Sunday, May 12, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यवास्तवाशी दुरावा आणि आभासीचा स्वीकार

वास्तवाशी दुरावा आणि आभासीचा स्वीकार

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे

आपल्याला समोरची व्यक्ती पूर्णपणे ओळखू आल्याशिवाय तसेच ती खरंच त्या दर्जाची असल्याशिवाय असं कोणतंही ऑनलाइन प्रेमप्रकरण धोकादायकच ठरते. ती तुमच्या भावनांची कदर करणारी असल्यास, तसेच फक्त आणि फक्त तुम्हाला खरंच वास्तविक आयुष्यात साथ देण्यासाठी सकारात्मक असल्याशिवाय असं ऑनलाइन प्रेमप्रकरण मग ते लग्नाअगोदरचं असो अथवा विवाहबाह्य असो, कोणत्याही वयोगटातील स्त्री- पुरुषांमधील असो, महिलांनी ते पुढे नेणं म्हणजे एखाद्यासाठी फक्त आणि फक्त टाइमपासचं साधन बनून राहण्यासारखं आहे. समोरच्या व्यक्तीची आपण प्रायोरिटी आहोत का, असलो तरी किती प्रमाणात? त्याच्या आयुष्यात, मनात आपले स्थान काय, अस्तित्व काय? हे जाणून घेऊनच पुढे मार्गक्रमण करणे योग्य राहील, असे वाटते.

आपल्या शाश्वत आयुष्यात कोण किती काळ खऱ्या अर्थाने कायमस्वरूपी राहणार आहे, याची शहानिशा केल्याशिवाय अशा कोणत्याही समाज माध्यमाच्या प्लॅटफॉर्मवरून तयार झालेले नातेसंबंध, व्हर्चुअल शारीरिक संबंध आपल्या खऱ्या आयुष्याला देखील डॅमेज करतात. ऑनलाइन रिलेशनशिपमध्ये समोरच्याची गरज संपली, तुमच्यातील इंटरेस्ट संपला की, ती व्यक्ती तुम्हाला टाळायला सुरुवात करते. तुमच्याशी न बोलण्याची विविध कारणं आणि सबबी सांगू लागते. तुम्ही स्वतः त्या व्यक्तीपुढे लाचार होऊ लागतात आणि तुमची मन:स्थिती बिघडायला सुरुवात होते.

स्वाती मागील तीन वर्षांपासून तुषारसोबत जे काल्पनिक प्रेम मोबाईलच्या माध्यमातून करत होती, त्यात तिचा प्रत्येक मूड, प्रत्येक काम, प्रत्येक मिनिट हा तुषारच्या वागणुकीनुसार, चॅटिंगनुसार, मेसेजनुसार सतत परिणाम करीत होता. ज्या दिवशी तुषार तिच्याशी फोनवर बोलणार नाही, तो ऑनलाइन असून सुद्धा जेव्हा तिच्या मेसेजला उत्तर देणार नाही, जेव्हा तिचा फोन उचलणार नाही, तेव्हा-तेव्हा ती डिस्टर्ब होत होती. तिच्या तब्येतीवर, कामावर, कुटुंबातील इतर नातेसंबंधांवर त्याचा परिणाम तिला जाणवू लागला होता. सातत्याने मोबाईल चेक करणे, त्याचा मेसेज आला आहे का, तो काय म्हणतोय यावर तिचं लक्ष असायचं. तिने सर्वतोपरी प्रयत्न करून देखील तुषार अजून प्रत्यक्ष भेटणं, बोलणं किंवा ऑनलाइन अनुभवलेलं, बोलण्यातून केलेलं प्रेम प्रत्यक्षात आणायला तयार नव्हता. तीन वर्षांचा प्रदीर्घ कालावधी स्वातीने आपल्या आयुष्यात कोणीतरी असं आहे, फक्त या जाणिवेवर घालवला होता. एका शहरात राहून, एकमेकांना कॉलेज जीवनापासून ओळखत असून, दोघेही उच्चशिक्षित आणि अत्यंत चांगल्या घरातील असून देखील त्यांचं हे प्रेम प्रत्यक्षात आलं नव्हतं, तर स्वातीने तुषारला समोर ठेऊन भविष्यासाठी पाहिलेली स्वप्नं तर खूपच लांब होती. त्यामुळे आजमितीला स्वाती समुपदेशनसाठी आली होती.

त्यामुळे रिलेशनशिप कोणतीही असो, ती जर प्रत्यक्षात येणार असेल आणि प्रामाणिकपणे मनापासून दोघेही इन्व्हॉल होणार असतील, तरच ती पुढे नेण्यात अर्थ आहे. आपल्या सोयीसाठी, कामासाठी आपण मोबाईल वापरत आहोत आणि त्यातून काही सकारात्मक ज्ञान, माहिती मिळाली, तर ती आत्मसात करणार आहोत, याची पूर्ण जाणीव महिलांनी ठेवणे आवश्यक आहे. हाच मोबाईल आपल्या दुःखाचे कारण बनू शकतो, आपली मानसिकता पूर्णपणे बिघडवू शकतो, आपलं कौटुंबिक, सामाजिक आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो, याची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे, असे वाटते.

या ऑनलाइन प्रेम प्रकरणात दोन्ही बाजूने सगळ्या स्टेप्स इतक्या पटापट घेतल्या जातात आणि त्या फिजिकल लेव्हलला जाऊन पोहोचतात की, त्यात कोणतीही प्रेमाची भावना, प्रेम फुलवण्याची प्रक्रिया, जीव लावणं, एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांना पूर्ण समजून घेणं, एकमेकांचे स्वभाव तसेच गरज समजून घेणं, दोघांची जुळत असलेल्या नात्यासाठी कितपत तयारी आहे, ते नातं निभावण्याची कितपत मनापासून इच्छा आहे हे जाणून घेणं याला वेळच घेतला जात नाही. यामुळे अशा ऑनलाइन प्रेमकहाण्या जितक्या वेगाने पुढे जातात तितक्याच वेगाने त्यातलं नावीन्य संपुष्टात देखील येतं.

आजकाल फोफावत चाललेले हे आभासी प्रेमाचे मोहजाल महिलांना खूप लवकर आकर्षित करते आहे. आपल्या सौंदर्याची स्तुती, आपल्यासाठी वापरलेले गोड गुलाबी शब्द, मग ते कोणत्याही समाज माध्यमातून असोत, त्यातील हेतू वेळेत लक्षात घेणे अनिवार्य आहे. एखाद्या महिलेशी अशा प्रकारे संवाद साधणारा पुरुष त्याचवेळी इतरही महिलांवर असे ऑनलाइन प्रेम करून स्वतःच्या करमणुकीसाठी मटेरियल मागवत नसेल, याची काय शाश्वती आपल्याकडे असते? एकच प्रेमाचा मेसेज किंवा सिम्बॉल एकाचवेळी अनेक मैत्रिणींना फॉरवर्ड करणारे महाभाग देखील सोशल मीडियावर सराईतपणे स्वतःचा हेतू साध्य करताना दिसतात.

कोणत्याही महिलेचा जरासा सुंदर अथवा मॉड फोटो डीपीला, प्रोफाइलला दिसला की, लगेच तिने तो आपल्यासाठीच ठेवला आहे आणि ती तशीच असावी, प्रयत्न करायला काय हरकत आहे, इतकी उथळ विचारसरणी ठेऊन वावरणारे, स्वतःला सुशिक्षित, सुसंस्कृत म्हणून घेणारे हायप्रोफाइल व्यक्तिमत्त्व देखील यात मागे नाहीत. आपल्या वास्तववादी जीवनापासून दूर जात आपण जी आभासी दुनिया स्वीकारत आहोत, आपण ज्याला प्रेम समजत आहोत, ज्या अनुषंगाने रिलेशनशिप वाढवत आहोत, ते सगळं बहुतांश वेळा फोल आणि पोकळ असल्याचेच कालांतराने लक्षात येते. त्यामुळे असे प्रत्यक्ष अस्तित्वातच नसलेलं प्रेमाचं, आपलेपणाचं, अंतःकरणापासून निर्माण न झालेलं नातं आपल्याला आयुष्यभर सोबत करणार का, हा विचार नक्की करावा.

meenonline@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -