Saturday, May 18, 2024
Homeसाप्ताहिककोलाजडोक्याला त्रास कशाला?

डोक्याला त्रास कशाला?

सेल्फी : चंद्रकांत बर्वे

मी एक ज्येष्ठ नागरिक आहे. रोजची आवश्यक छोटी-मोठी खरेदी स्वतःच करत असतो. गल्लीतल्या डेअरीवाल्याकडे गेलो, छान ताजं पनीर दिसलं. काय भाव? ३२० रु. किलो.

म्हटलं १०० ग्रॅम दे.

दुधाची एक पिशवी दे… त्याचे २३ रु. झाले आणि ती कोल्ड ड्रिंकची मोठी बाटली?

तिचे ५० रु. OK, मी मनातल्या मनात हिशेब केला. १०५ रु. झाले. मी २०० रुपयांची नोट व एक पाचचे नाणे हातात घेतले. म्हटलं आता तो लगेच १००ची नोट परत देईल. पण नाही. त्याने हातात कॅल्क्युलेटर घेतला. ३२० भागिले १० बरोबर ३२ अधिक २३ अधिक ५० असं गणित करून १०५ रु. मागितले. माझ्या हातात आधीच २०० रु. आणि ५ चे नाणे पाहून त्याला कौतुक वाटलं.

जवळच्या पोळी-भाजी केंद्रावर गेलो. ७ रुपये किमतीच्या ५ पोळ्या, ४० रु. सुकी भाजी आणि इतक्यात ताजे आलेलं एक ५५ रुपयांचे भाजणीच्या पिठाचे पाकीट घेतलं. मी आपलं मनातल्या मनात हिशेब करून हातात १३० रु. काढले. पण काऊंटरवरच्या मुलीने मात्र लगेच कॅल्क्युलेटर घेऊन ७ गुणिले ५ बरोबर ३५ अधिक ४० अधिक ५५ असे एकूण १३० रु. बिल सांगितले, पण माझ्या हातात आधीच १३० रु. बघून तिने स्मित केलं.

आता असे प्रकार आपण सगळेच अनुभवतो. असं काही आहे का? की आमची पिढी फार हुशार आणि ही नवी पिढी साधारण बुद्धीची? नाही अजिबात नाही! एखादा मोठा मेसेज मोबाईलवर ते आमच्या दुप्पट वेगाने टाईप करू शकतात, पण या असल्या फालतू हिशेबाकरिता ते कॅल्क्युलेटर घेतात कारण तो स्वस्त आणि सहज उपलब्ध आहे, मग डोक्याला तो बेरीज- वजाबाकीचा त्रास कशाला घ्या?

आता चला मी माझ्या फ्लॅशबॅकमध्ये जातो. सुमारे ३०-४० वर्षांपूर्वी जेव्हा मोबाईल क्रांती झालेली नव्हती, तेव्हा ठिकठिकाणी टेलिफोन ऑपरेटर आपलं टेलिफोन बुथ चालवत असत. बरेचदा काही अंध मंडळी हे चालवत असत. आपण नंबर सांगितला की, डायल फिरवून तो फोन लागताच आपल्या हातात देत. एका ३ मिनिटांच्या कॉलचे २५ पैसे या हिशेबाने पैसे घेत. बिल दीड रुपया झाले, आपण दहाची नोट दिली की, ती नोट हातात घेताच त्या नोटेच्या आकारावरून, त्या नोटेला स्पर्श करून ते ती नोट खरी आहे आणि कितीची आहे हे ओळखत आणि आपल्या गल्ल्यातून बरोबर पाचची एक नोट, एकेकच्या तीन नोटा व पन्नास पैशाचं नाणं ते परत देत. लॉटरी तिकीट विकणारा अंध देखील अशी नोटांची अगदी अचूक देवाण-घेवाण करत असे. आम्हाला ते जमलं नसतं मग त्यांना का जमायचं? कारण त्यांना अंधत्व असल्याने त्यांचं नकळत किंवा प्रयत्नपूर्वक इतर इंद्रियांचा अधिक चांगला वापर करण्याचे ट्रेनिंग झालं होतं. आम्हाला दृष्टी असल्याने हे बाकी गुण विकसित करण्याची आम्हाला कधी गरजच भासली नाही. आम्हीही ते करू शकलो असतो. आजच्या तरुणांना देखील साध्या बेरीज-वाजबाकीसाठी डोक्याला त्रास न देता हातातलं यंत्र त्यांना पसंत आहे.

आता आपण सहाशे वर्षे मागे जाऊ या. स्थळ : मॉरिशस. तेव्हा त्या निर्जन बेटावर ‘डोडो’ नावाचे पक्षी होते. त्यांचं अन्न बेटावर भरपूर उपलब्ध होतं, शिवाय त्या पक्षांना खाणारे प्राणी नव्हते. मग काय? त्यांचा उद्योग पोटभर खाणे, प्रजोत्पादन करणे आणि आराम करणे. त्यांना आता जोरात धावण्याची, उडण्याची गरज उरली नाही. अंड्यांच्या देखील संरक्षणासाठी आवश्यकता नव्हती. त्यामुळे त्यांच्या पायातली, पंखातली ताकद कमी होत गेली. पुढे डच लोकांना ते बेट सापडले. त्यांनी वसाहत केली. त्यांना हा गब्दुल पक्षी खायला आयताच मिळाला. त्यांच्याबरोबर त्यांनी पाळलेले कुत्रे होतेच, शिवाय बोटीतले उंदीर बेटावर उतरले. बिचारे डोडो, माणसांपासून किंवा कुत्र्यांच्या विरोधात प्रतिकार करणे सोडाच ते पळून किंवा उडून आपला जीवही वाचवू शकले नाहीत. उंदरांनीही त्यांच्या अंड्यांवर ताव मारला आणि बघता बघता जगातून डोडो हा पक्षी नामशेष झाला.

csbarve51@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -