की सारासार विचार केला जातो. त्यामुळे असे इच्छापत्र केले तर त्याप्रमाणे केले जाईल का? अशी शंका आपण बाळगू नये. उलट आपली निश्चित इच्छा सांगून त्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य बहाल करावे कारण आपल्या प्रिय व्यक्तीचे हाल झालेले पाहात राहणे कोणताही संवेदनशील माणूस पसंत करणार नाही.

डॉ. मुरी या शास्त्रज्ञांनी त्यांच्या राहिलेल्या इच्छांमध्ये (बकेट लिस्ट) जिवंतपणीच आपल्या मृत्यूनंतर होणाऱ्या शोकसभेत लोक काय म्हणतील, ते ऐकण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याप्रमाणे त्यांच्या विद्यार्थ्यांनी अशी शोकसभा आयोजित केली होती ज्यात ते स्वतः सहभागी झाले होते. याच संकल्पनेच्या जवळपास जाणारी ही कल्पना आहे.

आधारित – (लेखन संदर्भ : पुस्तके -आमच्यासाठी आम्हीच, आनंदस्वर ज्येष्ठांसाठी, डॉ. रोहिणी पटवर्धन, रोहन प्रकाशन)

(पूर्वार्ध)

-उदय पिंगळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here