Monday, May 20, 2024
Homeक्रीडाभारताच्या विजयाचे फटाके फुटतील?

भारताच्या विजयाचे फटाके फुटतील?

माजी विजेत्यांची आज अफगाणिस्तानशी गाठ

अबुधाबी (वृत्तसंस्था) : आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमधील सुपर-१२ फेरीतील (ग्रुप २) बुधवारच्या (३ नोव्हेंबर) दुसऱ्या सामन्यात भारताची गाठ अफगाणिस्तानशी पडेल. सलग दोन पराभवांनंतर माजी विजेत्यांची गुणांची पाटी कोरीच आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या विजयाचे फटाके किमान आज फुटावेत, अशी अपेक्षा क्रिकेटचाहत्यांना आहे.

भारताचा संघ हा टी-ट्वेन्टी प्रकारातील एक सर्वोत्तम संघ समजला जातो, मात्र विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पुरती निराशा केली आहे. परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्ताननंतर बलाढ्य न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाल्याने जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असलेल्या माजी विजेत्यांवर सुपर-१२ फेरीत बाहेर पडण्याची वेळ आली आहे. अफगाणिस्तानवर विजय मिळवल्यास भारताचे आव्हान कायम राहील. त्यामुळे टीम इंडियाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भारताला दोन सामन्यांनंतर पहिल्या विजयाची प्रतीक्षा असली तरी अफगाणिस्तानने तीन सामन्यांत दोन विजय मिळवले आहेत. चार गुणांसह ते ग्रुप २ मध्ये दुसऱ्या स्थानी आहेत. त्यांनी भारतासह न्यूझीलंडला मागे टाकले आहे. उर्वरित दोन सामन्यांत एक विजय मिळवला तरी अफगाणिस्तान उपांत्य फेरीसाठी दावेदारी पेश करू शकेल. भारतानंतर त्यांना न्यूझीलंडशी दोन हात करायचे आहेत, मात्र दोन्ही प्रतिस्पर्धी तितके फॉर्मात नाहीत. परिणामी, खेळ उंचावल्यास अफगाणिस्तानला सेमीफायनल प्रवेशाची अनोखी संधी आहे.

भारताला कुणाची दृष्ट लागली, तेच कळत नाही. वर्ल्डकपसारख्या जागतिक स्पर्धेत त्यांची कामगिरी कमालीची ढेपाळली आहे. अनुभवी क्रिकेटपटूंनी निराशा केल्याने संघनिवड चुकीची ठरत आहे. प्रत्येक नवा प्रयोग फसत आहे. त्यामुळे अंतिम संघ निवडण्यावरून संघ व्यवस्थापनावर टीका होत आहे. झटपट क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी महत्त्वाची ठरते. याच दोन्ही आघाड्यांवर टीम इंडिया सुपरफ्लॉप ठरली आहे. भारताच्या आघाडी फळीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांसमोर सपशेल नांगी टाकली आहे. दोन सामन्यांत केवळ एकच अर्धशतकाची नोंद आहे. कर्णधार कोहलीने पाकिस्तानविरुद्ध भारताकडून पहिली आणि एकमेव हाफसेंच्युरी मारली तरी न्यूझीलंडविरुद्ध तो दुहेरी आकडा गाठू शकला नाही. सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुलला दोन डावांमध्ये अनुक्रमे १४ आणि २१ धावाच जमवता आल्या आहेत. सूर्यकुमार यादव आणि ईशान किशनला आलटून-पालटून खेळवण्याचा प्रयोग फसला आहे. यष्टिरक्षक, फलंदाज रिषभ पंतला प्रभाव पाडता आलेला नाही. हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा हे केवळ नावाला अष्टपैलू वाटतात. त्यामुळे कागदावर वर्ल्डक्लास वाटणारी बॅटिंग क्लब दर्जाची अनुभवायला मिळत आहे.

रोहित आणि राहुल हा आर फॅक्टर महत्त्वपूर्ण ठरेल, असे वाटत होते. त्यांना फॉर्म नसल्याने न्यूझीलंडविरुद्ध रोहितला तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्यात आले, मात्र अपयश कायम आहे. गोलंदाजीतही आलबेल नाही. दोन सामने मिळून भारताच्या सर्व गोलंदाजांना प्रतिस्पर्धी संघाच्या केवळ दोन विकेट घेता आल्या. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नावे या विकेट आहेत, मात्र त्यालाही लौकिकाला साजेशी गोलंदाजी करता आलेली नाही. मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमारचा अनुभव प्रत्यक्ष लढतीत पाहायला मिळत नाही. पंड्या आणि जडेजावर विसंबून राहणेही संघाला महागात पडत आहे. वरुण चक्रवर्ती आणि शार्दूल ठाकूरनेही निराशा केली आहे. त्यामुळे अपयश पचवून नव्याने सुरुवात करण्याचे मोठे आव्हान टीम इंडियासमोर आहे. त्यात यश आले, तरच अंतिम चार संघांत स्थान मिळवण्याची थोडी फार आशा बाळगता येईल.

नामिबियावर मात करत अफगाण संघ पुन्हा ट्रॅकवर परतला आहे. त्यांच्याकडून फलंदाजीत नजबुल्ला झाड्रन, हझरतुल्ला झाझाई, मोहम्मद शहझाद, रहमतुल्ला गुरबज तसेच गोलंदाजीत फिरकीपटू राशिद खानसह मुजीब-उर-रहमान आणि नावीद-उल-हक यांनी छाप पाडली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -