Sunday, May 12, 2024
Homeब्रेकिंग न्यूजकोण संजय राऊत? अजित पवार आणि संजय राऊत यांचे संगनमत!

कोण संजय राऊत? अजित पवार आणि संजय राऊत यांचे संगनमत!

महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ नये म्हणून करताहेत एकमेकांवर आरोप?

मुंबई : कोण संजय राऊत? असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा अनुल्लेख केला आहे. यामुळे अजित पवार आणि संजय राऊत या दोन नेत्यांमध्ये मतभेद वाढत असल्याचे त्यांच्या मागिल चार-पाच दिवसातील वर्तनातून जाणवत आहे. मात्र याबाबत दोघांनाही पत्रकारांनी थेट प्रश्न विचारले असता ते एकमेकांना कोण संजय राऊत आणि कोण अजित पवार असे बोलून पत्रकारांनाच उलट सवाल करत आहेत. यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ नये म्हणून अजित पवार आणि संजय राऊत यांनी संगनमत केले असून ते एकमेकांवर आरोप करताहेत, अशी चर्चा आता राजकीय वर्तूळात सुरू आहे.

आज अजित पवारांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना संजय राऊतांविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, कोण संजय राऊत? असे अजित पावर म्हणाले. प्रत्येक प्रवक्त्याने आपापल्या पक्षावर बोलावे, हे म्हणताना मी कुणाचे नाव घेतले नव्हते, मग कुणाच्या अंगाला का लागावे, असेही अजित पवार म्हणाले.

प्रसारमाध्यमांनी अजित पवारांना संजय राऊत अजुनही तुमची बाजू मांडतायत असा प्रश्न केला होता. त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना कोण संजय राऊत? मी कोणाचे नाव घेतले होते का? मग मी का अंगाला लावून घेऊ, असे अजित पवार म्हणाले.

माझ्याबाबतच्या असणाऱ्या शंका-कुशंका डोक्यातून काढून टाका, असे आवाहन अजित पवारांनी माध्यमांना केले. तसेच सकाळ पेपरचा कार्यक्रम आधीपासून ठरला होता, असेही अजित पवार म्हणाले.

मुळात मागील काही दिवसात अजित पवार हे भाजपात जाणार अशी चर्चा सुरु होती. तेव्हा भाजपामध्ये प्रवेश घेण्यासाठी पवार कुटुंबियांना लक्ष्य केले जात आहे. कुणालाही काही निर्णय घ्यायचा असेल तर प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, असे वक्तव्य शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या भेटीत केले होते, असा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता. याच विषयावर सामनातील रोखठोकमध्येही राष्ट्रवादीत फूट पडणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले होते.

त्यावर मागिल तीन दिवसांपूर्वी अजित पवार यांच्याबाबत सुरु असलेल्या चर्चांवर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले होते. यावेळी बोलताना अजित पवारांनी नाव न घेता संजय राऊतांना फटकारले होते. आमच्या पक्षाची बाजू मांडण्यासाठी आमचे प्रवक्ते आहेत. आमच्या पक्षाचे वकिलपत्र इतर कोणी घेऊ नये, असे अजित पवार म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. कोण अजित पवार, आम्ही फक्त शरद पवार यांचे ऐकतो. मी सत्य बोलत राहणार आहे. मी कोणाच्या बापाला घाबरत नसल्याचे संजय राऊत म्हणाले होते.

तसेच आम्ही सगळे अजित पवार यांच्यावर प्रेम करणारी माणसे आहोत. महाविकास आघाडी घट्ट आणि मजबूत राहावी या मताचे आम्ही आहोत. आम्ही महाविकास आघाडीचे चौकीदार आहोत. जेव्हा शिवसेना फुटली तेव्हाही तुम्ही आमची वकिली करत होता. मला जरी कोणी टार्गेट करत असेल तरी मी सत्यच बोलणार. मी कदापी मागे हटणार नाही. अनिल देशमुख असतील जितेंद्र आव्हाड असतील अशी किती जणांची नावं आहेत की त्यांच्यावर यंत्रणांचा दबाव आहे. जे सत्य आहे ते मी लिहित राहणार आणि बोलतच राहणार असल्याचे राऊत म्हणाले. महाराष्ट्रात विरोधी पक्ष फोडण्याचे काम सुरु आहे. हे सत्य आहे की असत्य आहे अजित पवार यांनी सांगायला पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले. या सर्व बातम्यांची मी माहिती ठेवतो यामध्ये गैर काय, असेही राऊत म्हणाले. मी लिहीलेले टोकदार सत्य जर कोणाला टोचत असेल तर मी काय करु, असेही राऊत म्हणाले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -