Monday, May 20, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखमुंबईत झोपडपट्टी पुनर्विकासाची गरज का आहे?

मुंबईत झोपडपट्टी पुनर्विकासाची गरज का आहे?

  • डॉ. निलेश आणि मेघना कुडाळकर

मुंबई हे भारतातील सर्वाधिक लोकप्रिय शहर आहे आणि ते जगातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आहे. मुंबईत अनेक झोपडपट्ट्या का आहेत, याची अनेक कारणे आहेत. मुंबईत झोपड्यांची संख्या वाढण्यास अनेक घटक कारणीभूत आहेत. शहरात येणारे स्थलांतरितांचे लोंढे, घरांची मर्यादित उपलब्धता, न परवडणारी भाडी आणि गरिबीचे वाढलेले प्रमाण ही त्यांपैकी काही. त्याशिवाय वाढती लोकसंख्या आणि मूलभूत सुविधांचा अभाव हे घटकदेखील मुंबईत झोपडपट्टीच्या वाढीस कारणीभूत ठरत आहेत.

१९५६ साली मुंबईच्या एकूण लोकसंख्येपैकी ८ % लोकसंख्या झोपडपट्टीत राहत होती. त्यापुढील अनेक वर्षांत शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्याप्रमाणे झोपडपट्टीवासीयांची संख्यादेखील वाढत गेली. २०११ सालच्या सर्वेक्षणाच्या अनुसार बृहन्मुंबईत झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांची संख्या सुमारे ४१.३ टक्के इतकी होती. म्हणजेच ९० लाखांहून अधिक मुंबईकर झोपडपट्टीत राहत होते.

विकसनशील देशांमध्ये राहणीमानाचा दर्जा सुधारण्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास हे महत्त्वाचे पाऊल आहे. झोपडपट्टीवासीयांची स्वायत्तता अबाधित ठेवून झोपडपट्टी पुनर्विकास करता येऊ शकतो. मुंबई हे आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेले शहर आहे. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्विकासाच्या संदर्भात येथील प्रक्रिया आणि त्याचा अभ्यास अन्य विकसनशील देशांना मार्गदर्शक ठरू शकतात आणि आर्थिक विकासाचे लाभ प्रत्येकाला मिळतील, हे सुनिश्चित केले जाऊ शकते. त्याचप्रमाणे मुंबईच्या धोरणांचे परीक्षण करणे हे झोपडपट्टी पुनर्विकासाच्या संदर्भात सध्याच्या धोरणांमध्ये सुयोग्य बदल करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. सरकारचा विश्वास आहे की, मुंबईसारख्या शहराला झोपडपट्टी पुनर्विकास महत्त्वाचा आहे कारण त्यामुळे झोपडपट्टीवासीयांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारू शकतो. त्याचप्रमाणे आरोग्य, वाहतूक आणि शिक्षण अशा सुविधांचा अधिक चांगला लाभ घेता येऊ शकतो. त्याचप्रमाणे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी जागा उपलब्ध होऊ शकते आणि नियोजनबद्ध शहरांच्या उभारणीसाठी ते अधिक सहाय्यकारक ठरू शकते.

सध्या अस्तित्वात असलेल्या झोपडपट्टी तोडून त्याजागी नवी घरे उभारल्यास मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होईल. त्यातून खुल्या जागा विकसित करण्यासाठी मदत होईल आणि पायाभूत सुविधांचा विकास म्हणजेच रस्ते, रुग्णालये आणि अन्य लोकोपयोगी सुविधांच्या उभारणीसाठी त्यांचा उपयोग करता येईल. त्याचप्रमाणे हरित पट्टे निर्मित करता येतील, ज्यामुळे उद्याने आणि रिक्रिएशनल एरिया यांची उभारणी करता येईल. झोपडपट्टी पुनर्विकास झालेल्या भागात मानवी जीवनावर सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. गुन्ह्यांचे प्रमाणही कमी झाले आहे. अभ्यासाच्या अंती असे दिसून आले आहे की, झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांमुळे सेवांचा लाभ, शिक्षण, आरोग्य यांचा दर्जा सुधारला आहे. ज्या देशांत गरिबीचे प्रमाण अधिक आहे, तिथे हे प्रकर्षाने दिसून आले आहे. या प्रकल्पांमुळे गुन्ह्याचे प्रमाण कमी झाले आहेच. त्याचप्रमाणे आरोग्य, शिक्षण यांचा दर्जा सुधारला आहे आणि रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत.

मात्र या संदर्भात आणखी काही गोष्टी करणे आवश्यक आहे. पारदर्शकता आणणे आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्रक्रिया अधिक सुलभ करणे यासाठी सरकारने झोपडपट्टी पुनर्विकास आराखडा झोपडपट्टीवासीयांना स्पष्टपणे आणि खुलेपणाने सांगणे आवश्यक आहे. त्यामुळे विश्वास निर्माण होईल आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्रक्रियेत आपले म्हणणे ऐकले जाते अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होईल. झोपडपट्टीवासीय आणि इतर भागधारक यांच्या प्रतिक्रिया आणि सूचना ऐकून घेण्याची तयारी सरकारने ठेवली पाहिजे. या प्रक्रियेत सहभागी असलेले सर्व भागधारक त्यांच्या जबाबदारीच्या निर्वाहनास तसेच झोपडपट्टीवासीयांना योग्य ती भरपाई आणि पर्यायी निवास व्यवस्था देण्यास जबाबदार आहेत हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे.

(लेखक किंग्ज बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक आहेत)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -