लोकमान्य टिळकांनी १८९३ रोजी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ पुण्यात रोवली आणि हा उत्सव देशभर साजरा होऊ लागला.

GANAPATIपुणे – लोकमान्य टिळकांनी १८९३ रोजी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ पुण्यात रोवली आणि हा उत्सव देशभर साजरा होऊ लागला. लो. टिळकांनी विंचूरकर वाडय़ात पहिला गणेशोत्सव सुरू केला. तेव्हा अगदीच बोटावर मोजण्याइतकी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे होती. आता या उत्सवाला मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे. पुण्यात शेकडो गणेश मंडळे स्थापन झाली आहेत. आज हा केवळ उत्सव राहिला नाही तर त्याला लोकोत्सवाचे रूप प्राप्त झाले आहे. ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे आगमन आणि विसर्जन केले जाते. वैभवशाली परंपरा असलेला हा गणेशोत्सव पाहण्यासाठी पुणेकरांबरोबर राज्यभरातील भाविक गर्दी करतात.

भव्य गणेश मूर्ती ही पुण्याची खासियत. पुण्याचे गणपती नेहमी आकषर्णाचे केंद्र राहिले आहेत. त्यात येथे वाजवले जाणारे पारंपरिक वाद्य लोकांना आकर्षति करतात. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना िझग आणणारी ढोल पथके अनेकांच्या कुतूहलाचा विषय असतात. कुठेही ढोलचा आवाज कानी घुमला की पाय आपोआपच ताल धरू लागतात. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या निनादाने आसमंत दुमदुमतो. त्यात आणखी भर पडते ढोल पथकाच्या लयबद्ध नादाची. आजकालच्या डीजेच्या जमान्यात पुण्यातील ढोल पथकांची संख्या वाढत आहे.

या ढोल पथकांच्या सरावाला जून-जुलैपासून सुरुवात होते. यात जर सामील व्हायचं तर आधीच नाव नोंदवण्याचे आवाहन केले जाते. लॉन्स, मैदाने, नदीकाठी अशा मोकळ्या ठिकाणी या ढोल ताशांचे आवाज कानावर पडत असतात. १९९० च्या दशकाचा विचार केला तर पुण्यात अगदी बोटावर मोजण्याइतकी ढोल पथकं होती. बहुतांश पथके शाळा अथवा महाविद्यालयांची होती. आज मात्र प्रत्येक मंडळाला स्वत:चे धोल पथक असावे, असे प्रत्येक मंडळाला वाटू लागले आहे. त्यामुळेच गेल्या तीन-चार वर्षात ढोल पथकांची संख्या प्रचंड वाढली आहे. अनेक ढोल-ताशा पथके व्यवसाय म्हणून स्थापन झालेली आहेत. तर काही देवाची सेवा म्हणून वाजवतात.

ढोल पथकांबरोबरच पुण्यातील गणेशोत्सव काळातील देखावेही पाहण्यासारखे असतात. जवळपास सर्वच गणेश मंडळांचा सामाजिक देखावे साकारण्याकडे कल असतो. हे देखावे पाहण्यासाठी पुण्याबरोबरच मुंबईकरही मोठय़ा संख्येने सहभागी होतात. पुण्यातील मानाच्या पाच गणपतींशिवाय भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचे रूप पाहण्यासाठी लाखो भक्तांची झुंबड उडते. त्याचबरोबर दरवर्षी तयार केली जाणारी मंदिराची प्रतिकृतीही दिव्य आणि भव्य असते. दरवर्षी महिला अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम पाहण्याजोगा असतो.

पुण्याचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या कसबा गणपतीचे विसर्जन आणि मिरवणूक पालखीतून पारंपरिक पद्धतीने केली जाते. मानाचा दुसरा गणपती व पुण्याची ग्रामदेवता असलेल्या तांबडी जोगेश्वरी मंडळात महिला भजनासारखे अनेक धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात. या गणपती बाप्पाची मिरवणूक ही पाहण्याजोगी असते.

मानाचा तिसरा गणपती आणि पुण्याचा राजा म्हणून ओळखले जाणारे मंडळ म्हणजे गुरुजी तालीम गणपती होय. मंडळातील बाप्पाची बाल गणेशाची मूर्ती उंदरावर विराजमान असते. तुळशीबाग गणपती पुण्यातील चौथा मानाचा गणपती. या गणपतीची मूर्ती फायबरपासून बनवलेली असते. चांदीच्या दागिन्यांनी मढवलेली मूर्ती पाहण्यास मंडळात मोठय़ा प्रमाणात गर्दी होते.

पुण्यातील पाचवा मानाचा गणपती म्हणजे केसरीवाडा गणपती. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवापैकी एक. केसरी वाडय़ातील पटांगणात बाप्पा बसवला जातो. पूर्वी लोकमान्य टिळकांचे भाषण आणि व्याख्यान येथे होत असे आणि ती परंपरा मंडळाने अजूनही जपली आहे. आजही अनेक दिग्गजांचे कार्यक्रम आणि वैचारिक कार्यक्रम येथे आयोजित केले जातात.

महात्मा फुले मंडई आणि रे मार्केटच्या परिसरात साजरा होणा-या गणेशोत्सवाला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. गणपतीची मूर्ती उजव्या सोंडेची असून इच्छापूर्ती गणपती म्हणून ओळखली जाते.

हुतात्मा बाबू गेनू मंडळाचा गणपती पुण्यातील मानाचा व नवसाचा गणपती होय. मंडळातील पगडी घातलेली बाप्पाची मूर्ती पाहण्यासारखी असते.