महाराष्ट्रातील फडणवीस सरकारला काय काय नावं देता येतील! सगळी नावं देऊन झाली. ‘बोलबच्चन’ म्हणून झाले.. ‘सरकार झोपा काढत आहे का’?.. असे न्यायालयातर्फे विचारून झाले. ‘हे सरकार घोषणाबाज आहे’, असेही सांगून झाले. रविवारी औरंगाबादला दुष्काळ परिषदेत शरद पवार यांनी ‘भाजपाचे फडणवीस सरकार फसवणूक करणारे आहे’, असे म्हणून झाले. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री. नारायण राणे यांनी या फडणवीस सरकारचा जेवढा पंचनामा करायचा तेवढा करून झाला.

FADANVIS AND KHADSEसत्तेवर येण्यापूर्वी हे फडणवीस, हेच खडसे, हेच तावडे आणि त्याच मुंडे हे सगळे काँग्रेस राजवटीबद्दल अनेक प्रकारचे आरोप करीत होते. निवडणुकीत त्यांनी जी काही आश्वासने दिली ती तर भंपक होतीच.. त्यातील एकही आश्वासन या सत्तेतील मंडळींना पूर्ण करता आले नाही. सरकार चालवायला वकूब लागतो आणि खानदानीपणा लागतो. या सरकारमधील या पंचपाकळय़ांना तो वकूबही नाही आणि तो खानदानीपणाही नाही. हे बाजारभुंडगे वाटतात.

एका पत्रकाराला खडसे सांगत होते की, ‘आम्ही सत्तेते येऊ अशी अपेक्षा नव्हती.. अपघाताने आम्ही सत्तेत आलो.. ’ जसे अपघाताने आले तसे अपघाताने जातील. कारण विरोधी बाकावर बसून काँग्रेसवर आरोप करणे सोपे होते. सरकार चालवताना यांची दमछाक झाली. खडसे म्हणतात, ‘मुख्यमंत्र्यांना राजकारण कळत नाही आणि सरकार चालवता येत नाही’, मुख्यमंत्री म्हणतात, ‘नाथभाऊंच्या भ्रष्टाचारप्रकरणात मी लक्ष घालणार नाही’, तावडे म्हणतात, ‘आजपर्यंत सांस्कृतिक खाते कोणीही असे हाताळले नव्हते.’,

पंकजा मुंडे म्हणतात, ‘फडणवीस मुख्यमंत्री असतील पण लोकांच्या मनातील मुख्यमंत्री मीच’. असा या मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्र्याचा ढोल वेगवेगळा वाजत आहे. आता या सरकारला १८ महिने झाले. म्हणजे दीड वर्षे! या दीड वर्षात या सरकारने एकही मोठा प्रकल्प सुरू केलेला नाही. ना कोणत्या धरणाचे नियोजन केले.. ना कोणत्या विद्युत निर्मिती प्रकल्पाचे नियोजन केले. फडणवीस यांच्या विदर्भाच्या भाषेत नुसतीच ‘चकल्लस’! असे हे फडणवीस सरकार सध्या कमालीचे गोत्यात आलेले आहे. गेल्या वर्षी पंकजा मुंडेंची चिक्की गाजली. त्या बाईंनी गोष्टी किती मोठय़ा केल्या होत्या. पण चिक्कीच त्यांच्या घशात अडकली. त्याच वर्षात तावडे यांच्या गोंधळाला सीमा नाही. बोगस पदवी असलेला हा माणूस शिक्षणमंत्री म्हणून काम करतो. ‘नीट’चा घोळ तावडेंमुळेच झाला.

आता खडसे असे काही सापडले आहेत की, त्यांनी राजीनामा देणे त्यांच्याच हिताचे आहे. नाही तर उद्या कोर्टात जेव्हा याचिका दाखल होणार आहे, तेव्हा खडसेंची सगळी अब्रू चव्हाटय़ावर येईल. मुंबई महापालिका जशी ‘भरत’ नावाचा कोणी कंत्राटदार चालवतोय, तशी मंत्र्यांची कार्यालये त्यांचे स्वीय सहाय्यक चालवत आहेत. या खडसे यांचा गजानन पाटील नावाचा कोणी स्वीय सहाय्यक आहे. या गजानन पाटील यांना अटक झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस सध्या खूश आहेत. कारण फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यातल्या त्यात कामाचा उरक आणि वकूब कुणाला असेल तर तो खडसे यांनाच आहे. तेव्हा खडसेंचा काटा परस्पर निघाला तर तो फडणवीस यांना हवाच आहे. आतापर्यंत कोणाही मंत्र्यांवर झालेला नाही, असा बडय़ा रक्कमेचा आक्षेप खडसेंवर झालेला आहे.

तब्बल ३० कोटी! एसीबी ही तपास यंत्रणा आता खोलात जाऊन तपास करीत आहे. खडसे आव आणून जोरात सांगत आहेत की, ‘कोणी कसाही तपास करा’. विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहेत. खडसे काही राजीनामा देणार नाहीत. पण ही मंडळी पावित्र्याचा आव आणून वागत होती. काँग्रेस राजवटीत बोलण्यात पटाईत होती. आता यांचे पतिव्रत्य कसे कुचकामी आहे, हे अवघ्या १८ महिन्यांतच कळून चुकले. खडसे म्हणतात, ‘मी त्यातला नाही’. तुम्ही त्यातले नाहीत तर तुमच्यावर आरोप का व्हावा..? खडसे म्हणतात, ‘माझा स्वीय सहाय्यक माळकरी आहे’. तो माळकरी असो किंवा टाळकरी असो.. तुम्ही तर शाळकरी नाहीत! तुमच्यावर आरोप का व्हावा? उद्या जर हा गजानन पाटील उलटला तर खान्देशच्या लेवा पाटलांना हा गजानन पाटील भारी पडेल!

मध्यंतरी ठाणे जिल्ह्यातील एक बातमी प्रसिद्ध झाली. त्या ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक भ्रष्टाचार महसूल खात्यात आहे, असा जाहीर आरोप झाला. हा भ्रष्टाचार कसा आहे.. त्याचे तपशील जाहीर झाले. महसूल खात्यानंतर भ्रष्टाचारी खाते क्रमांक दोन म्हणून ठाणे जिल्ह्यातील पोलीस खात्याचा उल्लेख आला. महसूल खाते खडसेंकडे.. कृषी खाते खडसेंकडे.. पोलीस खाते फडणवीसांकडे.. सगळी महत्त्वाची खाती खडसे आणि फडणवीस मांडीखाली दाबून बसलेत. खडसेंनी हट्टाने रामटेक बंगला मागून घेतला. कारण रामटेक बंगल्यात राहणारे शरद पवार, विलासराव देशमुख पुढे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे या रामटेकमध्ये राहिलो तर राम पावेल अशी भोळी आशा खडसे यांना आहे. पण खडसेंनी शरद पवार आणि विलासराव तिथे राहात होते एवढेच लक्षात ठेवले.

खडसेंच्या आधी तिथे भुजबळ राहात होते! हे ते विसरले. त्यामुळे मुख्यमंत्री बनायचे सोडा, हे ३० कोटी रुपयांचे प्रकरण खडसे यांच्या अंगावर उलटू शकते आणि त्यांचा पतिव्रत्याचा बुरखा फाटू शकतो. गजानन पाटील उलटला तर मग ‘रामटेक’मध्ये राहणारे भुजबळ जिथे गेले त्या रस्त्याने खडसेंना जावे लागेल. सध्या खडसे राजीनामा देत नाहीत, असे म्हणतात. राजीनामा मागूच नका. राजीनामा दिला की, माणूस सुटला. विरोधी पक्षाने याच्या खोलात जावे. काँग्रेसला बदनाम करणारी हीच चौकडी होती. अवघ्या १८ महिन्यांतच त्यांचे भांडे फुटले. आता यांना सुके सोडू नका. महाराष्ट्रात भाजपाची कलई निघायला सुरुवात झालेलीच आहे. गेल्यावेळी भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलणारी ही मंडळी तेवढीच भ्रष्ट आणि ढोंगी आहेत. सोहळं नेसून हे पूजा करतात.

भाजपा चारित्र्याचा फार मोठा पाठीराखा आहे, असा आव आणतात. पण यांच्याएवढे ढोंगी जगात कोणी नाही. एक क्षणभर एक टक्का भ्रष्ट परवडेल. पण ढोंगी परवडणार नाही. भाजपाची कलई आता निघू लागली आहे. खडसे म्हणाले त्याप्रमाणे अनपेक्षितपणे यांच्या हातात सत्ता आली. किती खाऊ आणि कसे खाऊ.. तिकडे गिरीश बापट यांनी तुरीच्या डाळीचे वरण ओरपून घेतले. मागच्याही सरकारात फडणवीस यांच्या काकू शोभाताईंच्या तोंडाला लाखी डाळ लागली होतीच. त्या लाखी डाळीच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण त्यावेळी गाजले. युती सरकारातील शशिकांत सुतार, महादेव शिवणकर यांच्या शिवणकाम, सुतारकामामुळे त्यांनाही राजीनामा द्यावा लागला. सुरेश जैन यांना राजीनामा द्यावा लागला. बबनराव घोलप यांना राजीनामा द्यावा लागला. आता राजीनाम्याच्या रांगेत खडसे आहेत. तेव्हा चक्र उलटलेले आहे.

घडय़ाळाचे काटे उलटे फिरत आहेत. विरोधी पक्षाने मध्यंतरी असे म्हटले होते की, ‘एका तरी मंत्र्याला घरी पाठवू’.. विरोधक संघटित वागले असते तर किमान चार मंत्र्यांना घरी पाठवले असते आणि स्वतंत्र विदर्भाच्या प्रश्नावर अखंड महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यालाही शरण आणता आले असते. ती संधी विरोधकांनी गमावली. आता खडसे सापडले आहेत. लोहा गरम हैं.. हाथोडा मार दो..! केंद्रातील मंत्री म्हणतात, सरकार न्यायालय चालवतं की आम्ही. महाराष्ट्रातील सरकार पीए चालवतात की काय?